आली दिवाळी...

    दिनांक :27-Oct-2019
|
जैसा मूड हो वैसा मंजर होता है,
सुकून तो इन्सान के अंदर होता है...
असा एक शेर आहे, त्याच धर्तीवर असे म्हणता येईल की, दिवाळी ही अनुभूतीची गोष्ट आहे. तुमच्या मनात आनंद असेल तर कधीही दिवाळी असू शकते... म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय्‌, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण! पण... दिवाळी अशीच रोजच साजरी करावी का? परवडतं का ते? आर्थिक अर्थानं नव्हे, अगदी मनाचा विचार केला, तरीही रोजच दिवाळी नको असते. हसरा चेहरा छान वाटतो, ज्याचा असतो त्यालाही ते छानच वाटते, मात्र सतत चेहरा हसताही ठेवता येत नाही. कधीकधी रडावंसंही वाटतंच. नऊ रस सांगितले आहेत. ते सगळेच आपल्या आयुष्यासाठी चांगले असतात. या नऊ रसांच्या रंगांचीच मग दिवाळीला रांगोळी होते. ते सगळे एकमेकांत मिसळलेत की, मग केवळ आनंद नि आनंदच उरतो. ज्ञानोबामाउलींनी दहावा रस सांगितला- शांत रस! आनंदानंतर आणखी काही अस्वस्थता असते. ती शांततेसाठी असते. तिथे कुठलीच उलथापालथ नसते. म्हणजे हा रस चिमटे नाही काढत, ओरबाडत नाही, पण गुदगुल्याही नाही करत. अस्तित्वाच्या तळाशी पद्मासन घालून बसवतो आणि शांऽत करतो सगळेच!
 
  
...हे जरा जास्तच होतंय्‌... काय आहे, उत्साह, आनंद चिंतनानंतरच अधिक तेजाळून उठतात हे खरे आहे, मात्र दिवाळीला एकदम इतके जडव्याळ चिंतन नकोच ना! तर आता आपण आपल्या माहोलमध्ये जाऊ या... दिवाळी आपल्या घरी कशी येते ते पाहू या अन्‌ सोबतच मग स्वच्छ दिवाळी कशी असायची, त्याचा आठवही करू या... तर काय म्हणता? माहोल ना दिवाळीचा? आता कितीही नाही म्हटलं, तरीही दिवाळीचा माहोल तयार होतच असतो. आपापल्या पद्धतीने होतो. कुवतीनुसार होतो... तरीही दरवर्षी अगदी न चुकता लोक, असेही म्हणतातच, यंदा काही मजा नाही दिवाळीत... तरीही या दिवाळीची जी काय मजा असेल ती करतातच. दरवर्षी अन्‌ वर्षानुवर्षे लोक असेच म्हणत आले आहेत. म्हणजे आपल्या लहानपणीही त्यावेळची मोठी माणसे, यंदा दिवाळीत आधीसारखा माहोल नाही, असेच म्हणायचे. म्हणजे त्यांच्या लहानपणीची दिवाळी मस्त होती. त्या वेळी त्यांची वडील मंडळी हेच म्हणत होती. आता आपण तसेच म्हणतो, याचा अर्थ, आपल्या लहानपणची दिवाळी चांगली होती आताच्या दिवाळीच्या तुलनेत; पण त्या वेळी तर आपले वडीलधारे म्हणायचे, आधीसारखी मजा नाही दिवाळीत... आता आपण तसे म्हणतो अन्‌ उद्या आपली मुलं म्हणतील, आधीसारखी मजा नाही दिवाळीत. म्हणजे आताची दिवाळी त्यांच्या द़ृष्टीने मस्त ठरेल...
 
दिवाळी साजरी फरक पडतो आहे, हे खरेच आहे. काळ बदलला की सगळेच बदलते, हे खरेच आहे. हे लक्षात घ्यायला हवे... तर आता पुन्हा दिवाळी आली आहे. उटणं बदललं आहे. तेल बदललं आहे आणि आता उटण्याची जागा साबणाने कधी घेतली, हे कळलेलंही नाही. तेलाच्या ठिकाणी मेणाचे दिवे आले. तरीही दिवाळी, दिवाळीच आहे... कारण या सार्‍यात दिवाळी नसतेच. दिवाळी तो इन्सान के अंदर होती है!
आता बघा, काळ बदलल्याने दिवाळीची साफसफाई नावाचा प्रकारही बदलला आहे. आधीच्या काळी घरांना आटाळी असायची. आता नसतात. अर्थात, काही घरांना असू शकतात. वर्षभर त्यावर अडलंनडलं सामान फेकण्यात येत होतं. वर्षभर तिकडे लक्ष देण्यात यायचं नाही. नंतर मात्र दिवाळीच्या आधी साफसफाईला उधाण यायचं घरात. त्या वेळी मग सर्वात आधी हा आटाळा साफ केला जायचा. त्यावर मग वर्षभराच्या अजागळपणाचा ताळेबंदच मांडलेला असायचा. वर्षभर, नको असलेली वस्तू खाली अडचण वाटते, खाली खोलीत साफ दिसायला हवे आहे ती आटाळ्यावर टाकली जायची. तिचे काय करायचे ते नंतर पाहू... अचानक घरी पाव्हणे येणार आहेत अन्‌ बैठक, स्वयंपाक घर तरी स्वच्छ दिसायला हवे, मग काय करायचे? तर पसरलेले सामान आटाळ्यावर टाकायचे... मग पाहू खाली काढून वेगवेगळे करू. एकदा ते आटाळ्यावर टाकले की मग ते दिवाळीच्या आधीच हाताला लागायचे. वर्षभरात ती वस्तू अनेकदा खाली शोधली गेलेली असायची.
 
 आता जसे चमचमीत पदार्थ ही काही दिवाळीचीच नव्हाळी राहिलेली नाही. आधी कसे वर्षभर चमचमीत असे, तेलकट, तुपकट, मसालेदार असे केवळ सणांनाच खाल्ले तर खाल्ले. आता वर्षभरच लोक चमचमीत खातात. नवे कपडे केव्हाही खरेदी करतात, तसे आता वर्षभर सफाई केली जाते. तेव्हाही स्वच्छता राखलीच जायची; पण दिवाळीत अगदी कानाकोपराही उजळून काढला जायचा. आता मात्र स्वच्छ भारत मिशनच आहे. स्वच्छतेसाठी दिवाळीची वाट बघायची नाही. त्या वेळी घरे जुनीच असायची. फारशी नवी घरे बांधली जात नव्हती. घरेही कशी रेल्वेच्या डब्यासारखी सरळ. एका मागोमाग खोल्या. आटाळे, गजाच्या खिडक्या... भिंतीवर देवांच्या अन्‌ आपल्या वाडवडिलांच्या तसविरी. त्यांना लावलेल्या उदबत्त्या, कधीकाळी लावलेले ताज्या फुलांचे हार वाळले की, त्या हारांच्याही स्मृती फोटोंच्या मागेच जमा केल्या जायच्या. तिथे चिमण्यांची घरटी असायची. क्वचित पालींचीदेखील वसती असायचीच. वर्षभराचे हे सगळेच साफ केले जायचे ते दिवाळीतच. एकदा अशी सफाई झाली की, मग मध्यमवर्गीय घरांत जुन्या साड्यांचे पडदे आटाळ्याला हमखास असायचे. त्या घरातली बाई एकटी असली की आटाळ्याकडे बघायची अन्‌ मग बघतच राहायची. कारण तिची नजर साडीच्या पडद्यावरून मग गत काळात गेलेली असायची... नणंदेच्या पहिल्या मुलाच्या बारशाला दिली होती ही साडी त्यांनी... काय होपलेस! पडदे, चादरी, उशांचे अभ्रे बदलले जायचे. घरातली ठेवणीतली भांडी घासली जायची. त्यात काही किडुकमिडुक चांदीचीही भांडी असायची. कपड्यांच्या अलमारीची अलटपलट व्हायची. कपड्यांच्या नीट घड्या घातल्या जायच्या. त्यातले काही ठेवणीतले कपडे धुवून त्यांना प्रेेस केली जायची...
आता महत्त्वाचा सफाईचा भाग म्हणजे घराला रंग द्यायचा. एकतर घरं भाड्याची असायची. त्यामुळे खरेतर ती घरमालकाने रंगवून द्यायला हवी, मात्र ते तसे होत नव्हते. मग आपणच ती रंगवायची. डिस्टेंपरचे पुडे मिळायचे. त्याचा रंग हाताला लागत नाही वाळल्यावर, असे सांगितले जायचे अन्‌ एकदा मारला रंग की, मग वर्षभर तो भिंतीला टेकून पलंगावर बसलो की कपड्यांना लागायचाच. म्हणजे बाहेर गेलो आपण की लोक म्हणायचे, काय, यंदा हिरवा डिस्टेंपर लावला वाटतं.
मधल्या काळात मग भिंतीला वॉल पेपर लावण्याची फॅशन आली. ज्यांच्याकडे हा वॉल पेपर लावला जायचा ते श्रीमंत किंवा उच्च अभिरुचीचे, असे मानले जायचे. त्यांच्या भिंतींवर ऑईलपेंिंटग असायचेच. बाया गवताचा भारा घेऊन घराकडे निघाल्या आहेत अन्‌ त्यांच्या मागे बकर्‍या चालल्यात, अशा मावळतीच्या प्रकाशात सावल्यांसारख्या त्या काळ्या आकृत्या असायच्या किंवा असेच काही चित्र असायचे. आता काळ बदलला अन्‌ घराच्या सफाईचे निकषही बदलले. आता कसं वर्षभर स्वच्छ राहतो आपण. दिवाळीलाच रंग मारायचा घराला, असे होत नाही. सफाईवाले बोलावले जातात. तसेही दारं आणि खिडक्यांना पडद्यांचे दोन सेट असतात. घरातले फर्निचर बदलले जाते दर दोन वर्षांनी. इंटिरीयर करणारेही असतातच... मिठाईचे पॅकेटस्‌ येतात अन्‌ त्याहीपेक्षा चॉकलेटस्‌ जास्त आवडू लागले आहेत आपल्याला... तर ही बदललेली दिवाळीही आनंदाचीच असते!