नदीत अडकलेल्या अडीच हजार मेंढ्या आणि ६ मेंढपाळांना वाचविण्यात यश

    दिनांक :29-Oct-2019
|
गोदावरी नदीत अडकलेल्या अडीच हजार मेंढ्या आणि ६ मेंढपाळांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने काढले सुखरूप
अहेरी,
२६ ऑक्टोबर रोजी रात्री सिरोंचा तालुक्यातील सुकंरअल्ली येथील गोदावरी नदीच्या विस्तृत पात्रात सुमारे २ हजार ५०० मेंढ्या -बकऱ्या व ६ मेंढपाळांना चहू बाजूने पाण्याने वेढल्याने अडकून पडले होते. या बाबीची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्ष गडचिरोली येथे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ मिळाली. स्थानिक महसूल, पोलीस प्रशासनाने समन्वय साधत मोहीम राबवून काल २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सर्व मेंढ्या व सहाही मेंढपाळांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
 
 
 
२७ ऑक्टोबरला आपत्ती व्यवस्थापन च्या चमूने घटनास्थळ गाठले पण मेंढपाळ मेंढ्यांना सोडून यायला तयार नव्हते. यामुळे त्यांच्याकडे पुरेसे अन्नधान्य असल्याची खात्री करून लाईफ जॅकेट्स देण्यात आले व नदीकिनारी रबर बोट व पथक तयार ठेवण्यात आले. रात्री मेडिगड्डा धरणाच्या वरील भागातील श्रीरामसागर व येलमपल्ली धरणातील पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने चिंताजनक स्थिती होती . परंतु जिल्हा प्रशासन - स्थानिक प्रशासन-मेडिगड्डा प्रकल्प यांच्या मदतीने ही कार्यवाही ४८ तासानंतर सुखरूप पार पाडली.
या मोहिमेत अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय, गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख गायकवाड, स्वामी सिरोंचा, तहसिलदार रमेश जसवंत सिरोंचा, कार्यकारी अभियंता मेडिगड्डा, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे आसरअल्ली, नायब तहसिलदार हमीद सय्यद, तलाठी खान, तलाठी मुन व इतर पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.