हरयाणात ‘आहे मनोहर तरी...’

    दिनांक :29-Oct-2019
|
हरयाणाचे जाटेतर मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्‌टर यांनी दुसर्‍यांदा शपथ घेत इतिहास घडवला आहे. हरयाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले नाही, बहुमतासाठी भाजपाला सहा जागा कमी पडल्या. पण, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपले कसब पणाला लावत, काही अपक्ष आमदार आपल्या बाजूला खेचून आणत दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीशी आघाडी करत, राज्यात मनोहरलाल खट्‌टर यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या सरकारचा मार्ग प्रशस्त केला, त्याची परिणती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यात भाजपा आणि जननायक जनता पार्टीच्या सरकारच्या शपथविधीत झाली. खट्‌टर दुसर्‍यांदा खर्‍या अर्थाने हरयाणाचे ‘जननायक’ झाले. खट्‌टर यांच्यासोबत दुष्यंत चौटाला यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
                                             
 
राज्यपालांच्या सूचनेनुसार, खट्‌टर यांना आता विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागेल, त्यानंतर खट्‌टर आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतील. खट्‌टर यांची ओळख, रा. स्व. संघाचे प्रचारक, अशी आहे. त्यामुळे एका प्रचारकाने दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत, संघाचे प्रचारक, त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली जाते, ती प्रामाणिकपणे पार पाडतात, हे दाखवून दिले. याआधी संघाचे प्रचारक म्हणून नरेंद्र मोदी यांचे गुजरातचे मुख्यमंत्री ते देेशाचे पंतप्रधान, असा गौरवास्पद प्रवास देशाने पाहिला आहे.
हरयाणाची ओळख ‘जाटबहुल राज्य’ अशी आहे. या राज्यात जाटेतर व्यक्तीने दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपद भूषवावे, ही बाब वाटते तितकी सोपी नाही. मात्र, तो चमत्कार भाजपाने करून दाखवला आहे.
मनोहरलाल खट्‌टर हे तसे साधारण कुटुंबातील. सुरुवातीला भाजी विकून त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. त्यांना डॉक्टर व्हायचे होते, पण एखाद्या रुग्णाची नाडी पकडण्याऐवजी नियतीने त्यांच्यावर हरयाणातील जनतेची नाडी पकडण्याची मोठी जबाबदारी सोपवली. डॉक्टर म्हणून काही मूठभर लोकांच्या प्रकृतीत सुधारणा करण्याऐवजी मुख्यमंत्री म्हणून हरयाणातील काही कोटी लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचे दायित्व खट्‌टर यांनी मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या पहिल्या कार्यकाळात यशस्वीपणे सांभाळले.
 
1977 मध्ये खट्‌टर रा. स्व. संघाच्या संपर्कात आले. संघरूपी परिसाने खट्‌टर यांच्या जीवनाचे सोने झाले. 1980 मध्ये खट्‌टर यांनी प्रचारक म्हणून जाण्याचा निर्णय घेतला. प्रचारक म्हणून देशसेवा करण्याचा पण करतानाच खट्‌टर यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेेतला. 14 वर्षे संघाचे प्रचारक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यानंतर खट्‌टर यांना भाजपात पाठवण्यात आले. हरयाणा भाजपाचे संघटनमंत्री म्हणून खट्‌टर यांनी 1994 मध्ये काम सुरू केले. 2014 पर्यत म्हणजे 20 वर्षे खट्‌टर यांनी संघटनमंत्री म्हणून हरयाणात भाजपाचा पाया मजबूत केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हरयाणा भाजपाच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून खट्‌टर यांनी आपला ठसा उमटवला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलवून टाकला. सत्ताधारी असलेल्या कॉंग्रेसला लोकांनी विरोधी पक्षात बसवले; तर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडे सत्ताधारी पक्ष म्हणून जबाबदारी सोपवली.
 
2015 मध्ये हरयाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. विशेष म्हणजे हरयाणा आणि महाराष्ट्र ही तशी कॉंग्रेसचा गड समजली जाणारी राज्ये. पण, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने या दोन राज्यांतही चमत्कार घडवला. या दोन राज्यांतील निवडणुकीत भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा आपला उमेदवार जाहीर केला नव्हता, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच भाजपाने या निवडणुका लढवल्या. हरयाणात भाजपाने स्वबळावर 47 जागा जिंकत बहुमत मिळवले आणि मनोहरलाल खट्‌टर यांना भाजपाने मुखमंत्री बनवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
खट्‌टर हे हरयाणासारख्या जाटबहुल राज्याचे मुख्यमंत्रिपद पाच वर्षे सांभाळू शकतील काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला. महाराष्ट्रातही भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीस, मराठाबहुल महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतील काय, असा प्रश्न पडला होता. पण, आश्चर्य म्हणजे दोघांनीही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपापल्या राज्याचे नेतृत्व करत आपल्या राज्याला विकासाच्या मार्गावर नेले, एवढेच नाही, तर सलग दुसर्‍यांदा सत्ताही मिळवून दिली. त्याचे बक्षीस या दोघांना मिळणे अपेक्षितच होते.
 
मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या पहिल्या कार्यकाळापेक्षा खट्‌टर यांना यावेळी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कारण, यावेळी राज्यात भाजपाचे एकट्याचे नाही, तर आघाडीचे सरकार आहे. ज्या जननायक जनता पार्टीच्या पािंठब्यावर भाजपाने सत्तेचे सोपान गाठले, त्याचे नेते दुष्यंत चौटाला खट्‌टर यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे खट्‌टर यांना यावेळी आघाडीच्या सरकारचे नेतृत्व करताना आपल्या आघाडीतील मित्रपक्षाला सांभाळून घ्यावे लागणार आहे.
सरकारमध्ये असल्यामुळे चौटाला आपल्या पक्षाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतील, तर भाजपाला आपला अजेंडा राबवावा लागणार आहे. परिणामी, हितसंबंधांचा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांना किमान समान कार्यक्रम तयार करून सरकारची वाटचाल सुरू ठेवावी लागेल. यातून हितसंबंधांचा संघर्ष टळू शकेल आणि सरकारची वाटचाल यशस्वीपणे होऊ शकेल.
 
मुळात आघाडी सरकार बनवणे सोपे असते, पण ते पाच वर्षे चालवणे कठीण असते. महाराष्ट्रात याचा अनुभव भाजपाने घेतला आहे. महाराष्ट्रात शिवसेना सरकारमध्ये असतानाही तिची वागणूक भाजपासोबत विरोधी पक्षांपेक्षाही कठीण होती. अनेकवेळा तर शिवसेना सत्ताधारी पक्षाचा घटकपक्ष आहे की विरोधी पक्ष, हे ओळखू येत नव्हते! जननायक जनता पार्टीची वाटचाल हरयाणात शिवसेनेसारखी होणार नाही, याची काळजी मनोहरलाल खट्‌टर यांना घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्‌टर हे जाटेतर, तर उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे जाट आहेत. त्यामुळे खट्‌टर यांचे मंत्रिमंडळ जाट आणि जाटेतर राजकारणातील संघर्षाचा केंद्रिंबदू ठरू नये, याची काळजी दोघांनाही घ्यावी लागणार आहे.
यावेळी खट्‌टर यांना, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्याही आव्हानाचा सामना करावा लागला. आधीच्या विधानसभेत कॉंग्रेस तिसर्‍या स्थानावर होती, कॉंग्रेसच्या जागाही कमी होत्या. यावेळी कॉंग्रेसच्या जागा दुपटीने वाढत 31 झाल्या आहेत. त्यामुळे यावेळी कॉंग्रेस आक्रमक विरोधी पक्षाच्या पवित्र्यात राहणार आहे. भूिंपदरिंसह हुडा विरोधी पक्षनेते झाले, तर ते खट्‌टर सरकारवर जोरदार हल्ला चढवू शकतात.
 
जाट आणि जाटेतर राजकारणाला हवा देत हुडा, उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची राजकीय अडचण करू शकतात आणि यातून खट्‌टर सरकारला अडचणीत आणू शकतात. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्री खट्‌टर यांना खूप सावध राहावे लागणार आहे. एकाच वेळी त्यांना मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या, तर विधानसभेत भूिंपदरिंसह हुडा यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. यातच खट्‌टर यांच्या राजकीय कौशल्याचा आणि संयमाचा कस लागणार आहे. यात खट्‌टर  उतरतील, याबाबत शंका नाही. कारण, राजकारणात येण्याच्या आधी खट्‌टर संघाचे प्रचारक होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत आपले ध्येय कसे गाठावे, हे त्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही!