नवरात्रीची विविधता

    दिनांक :03-Oct-2019
अंजली आवारी
 
 
विविधतेने नटलेल्या भारतात नवरात्रोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करून तीची कृपादृष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न भक्तांकडून होत असतो. यात प्रत्येक प्रदेशातील रितीरिवाजांप्रमाणे प्रत्येकाची उत्साह साजरा करण्याची पद्धत निरनिराळी आहे.
 

 
 
उत्तर भारतातील नवरात्र उत्सव
उत्तर भारतात नवरात्र उत्सव रावणावर प्रभू रामचंद्रांचा विजय म्हणून साजरा केला जातो. दसर्‍याला रामलीला नाट्याचे सादरीकरण करून उत्सवाची सांगता केली जाते. विजयादशमी हा दिवस दृष्ट शक्तीवर विजय प्राप्त करून दुष्ट प्रतिमांचे दहन केले जाते. उत्तरेकडे या पावन पर्वावर ऐेकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.
 
 
पूर्व भारतातील नवरात्र उत्सव
भारताच्या इशान्येकडील राज्यात व पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस ‘दुर्गा पुजा’ म्हणून साजरे केले जातात. आठवा दिवस हा परंपरेनुसार दुर्गाष्टमीचा असतो. पूर्व भारतात नवरात्र सर्वत्र दुर्गापुजा म्हणून साजरी केली जाते.
 
 
पश्चिम भारतातील नवरात्र उत्सव
पश्चिम भारत विशेषत: गुजरात राज्यात नवरात्र उत्सव गरबा आणि दांडिया रास नृत्याच्या माध्यमातून साजरा केला जातो. गरबा हा नृत्याचा अत्यंत मोहक प्रकार असून एका कलशात ठेवलेल्या दिव्याभोवती वर्तुळाचा फेर धरून नृत्य केल्या जाते. तसेच छोट्या सुशोभित, रंगीबेरंगी बांबूच्या ‘दांडीया’ हातात घेऊन नृत्य केल्या जाते. गुजरात मधील नवरात्रोत्सव हा गरबा व दांडीयामुळे अतिप्रसीध्द आहे.
 
 
दक्षिण भारतातील नवरात्र उत्सव
दक्षिण भारत व विशेषत: कर्नाटकमध्ये नवरात्र म्हणजे ‘दसरा’. नवरात्रीच्या नऊही रात्रीला पुराणकथेवर आधारीत चालणारा नाट्यमय कार्यक्रम म्हणजे ‘यक्षगान’ सादर केला जातो. दूष्टांवर विजयाचे प्रतिक म्हणून मोठ्या थाटामाटात ‘म्हैसूर दसरा’ साजरा केला जातो. हा दसरा म्हैसूर राजघराण्याकडून आयोजित करून ‘जम्बो सवारी’ हे त्याचे मुख्य आर्कषण असते.
दक्षिण भारतातील बर्‍याच भागात महानवमीच्या दिवशी ‘आयुध पूजा’ मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. शेतीची अवजारे, वाहने, यंत्रे, उपकरणे यांचे पूजन केले जाते.
 
 
उपवास का करावे ?
भारतीय पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये उपवास हे पचनाची आग व भूक प्रज्वलित करणारे महत्त्वाचे साधन मानले जाते. उपवास हा शरीर शुद्ध करण्यसाठी केला जातो. विशिष्ठ प्रकारच्या अन्नाच्या सेवनाने शरीर शुद्ध होण्यास मदत होते. म्हणून नवरात्रीत फळ, ताक, फळांचा रस वा पचायला हलके अन्न सेवन केले जाते.
 
 
गरबा का खेळला जातो?
हिंदू धर्मात टाळ्यांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तीसंपूर्ण गुणगान भजन स्वरूपात करणे म्हणजे ‘गरबा खेळणे’. टाळ्यांच्या माध्यमातून ध्यानस्त श्री दुर्गामातेला जागृत करून तीचे आवाहन केले जाते. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते व वातावरणात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. तसेच टाळ्या वाजविल्याने संपूर्ण शरीराचे अॅक्युप्रेशरचे पॉईंट दाबल्या जातात व त्याचा उपयोग शरीर शुद्धीसाठी व व्याधी दूर होण्यासाठी होतो. यामुळे गरबा हा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम व्यायाम आहे.
 
 
अशी ही नवरात्र सर्वांसाठी आनंद व उत्साह घेऊन येणारी ठरते. संपूर्ण भारतभर श्री दुर्गामातेचे आगमन मोठ्या उत्साहात करून तीची मनोभावे सेवा करून तिचे तेज व प्रसन्नता प्राप्त करण्याची प्रत्येकाची इच्छा असते.
अशा या उत्साहमय नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा!!!