महायुतीचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

    दिनांक :25-Oct-2019
|
विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष, जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या महायुतीला सरकार स्थापन करता येईल एवढे संख्याबळ मिळाले आहे. राज्यातल्या मतदारांनी महायुतीला सत्तास्थापनेसाठी जनादेश दिला आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. या जनादेशासाठी महायुतीचे हार्दिक अभिनंदन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने ही निवडणूक लढली आणि जिंकलीही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच वर्षांत केलेली कामे, निवडणुकीपूर्वी काढलेली महाजनादेश यात्रा यामुळे राज्यभर भाजपाला अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही राज्यात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार, अशी स्वत:ची मानसिकता करवून घेतली होती. काँग्रेसने तर ही निवडणूक लढलीच नाही, काँग्रेस आपसातच लढली, असे बोलले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस गलितगात्र झाली आहे, असे त्या पक्षाबाबत बोलले जात असताना, त्या पक्षाची कामगिरी मात्र 2014 च्या निवडणुकीपेक्षाही यावेळी सरस राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. एकट्या शरद पवारांनी राष्ट्रवादीचा किल्ला लढवला आणि पक्षाला 55 जागा जिंकवून दिल्यात. काँग्रेसनेही 45 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. यासाठी त्यांचेही खरेतर अभिनंदन करायला पाहिजे. 
 
 
गेली पाच वर्षे राज्यात महायुतीची सत्ता होती. या सत्ताकाळात महायुतीच्या सरकारने विकासाची जी प्रचंड कामे केली, ती लक्षात घेत मतदारांनी पुढल्या पाच वर्षांसाठी महायुतीला कौल देतानाच जनादेशाचा सन्मान राखण्याचा इशाराही दिला आहे. गेल्या वेळी वेगवेगळे लढूनही भाजपाला 122 तर शिवसेनेला 63 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी त्यापेक्षाही जास्त जागा मिळतील, अशी दोन्ही पक्षांना अपेक्षा होती, मतदानोत्तर चाचण्यांनीही तसे संकेत दिले होते. भाजपानेही अब की बार 220 पार, असा नारा दिला होता. तो कशाच्या आधारावर दिला होता, हे कळत असले तरी वळले नाही, हे स्पष्ट झाले आहे. पाच वर्षे राज्यात सत्तेत राहिलेल्या महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, तर तो एक विक्रमच झाला असता. पण, तसे घडले नाही. ते का घडले नाही, याचा शोध महायुतीतल्या पक्षांना घ्यावाच लागणार आहे. थोडक्यात काय, तर जो विजय मिळाला आहे, जनतेने जो कौल दिला आहे, त्याबाबत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला आत्मिंचतन करावे लागणार आहे. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मतदारांनी दलबदलूंना शिकविलेला धडा! काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपा-शिवसेनेत आलेल्या 35 पैकी 19 नेत्यांना मतदारांनी पराभूत करून भविष्यात कसा कल राहील, याचेही स्पष्ट संकेत दिले आहेत. सगळ्यात मोठा धडा तर सातार्‍याच्या मतदारांनी उदयनराजे भोसले यांना शिकविला आहे. मे महिन्यात लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली असताना खासदारकीचा राजीनामा देत भाजपात दाखल झालेले उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर उभे होते. पण, जनतेने त्यांना सपशेल नाकारून आपल्या मनात काय आहे, ते दाखवून दिले आहे. थोडक्यात, गृहीत धरणार्‍यांना मतदारांनी कायमचा धडा शिकविला आहे.
 
 
कोणत्याही दडपणाला बळी न पडता मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. मतदान करताना जनतेने कोणकोणत्या मुद्यांचा विचार केला, याचा शोध सत्तास्थापनेसाठी कौल मिळूनही भाजपा-सेनेला घ्यावा लागणार आहे. कारण, दोनशेपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास असताना तो आकडा 160 पाशीच का थांबला, यावर विचार करून त्याची कारणं शोधणं क्रमप्राप्त ठरते. भाजपा-सेनेचे नेते यावर चिंतन आणि मंथनही करतील, कुठे कमी पडलो, काय करायचे राहून गेले, याबाबत विचार करतील आणि स्वत:चे भविष्य सुरक्षित करतील, यात शंका नाही. घडणारी प्रत्येक घटना, प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून जात असतो. त्यामुळे या प्रसंगातून महायुतीचे नेतेच नव्हे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही धडा घेतील, अशी आशा करायला हरकत नाही. कारण, सत्तास्थापनेसाठी जनतेने आघाडीला कौल दिलेला नाही. सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळापेक्षा 45 जागा आघाडीला कमी मिळाल्या आहेत. त्यामुळे गेली पाच वर्षे सत्तेबाहेर तडफडणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही, जनतेने कौल का दिला नाही, यावर चिंतन करावेच लागणार आहे. निवडणुकीत हार-जीत ही होतच असते. भाजपा-सेनाही 1999 ते 2014 अशी पंधरा वर्षे सत्तेबाहेर होती. पण, म्हणून त्यांनी निवडणूक लढण्याचे, जिंकण्याचे प्रयत्न सोडलेले नव्हते. पंधरा वर्षांत प्रचंड परिश्रम घेत भाजपा-सेना युतीच्या नेत्यांनी 2014 साली आघाडीला सत्तेतून बाहेर काढले आणि आता जनतेने महायुतीला दुसर्‍यांदा कौल दिला आहे, हे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शुभलक्षण मानले पाहिजे. अपेक्षेपेक्षा जागा कमी मिळाल्या म्हणून निराश न होता, भविष्यात जनतेच्या आशा-आकांक्षा कशा रीतीने पूर्ण करता येतील, या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी दिशा निश्चित केली पाहिजे. जनतेने जागा भलेही कमी दिल्या असतील, पण जनादेश अतिशय स्पष्ट दिला आहे. त्यामुळे सरकार चालविताना महायुतीच्या नेत्यांना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही अडचणी येतील, असे वाटत नाही.
 
 
जनतेने दिलेला कौल भाजपाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नम्रपणे स्वीकारला, हे चांगलेच झाले. शेवटी, लोकशाहीत जनताच सर्वोच्च असते. त्यामुळे जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढची वाटचाल करण्यातच प्रत्येक पक्षाचे हित दडले आहे. आज प्रत्येक पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. पण, म्हणून पुढल्या निवडणुकीतही असेच चित्र राहील, असे समजण्याचे कारण नाही. पुढल्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठीचा पाया प्रत्येक राजकीय पक्षाला पाच वर्षे काम करून रचता येईल, मजबूत करता येईल. भाजपा-शिवसेनेकडे तर सत्ता आली आहे. सत्तेच्या माध्यमातून या दोन्ही पक्षांना जनहिताची असंख्य कामे करण्याची एक चांगली संधी चालून आली आहे. या संधीचा उपयोग युतीचे नेते कौशल्याने करतील आणि जनमानसात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडून 2024 ची निवडणूक जिंकण्याचा मार्ग प्रशस्त करतील, यात शंका नाही. पंकजा मुंडे, अनिल बोंडे, राम चिंदे, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे यांसारख्या विद्यमान मंत्री-राज्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. अनेक विद्यमान आमदारांचाही पराभव झाला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलीचाही पराभव झाला आहे. या घटकाचाही भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन आता नवे सरकार स्थापन करायचे आहे. असे करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांना अतिशय संतुलित भूमिका घ्यावी लागेल, एकमेकांना समजून घेत पुढचा मार्ग प्रशस्त करावा लागेल. सत्तास्थापनेसाठी स्पष्ट जनादेश मिळाल्याबद्दल महायुतीचे पुनश्च एकदा अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!