बुद्धिजिवी अंधश्रद्धा!

    दिनांक :27-Oct-2019
|
मंथन 
 भाऊ तोरसेकर
कालपरवा नोबेल पारितोषिक मिळालेले अभिजित बॅनर्जी भारतात आलेले असताना, त्यांना अगत्याने आमंत्रण देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावून घेतले आणि त्यांचे खास अभिनंदन केले. बॅनर्जी वंशाने भारतीय असले, तरी आज भारताचे नागरिक नाहीत. पण, त्यांच्या कार्याचा गौरव करणे मोदींना आवश्यक वाटले. मात्र, तेच बॅनर्जी कधीही भाजपाच्या वा संघाच्या विचारांशी सहमत होणारे विचारवंत-अभ्यासक नाहीत. म्हणूनच मग इथल्या तथाकथित डाव्या विचारवंतांना बॅनर्जी यांचे कौतुक असले तर नवल नाही. कारण, बॅनर्जी यांचे कार्य किंवा अभ्यास यापेक्षाही इथल्या विचारवंत डाव्यांसाठी त्यांचे कौतुक हे ते संघविचारांचे विरोधक असल्यानेच अधिक आहे. किंबहूना आजकाल आपल्या देशात संघाला उगाच उथळ विरोध करून वा शिव्याशाप देऊन कुणालाही विचारवंत म्हणून प्रमाणपत्र मिळवता येत असते. साहजिकच बॅनर्जी यांचे कौतुक स्वाभाविक आहे. मोदींची गोष्ट वेगळी आहे. त्यांना कुणी आपल्या विचारांचा वा समर्थक असण्यापेक्षाही व्यक्तीच्या गुणवत्तेची महत्ता वाटते. म्हणून त्यांनी बॅनर्जींचा गौरव केलेला आहे. पण, अशा प्रसंगातून आपल्या देशातील वैचारिक दिवाळखोरीचे पुरावे मिळत असतात आणि त्याचेच सार्वत्रिक परिणामही बघायला मिळत असतात. आता कालपरवा आलेले एक्झिट पोल व त्यावरील चर्चा बघितल्या, तरी अशा दिवाळखोरीची साक्ष मिळतच असते. देशासमोर इतके भेडसावणारे प्रश्न व समस्या असतानाही सामान्य मतदार भाजपाला, मोदींना वा फडणवीसांना मते कशाला देतो? याचेही उत्तर ज्याला शोधता येत नाही, त्याची गणना आपल्या देशात अभ्यासक विचारवंतांमध्ये होत असते. असे बहुतांश विचारवंत बौद्धिक अंधश्रद्धेचे बळी असतात. ते समजुतीच्या जगात जगत असतात. म्हणूनच चुकून कधी वास्तव जगात आले, तर त्यांना जगातले वास्तव भयभीत करून सोडते. निवडणुकीचे निकाल किंवा एक्झिट पोल ही तशीच एक वास्तविकता आहे.
 
 

 
उदाहरणार्थ, देशाच्या अर्थव्यवस्थेत येऊ घातलेली मंदी किंवा विकासदरात झालेली घसरण, वाढती बेरोजगारी किंवा शेती व्यवसायाची झालेली दैना; या खोट्या वा कपोलकल्पित समस्या अजीबात नाहीत. त्या अभ्यासकांनी मांडल्या व कुठल्या आकडेवारीतून सादर केल्या, म्हणून खोट्या बिलकूल नाहीत. त्या खर्‍याच आहेत. पण, त्या समस्या जोपर्यंत जनतेला भावत नाहीत वा भयभीत करीत नाहीत, तोपर्यंत सामान्य जनता त्यावर प्रतिसाद देत नसते. मुंबईच्या गजबजलेल्या वस्त्या व गलिच्छ वस्त्यांमध्ये निम्म्याहून अधिक जनता नित्य जीवन मुठीत धरूनच जगत असते. तिला पर्यावरण व त्याचा आरेमधल्या जंगलातील झाडांशी असलेला संबंध समजत नाही. कारण, ज्याला असे जाणकार मुंबईचे फुफ्फ़ुस म्हणतात, त्याची कल्पनाही कधी सामान्य लोकांना जगायला मिळालेली नसते. मानखुर्द वा आणिक अशी चेंबूरच्या पलीकडली जुनी गावे आता वस्त्यांनी गजबजली आहेत. अनेक गलिच्छ वस्त्या हटवताना किंवा जुन्या चाळी सपाट करताना, तिथल्या लाखो लोकांना तिकडे नेऊन टाकलेले आहे. त्यांना कचर्‍याचे ढीग वा तेलशुद्धी कारखान्याच्या परिसरात जगावे लागते. तो परिसर 24 तास धुराने माखलेला असतो आणि शुद्ध हवा कशाशी खातात, तेही तिथला रहिवासी जाणत नाही. मग त्याला आरेमधील झाडांमध्ये वसलेले फुफ्फुस कसे समजावे? त्यामागचे विज्ञान वा शास्त्र ज्याला ठाऊकही नाही, त्याला ती झाडे तोडण्याने होणारे नुकसान समजू शकत नाही. पण, मेट्रोेमुळे वाहतुकीचे साधन विस्तारले, तर प्रवासात होणारी घुसमट कमी होऊ शकेल, इतकेच विज्ञान समजू शकते. कारण, ते त्याच्या नित्य जगण्याला भिडणारे असते. म्हणून पर्यावरणाची शुद्धता चुकीची वा खोटी अजीबात नाही. पण, अशा विषयात सामान्य माणूस मनाने व शरीराने बधिर झालेला असतो आणि सुखवस्तू स्थितीत नुसता अभ्यास करणारा संभाव्य परिणामांच्या कल्पनेनेही भयभीत होऊन जातो. ही दोन जगातली तफावत आहे.
 
तफावत कुठे व कशी आहे? दोघेही आपापल्या जागी योग्यच आहेत आणि खरेही आहेत. पण, एकाला प्रसिद्धीचा झोत मिळतो आणि म्हणून त्याला विचारवंत वा संवेदनशील मानले जाते. उलट, ज्याला प्रसिद्धीच मिळत नाही, त्याचे मत दबलेले राहते. कारण दोघांच्या आयुष्यातील वस्तुस्थिती भिन्न असते. पण, यातला अधिक वास्तववादी माणूस सामान्य असतो. तो वास्तव अनुभवातून आपल्या समस्या निश्चित करतो आणि त्याचे प्राधान्य निवडून त्यानुसार निर्णय करीत असतो. उदाहरणार्थ मेट्रोमुळे त्याला गाडीतली गर्दी कमी होईल आणि वाहतुकीची सुविधा अधिक सुटसुटीत होईल, हा दावा लवकर पटतो. एकूण मुंबईची हवा शुद्ध असण्यापेक्षाही त्याच्या जगण्याशी संबंधित असलेल्या परिसरातील हवा घुसमटण्यासारखी नसली, तरी त्याच्या पर्यावरणाची शुद्धता पूर्ण होत असते. कारण त्याचे जग जगण्यात असते आणि अभ्यासक किंवा त्यांच्या अहवालाने भारावून जाणार्‍यांचे जग कागदोपत्रात सामावलेले असते. घुसमटलेल्या व्यक्तीला मोकळा श्वास घेता आला, तरी वातावरण शुद्ध झाले असेच वाटणार. उलट, ज्यांना घुसमटणेच ठाऊक नाही, त्यांना नुसते अहवाल किंवा अभ्यासाचा डेटा बघूनही गुदमरल्यासारखे वाटणार. ही दोन समाजघटकांतील खरी तफावत आहे. त्यामुळे दोघांना भेडसावणार्‍या समस्या एकदम भिन्न आहेत. एकदा हा भेद समजून घेतला, मग मतदान करणारा सामान्य नागरिक कसा विचार करून आपले मत बनवतो आणि कशा कलाने दान करतो, त्याचा अंदाज येऊ शकेल. त्याला भिडणार्‍या समस्यांचा ऊहापोह भाजपा करीत असेल आणि बाकीचे पक्ष व त्यांचे नेते केवळ अहवालाचे आधार घेऊन समस्यांचा गदारोळ करीत असतील, तर मतांचा कौल विरोधातच जाणार ना? या विधानसभा निवडणुकीत खर्‍या भेडसावणार्‍या प्रश्नांची चर्चाच झाली नाही, असे आता विविध संपादक, अभ्यासक व विरोधी नेतेच सांगत आहेत. पण, ती चर्चा करण्यापासून त्यांना कुणी रोखले होते? त्यांनी जे प्रश्न वा समस्या लोकांसमोर मांडल्या किंवा ज्याप्रकारे मांडल्या, त्यांचा सामान्य जनतेच्या जीवनाशी काडीमात्र संबंध नव्हता ना?
 
मंदी वा बंद पडणारे कारखाने किंवा उद्योग यांचा जनतेच्या प्रत्यक्ष जीवनावर होणारा परिणाम कितीसा उलगडून समजावला गेला? इतके हजार वा इतके लाख रोजगार गेले वा आत्महत्या झाल्या, असे आकडे फेकून चालत नाही. त्याला थेट जीवनातील अनुभवाशी जोडायला हवे. ते काम सत्ताधारी पक्ष करीत नसतो. खरी ती विरोधकांची जबाबदारी असते. जिथे तुम्ही प्रचाराला जाता, तिथल्या आसपासच्या गावातील आत्महत्या, बेरोजगारी वा उपासमारी यांची उदाहरणे देऊन असे प्रश्न मतदाराच्या मनावर िंबबवले, तर त्याचा परिणाम होत असतो. त्याच्या उलट, मेट्रोचे हायवेचे सर्वत्र उभे रहाणारे जाळे किंवा काही हजार-लाख लोकांपर्यंत पोहोचलेल्या सरकारी योजनांचे लाभ, सत्ताधारी सांगत गेले. त्यातला कुणीतरी लाभार्थी आसपास असेल, तर तो मुद्दा प्रभावी ठरत असतो. पण, हे लक्षात यायला जनतेशी संपर्कात राहावे लागते आणि तिच्या सुखदु:खात सहभागी व्हावे लागते. तिथूनच खरी माहिती मिळते आणि ती प्रभावी ठरू शकते. उलट, विविध अहवाल, आकडे यातून जनतेशी फारकत होऊन जाते. त्या अंधश्रद्धा असतात. कारण, ती माहिती कितीही दाहक असली तरी जनतेला भावणारी नसते, तर विचारवंत-अभ्यासकांना िंचतित करणारी असते. असे जाणकार त्यावर भावनाविवश होऊन बोलतात आणि त्यांना ज्या समस्या वाटतात, त्याच जनतेच्या समजून बोलतात, मांडतात. त्यातून एक तुटलेपण येत असते व हळूहळू असे पक्ष, विचारवंत किंवा चळवळी सामान्य जनतेपासून दुरावत जातात. त्यांचा अभ्यास वा आकडेवारी ही अंधश्रद्धा असल्याप्रमाणे काम करू लागते आणि सामान्य जनता, मतदार त्यांच्यापासून चार हात दूर होतो. कारण त्यांनी कथन केलेले सत्य असले, तरी ते सामान्य जनतेच्या नित्य जीवनातील वास्तव नसते आणि म्हणूनच लोक त्यांच्यापासून अलिप्त होत जातात. त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवून राजकारण करणारेही मग अंधश्रद्ध असल्यासारखे एकाकी पडत जातात, फसत जातात..