'ट्रिपल सीट' ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

    दिनांक :28-Oct-2019
|
प्रेम, मैत्री आणि नातेसंबंधावर काहीसे गोड, काहीसे खुसखुशीत भाष्य करणारा 'ट्रिपल सीट' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे, अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एन्टरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनीनिर्मित 'ट्रिपल सीट'ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटली आहे. संकेत पावसे दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश आणि शिवानी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या जोडीची केमिस्ट्री पडद्यावर सुंदर रंगली आहे. यामुळे कृष्णा आणि तन्वीची मिसकॉलवाली मैत्री सर्वांच्या पसंतीस उतरते आहे. पल्लवी पाटीलनंही आपली जबाबदारी चोख बजावत वृंदा ही व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे.
 
 
 
प्रविण विठ्ठल तरडे यांनी साकारलेला इन्स्पेक्टर दिवाने हा त्यांच्या फर्स्ट लुकपासून चर्चेत होता. त्यांनी या कथेत धमाल उडवत एका विनोदी भूमिकेत खतरनाक कामगिरी केली आहे. बाबू आणि पेंद्रूच्या भूमिकेत अनुक्रमे योगेश शिरसाट व स्वप्नील मुनोत यांनी अंकुशला दमदार साथ दिली आहे. यामुळे या त्रिकूटाची मैत्री लक्षात राहते. राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगले, शिल्पा ठाकरे यांनी आपल्या अभिनयाने कथेत रंग भरले आहेत. संगीतकार अविनाश – विश्वजित यांच्या वैविध्यपूर्ण संगीताने रसिकांची मने जिंकली असून 'ट्रिपल सीट' यंदाच्या दिवाळीत म्युझिकल ट्रिट ठरला आहे. कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असलेला 'ट्रिपल सीट' आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात यशस्वी ठरला आहे.