धेंडाईच्या गीतातूनही शेतकर्‍यांची दैनावस्था उघड

    दिनांक :28-Oct-2019
|
मोर्शी,
शेतकर्‍यांची धेंडाई दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी काढली जाते. परंतु धेंडाईकरिता गायिल्या जाणार्‍या पारंपरिक गीतातूनही शेतकर्‍यांची दैनावस्थाच प्रतीत होते. कृषक संस्कृतीशी तादात्म्य पावलेल्या या सणासाठी बळिराजाची आजही आटापिटा सुरू आहे. शेतकर्‍यांनी शेतीत पिकवलेली विविध पिके घरात येताच बाजारपेठेत पडलेले भाव, नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईकडे शासनाने फिरवलेली पाठ, अशाही परिस्थितीत घरात भरलेले धान्य बेभावात विकून शेतकरी दिवाळीच्या सणाच्या तयारीला लागलेला असतो. दिवाळी सणाची सुरुवात वसूबारस म्हणजे गाईच्या पूजेने होते. कृषक संस्कृतीत या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीच्या दुसर्‍या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणत असले तरी ग‘ामीण भागात हा दिवस गोधन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी घरोघरी असलेल्या गोधनाची वाजत-गाजत पूजाअर्चा करायची व त्याला अनुसरून गाणी म्हणायची. गाव मंदिरात गोधन नेऊन पारंपारिक वाद्याच्या तालावर फेर धरीत गवळण काढण्याची प्रथा आजही ग‘ामीण भागात पहावयास मिळते. यामध्ये म्हटल्या जाणार्‍या काही गीतांमधून तत्कालीन परिस्थितीची जाणीव होते. या गीतांमध्ये गाईचे वर्णन, गाईची थोरवी, शेतीच्या विपन्नावस्थेचे वर्णन, पेरणीपासून ते सुगीपर्यंतचे वर्णन, असे अनेक विषय रचनाकारांनी मांडलेले आहेत. दिवाळीच्या चार-पाच दिवसांपूर्वी पासूनच नदीतून लहे आणायचे, त्यांची धेंडाई करायची आणि सायंकाळी त्यात दिवे लावून गाणे म्हणत गोधनाची पूजा करायची, अशी प्रथा आजही मोर्शी शहर व ग्रामीण भागात आहे.
 

 
 
मात्र, ‘आली आली रे दिवाई’ या पहिल्याच गीतातील शेवटचे कडवे मन सुन्न करणारे आहे. शेती करून माल विकून आल्यावर पैसा व प्रत्यक्षात शेतीला लागलेला खर्च पाहून घरात निर्माण होणार्‍या चणचणीमुळे मारामारीपर्यंतचे प्रकरण घडता, असा उल्लेख या शेवटच्या कडव्यात आहे. ही जुन्या काळची असलेले परिस्थिती आजही शेतकर्‍यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. एकीकडे दिवाळी हा दिव्यांचा आनंदाचा सण मानला जातो. प्रत्येक घरात आनंदी आनंद असतो. परंतु तरीही या गीतात हे वर्णन का यावे, याचे आश्चर्य वाटते. यावरून दिवाळी हा सण कृषक संस्कृतीशी तादात्म्य पावला आहे, याचा प्रत्यय येतो. इतरांसाठी दिवाळी हा आनंदाचा सण असेल, परंतु शेतकर्‍यासाठी तो त्याकाळी आनंदाचा नव्हता आणि आजही नाही .
सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी मिळणारे वेतन भरीसभर म्हणून मिळणारे बोनस, त्यामुळे त्यांच्यासाठी दिवाळी आनंदाचा उत्सव असणे साहजिकच आहे. पण दिवस-रात्र काबाडकष्ट करूनही नैसर्गिक कोप हे पूर्वीपासून माथी असलेल्या शेतकर्‍याविषयी राज्यकर्त्यांची अनास्था असते. यामुळे शेतकर्‍यासाठी दिवाळी म्हणजे दिवाळे काढणारा सण आहे, हे निश्चित.