सुंदर देशा, स्वच्छ देशा, गांधींच्या देशा...

    दिनांक :03-Oct-2019
 
1930 साली महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला. ‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया’ अशी कविता गदिमांनी केली. कृश देहाचा एक वृद्ध चालू लागायचा आणि त्याच्या मागे सारा देश झपाटल्यागत पावले टाकत असायचा... इंग्रजांनी अटकसत्र आरंभले. पुढच्या सत्याग्रहींना अटक केली की मागे दुसरी फळी तयारच असायची. सविनय कायदेभंग म्हणून केवळ एक मूठ मीठ उचलायचे. 60 हजार भारतीय अटकेत गेले. तुरुंग कमी पडले आणि मग मिठावरचा हा कर कमी करण्यात आला... नेतृत्व सच्छील असेल तर जनता नि:शस्त्र मरायलाही तयार असते. त्याने जे केले ते करायला तयार असते. केवळ मूठभर मीठ उचलण्याची ही साधी वाटणारी कृती हजारो सामान्य भारतीयांना स्वत्वाची जाणीव करून देत सत्त्व जागृत करणारी होती. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्यही मावळत नव्हता अशा ब्रिटिशांच्या साम्राज्याचा पाया खचला होता... असे होते, हा करिश्मा होत असतो, जेव्हा नेतृत्वाला स्वत्व आणि सत्त्वाची जाणीव असते आणि ते त्याने असिधारा व्रत म्हणून या देशाला समर्पित केलेले असते. महात्मा गांधींनंतर असा करिश्मा या देशात झाला नाही. आणिबाणीनंतर जयप्रकाश नारायण या पुन्हा गांधींची ज्योतच ज्यांच्यात प्रज्वलित झाली होती त्यांनी देशाला प्रकाशाची वाट दाखविली. नंतर बापूंच्या नावाने सलग सत्ता उपभोगणार्‍यांनी जमिनीवर पाय टेकविलेच नाहीत. त्यामुळे नेत्यांच्या मागे राष्ट्र, अशी स्थिती कधीच दिसली नाही.
 
 
 
 
आता ती पुन्हा दिसते आहे. गांधींच्या गुजरातेतून आलेल्या राष्ट्रपुत्राच्या मागे जनता राजकीय सत्तेच्या परिप्रेक्ष्याच्या पलीकडे जाऊन एकवटली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावे आणि जनतेने त्याचे अनुकरण करावे, असे आता झाले आहे. 2014 साली सत्तेत आल्यावर त्यांनी केवळ राजसत्ताच सांभाळली असे नाही, या देशाची समाज, संस्कृती यांचेही एक अधिष्ठान आहे आणि त्याचेही पोषण आपल्याला करायचे आहे, ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली. म्हणून त्यांनी पहिल्या सत्रात जनतेला अनेक हाका दिल्या आणि देशात कायद्याविना कृतीत शुचिता आली. विवेक जागृत झाला. हे परिवर्तन कायमचे असते. मोदींनी पहिली हाक दिली ती स्वच्छ भारताची. पुन्हा एकदा तो करिश्मा दिसला की, नेता सांगतो आहे आणि जनता त्याला कृतिपूर्ण स्वीकृती देते आहे. कारण हा नेतादेखील वांझोट्या हाका देत नाही. आधी तो ते करतो आणि नंतर त्याचे अनुकरण जनता करते. मोदींनी आधी हातात झाडू घेतला. त्या वेळी त्यांचे टीकाकार म्हणाले, ही नौटंकी आहे. याने काय होणार? फोटो काढून घेण्यापुरते चार नेते हातात झाडू घेतील. पुन्हा जैसे थे! पण... समर्पित भावाने नेता वागत असेल तर जनतेला ते वेगळे सांगावे लागत नाही. गेल्या पाच वर्षांत स्वच्छता हा भाव भारतीय जनतेच्या मनात पाझरलेला दिसला.
 
नेणिवेच्याही पातळीवर स्वच्छता हा अनुभूतीचा भाग झाला आहे. सार्वजनिक पातळीवर स्वच्छता पाळली जाऊ लागली आहे. ती एक चळवळ झालेली आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र जनतेला कळलेला आहे. सामाजिक पातळीवरच्या कृतींची प्रेरणा ही कायद्याच्या परिघातली, दंडाच्या भीतीतून निर्माण होत नाही. त्यासाठी आपुलकीने आणि सच्छीलतेने सांगणारा कुणी हवा असतो. ते आता घडले. सारा देश अगदी स्वच्छ झाला असे नाही; पण ती जाणीव निर्माण झाली आहे. म्हणून सार्वजनिक ठिकाणांवर स्वच्छता पाळली जाते. जो पाळत नाही त्याचा कान त्याचे सोबतीच खेचताना दिसतात. मागच्या आठवड्यात अमेरिकेत दाखल झाल्यावर पुष्पगुच्छ देऊन मोदींचे स्वागत करण्यात आले आणि त्या वेळी फूल-फांदी खाली पडली. मोदींनी अगदी सहजपणे ती उचलून मागच्या रक्षकाच्या हाती दिली. ती कचर्‍याच्या पेटीत टाकली गेली. सार्‍या जगाने ही कृती पाहिली. त्या वेळी हे सार्थपणे अधोरेखित झाले की, मोदी केवळ गांधींच्या गुजरातचे नाहीत, तर त्यांनी गांधी खरोखरीच समजून घेतला आहे. स्वत:त भिनवून घेतला आहे. त्या महात्म्याचा उपयोग केवळ त्याचा वारसा सांगत मते मागण्यासाठी करायचा नाही, तर हा देश एका सूत्रात बांधण्यासाठी करायचा आहे, हेही मोदींना कळले आहे. स्वच्छता ही जात, धर्म, पंथ, प्रदेशांच्या भेदाच्या पलीकडे जाऊन अखिल मानवजातीला समान पातळीवर आणणारी बाब आहे.
 
आता महात्मा गांधींची सार्धशती भाजपाच्या सत्ताकाळात आली आहे आणि ती खर्‍या अर्थाने सार्थकी लागली आहे, असेच म्हणावे लागणार आहे. पंतप्रधानांनी आता देश प्लॅस्टिकमुक्त करण्याची हाक दिलेली आहे. प्लॅस्टिकच्या गुलामीतून आपल्याला मुक्त व्हायचे आहे आणि त्यासाठी गांधीच मार्गदर्शक ठरू शकतात. त्यांच्या काळात प्लॅस्टिक ही समस्या नव्हती. इंग्रजांची गुलामगिरीच या देशाला ग्रासून उरली होती. त्यासाठी महात्मा गांधी यांनी नि:शस्त्र क्रांतीचे अस्त्र या देशातल्या सामान्य माणसाच्या हाती दिले. असहकार, सत्याग्रह ही शस्त्रे दिली. आता प्लॅस्टिकच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी गांधींच्याच मार्गाने जावे लागणार आहे. प्लॅस्टिकला असहकार आणि प्लॅस्टिकमुक्तीसाठी सत्याग्रह करावा लागणार आहे. मोदींनी दिलेली हाक तीच आहे. हा देश स्वच्छ व्हावा म्हणून कचरामुक्त, घाणमुक्त भारताची हाक दिली. सद्वर्तन वाढावे यासाठी भ्रष्टाचारमुक्त भारताची हाक दिली आणि त्यासाठी सरकारच्या पातळीवर करायचे ते कडक उपायदेखील, कसलाही मुलाहिजा न करता केले. या देशाला घातक असलेल्या प्रत्येक बाबीपासून हा देश मुक्त करण्याचा चंगच मोदींनी बांधला आहे. इंग्रजांना घालविल्यानंतर सत्तेत आलेला कॉंग्रेस पक्ष विसर्जित करावा, असे महात्मा गांधीच म्हणाले होते. कारण त्यांना माहिती होते की, सत्तेतल्या कॉंग्रेसींना इंग्रजांचा प्रादुर्भाव होईल आणि हा देश कॉंग्रेसच्या गुलामगिरीत जाईल... नेमके तसेच झाले. म्हणून मोदींनी कॉंग्रेसमुक्तीची हाक दिली आणि या देशाच्या जनतेने ती ऐकली.
 
हा देश प्रदूषणमुक्त व्हावा, असाही आवाज देण्यात आला आहे. प्रदूषण मानसिक आणि सांस्कृतिकही असते. त्या पातळीवरही ‘मोदी विचार’ कार्यरत झाला आहे. आता हा देश आरोग्यदायी, बलशाली झाला पाहिजे म्हणून स्वच्छतेसोबतच त्यांनी योग दिनही सुरू केला. हा देशच नाही, तर जग हा दिवस पाळते. आता हा देश गोदरीमुक्त झाला आहे, अशी घोषणा पंतप्रधानांनी गुजरातेत आज, देशभरातील 20 हजार ग्रामप्रमुखांच्या समोर केली आहे. हे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी गेली पाच वर्षे काम सुरू होते. गावात घरोघरी शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात आले. उघड्यावर कुणी शौच करू नये यासाठी जागृती करण्यात आली. त्यासाठी दंडही करण्यात आला. गावाच्या एकूणच सुदृढतेसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर कुठल्याही गावात शिरल्यावर गावाच्या प्रात:उत्सर्जनाच्या तीव्र घाण वासानेच स्वागत व्हायचे. गावकर्‍यांचे आरोग्य त्यामुळे खराब होते. विशेषत: स्त्रियांना एकतर पहाटेच्या िंकवा रात्रीच्या अंधारातच विधीसाठी जावे लागत असल्याने त्यांना पोटाचे विकार होतात. त्यामुळे गावे गोदरीमुक्त होणे अत्यंत आवश्यक होते. मोदींनी देश गोदरीमुक्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काळात त्या दिशेने प्रवास गतीने सुरू होईल. गौतम बुद्धाचा, महात्मा गांधींचा हा देश स्वच्छ, सुंदर आणि निकोप मनाचा होण्याकडे, प्लॅस्टिकच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याकडे सुरू झालेल्या या प्रवासाचे आपण सारे कृतिपूर्ण साक्षीदार असणार आहोत!