इम्रान खानचा पाकिस्तान...

    दिनांक :26-Oct-2019
|
काश्मीर प्रकरणी चहूबाजूंनी थापडा खाल्ल्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता देशांतर्गत राजकीय चिखलात फसले आहेत. पाकिस्तानमधीलच कट्‌टर धार्मिक मुसलमानांच्या, जमात उलेमा-ए-इस्लाम या एका राजकीय पक्षाने राजधानी इस्लामाबादला घेराव करून त्याची नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे. या राजकीय पक्षाचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा ‘आझाद मार्च’ नावाचा मोर्चा 27 ऑक्टोबर रोजी निघणार असून, 31 ऑक्टोबरला तो इस्लामाबाद येथे पोहोचेल आणि या शहराला घेराव करेल. मौलान फजलुर रहमान यांच्या मते, सध्या सत्तेत असलेले इम्रान खान सरकार अवैध व असंवैधानिक आहे. हे सरकार लोकांनी निवडलेले नसून लष्कराने नियुक्त केलेले आहे. त्यामुळे इम्रान खानने ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. जोपर्यंत इम्रान खान राजीनामा देत नाही, तोपर्यंत इस्लामाबादची नाकेबंदी सुरू राहील, अशी घोषणा मौलानाने केली आहे. इम्रान खान यांना वाटले की, आपण मौलानांची समजूत काढून त्यांना परावृत्त करू. परंतु, मौलाना आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मोर्चाची तारीख जवळ येताच, इम्रान खान यांचे धाबे दणाणले आहे आणि ते लष्कराच्या पदराआड लपले आहेत. शेवटी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी मौलाना रहमान यांना भेटीला बोलावले आणि खडसावले की, हे जे तुम्ही करत आहात, ते संविधानाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे हा आझादी मार्च रद्द करा. बाजवा त्यांना म्हणाले की, तुम्ही एक जबाबदार राजकीय नेते आहात आणि आज पाकिस्तान ज्या परिस्थितीत आहे, त्या वेळी असले आंदोलन करणे योग्य नाही. काश्मीर प्रकरणामुळे भारताच्या सीमेवर अशांती, अफगाणिस्तानच्या सीमेवरही गडबड, तिकडे इराण व सौदी यांच्यात ठिणग्या पडत आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानला अस्थिर करण्याचे कुठलेही प्रयत्न लष्कर सहन करणार नाही. बाजवा यांची ही सरळसरळ धमकीच आहे. परंतु, मौलाना रहमान अजूनतरी वाकले नाहीत. पाकी लष्करप्रमुखाचेही मौलाना ऐकत नाहीत, याचा अर्थ लष्करातील बाजवाविरुद्ध जनरल्सचा मौलानांना छुपा पािंठबा आहे, असे काहींचे म्हणणे आहे. कारण, बाजवा यांनी स्वत:चा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवून घेतल्यामुळे, काही जनरल्स अत्यंत चिडले आहेत, असे समजते. त्यामुळे यावेळी कधी नव्हे ते पाकिस्तानी लष्करही दोन गटांत विभागले आहे.
 

 
 
पाकिस्तानची आर्थिक स्थिती तर अतिशय चिंताजनक आहे. अमेरिका, चीन आणि सौदी अरब यांनी पैसे देणे बंद केले आहे. महागाईने कळस गाठला आहे. इम्रान खानच्या विरुद्ध प्रचंड असंतोष आहे. गंमत अशी की, देशातील गंभीर आर्थिक स्थितीवर मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान बैठक बोलावत नाहीत, तर लष्करप्रमुख बाजवा यांनी देशातील मोठ्या उद्योगपतींची एक बैठक पंधरा दिवसांपूर्वी बोलावली आणि त्यात देशाच्या आर्थिक स्थितीची चर्चा केली. विरोधक म्हणतात की, इम्रान खान हे लष्कराच्या हातातले बाहुले आहे, ते काही खोटे नाही. लष्करालाही असाच पंतप्रधान हवा होता. देशात लोकशाही आहे, हे जगाला दाखविता यावे, यासाठीच लष्कराने, पश्चिमेला पसंत पडणारा चेहरा असलेल्या इम्रान खानला निवडले आणि अक्षरश: निवडून आणले. इम्रान खान फक्त पंतप्रधानपद उपभोगत आहे. सर्वकाही करत आहे ते लष्करच आणि पाकिस्तानी जनतेला ते मान्य आहे. त्यांचा लष्करावर अत्यंत विश्वास आहे.
 
इम्रान खानने आणखी एक राजकीय चूक केली. सत्तेत येताच प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले. पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तानचे आसिफ झरदारी, पाकिस्तान मुस्लिम लीगचे नवाझ शरीफ आणि इतरही अनेक महत्त्वाचे विरोधी नेते सध्या तुरुंगात आहेत. इतके महिने झालेत, परंतु अजूनही त्यांच्यावर आरोप दाखल झाले नाहीत. त्यामुळे या पक्षांच्या समर्थकांमध्ये अत्यंत संताप आहे. नवाझ शरीफ यांचा तर तुरुंगात चांगलाच छळ सुरू आहे. त्यांची मुलगी मरयम हिलादेखील वडिलांना भेटू दिले जात नाही. आतातर नवाझ शरीफ यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. तुरुंगात असताना त्यांच्या रक्तातील प्लेटलेटस्‌ सात हजारापर्यंत आल्या होत्या. त्यामुळे त्यांना गंभीर स्थितीत लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना नेमके काय झाले, हेही सरकार जाहीर करत नाही. जनता संभ्रमात आहे. नवाझ शरीफ कुटुंबीयांनी तर, इम्रान खान सरकारवर जाहीर आरोप लावला आहे की, नवाझ शरीफ यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे. नवाझ शरीफ यांच्या जिवाला काही बरेवाईट झाले, तर पाकिस्तानातील राजकारण कुठले वळण घेईल सांगता येत नाही.
अशा या गंभीर परिस्थितीत इम्रान खान बावचळून गेले आहेत. पाकिस्तानने इतका खुशालचेंडू आणि बेजबाबदार पंतप्रधान कधी पाहिला नाही, असे आतापर्यंत इम्रान खानची तळी उचलणारे ज्येष्ठ पत्रकारही म्हणूलागले आहेत. घरी एवढा वणवा पेटलेला असताना इम्रान खान मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरून, इराण व सौदी अरब यांच्यात मध्यस्थी करण्यात मग्न आहेत.
 
तिकडे एफएटीएफ या जागतिक संस्थेने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानने फेब्रुवारी 2020 पर्यंत दहशतवाद्यांविरुद्ध समाधानकारक कारवाई केली नाही, तर हा देश एफएटीएफच्या काळ्या यादीत जाईल. तसे झाले तर हा देश आणखीच गर्तेत जाईल. असे होणे हे भारताच्याच नाही तर जगाच्याही दृष्टीने चांगले ठरणार नाही. कारण या देशाकडे अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे हा देश जर कोंडीत सापडला तर तो जगात काहीही विध्वंस करू शकतो. इथल्या लोकांची, लष्कराची आणि राजकारण्यांची मानसिकता तशीच आहे. काही सभ्यता नाही, की इतिहास नाही. भारतद्वेषावरच हा देश आतापर्यंत पोसला गेला आहे (किंवा जगातील काही शक्तींनी त्याला पोसले). त्यातही काश्मीर हा विषय पाकिस्तान्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आहे. देशात काहीही झाले की, काश्मीरचा विषय काढला की पाकिस्तानची जनता तहानभूक विसरून राजकारण्यांच्या मागे एकजूट उभी राहते. परंतु, आता नरेंद्र मोदी यांनी काश्मीरचा विषयही संपवून टाकला आहे. आतापर्यंत श्रीनगर पाकिस्तानात कसे येईल, याचा वल्गना होत होत्या. परंतु, आता गुलाम काश्मीरमधील मुझफ्फराबाद कसे वाचवायचे, यावर तिकडे चर्चा सुरू आहे. एकुणातच, पाकिस्तानची इतकी गंभीर स्थिती आतापर्यंत कधीच झाली नव्हती. भारतात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील खंबीर सरकार, अमेरिकेतही पाकिस्तानशी फटकून वागणारे ट्रम्प शासन, चीनदेखील त्याचा महत्त्वाचा प्रकल्प रेंगाळला म्हणून चिडलेला, सौदी अरब व यूएई यांनी मदतीचा हात आखडता घेतलेला आणि इराण व अफगाणिस्तानशी संघर्ष... अशा रीतीने पाकिस्तान जागतिक स्तरावर चोहोबाजूने घेरला आहे. देशांतर्गत परिस्थिती पाहिली तर बलुचिस्तान, सिंध, पश्तून आणि गुलाम काश्मीर (त्यांचा आझाद काश्मीर) प्रांतात बंडखोरी सुरू आहे. अशा परिस्थितीतून पाकिस्तानी लष्कर कसा मार्ग काढते, ते बघायचे. एक सोपा मार्ग म्हणजे, या सर्व परिस्थितीला इम्रान खान यांना जबाबदार ठरवून पदावरून काढणे आणि दुसरी व्यक्ती पंतप्रधानपदी बसविणे. तसे होण्याची शक्यता पाकिस्तानातील पत्रकार व राजकीय पंडित व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यांत पाकिस्तानात काहीतरी जबरदस्त घटना घडतील, अशी शक्यता आहे...