नेत्यांची कानउघाडणी करणारी ‘ती’

    दिनांक :03-Oct-2019
नितीश गाडगे 
नुकतेच अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्राचे जागतिक हवामान संमेलन पार पडले. यावेळी ग्रैता तुनबैर या एका 16 वर्षाच्या मुलीने जगातल्या सर्वच मोठ्या नेत्यांची तिखट शब्दात कान उघडणी केली. त्यामागचे कारण म्हणजे जगभरात झपाट्याने होत असेल हवामान बदल हे आहे. ग्रैता तुनबैर ही स्वीडनची नागरिक आहे. ग्रैताने संयुक्त राष्ट्रांच्या संमेलनात अतिशय संवेदनशील भाषण दिले. जगभरात झपाट्याने होत असलेल्या हवामान बदलला तिने सर्वच मोठ्या नेत्यांना जबाबदार ठरविले आहे. राजकारणापलीकडे जात कुठल्याही नेत्याने बदलत्या हवामानाबद्दल कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. याचा परिणाम येणार्‍या पिढीला भोगावा लागणार आहे. नेत्यांच्या खोट्या आश्वासनांनी जगात कुठलाही बदल घडणार नसल्याची तीव्र टीका ग्रैताने केली. 

 
 
ग्रैता तुनबैरची ‘स्कूल स्ट्राईक फॉर क्लायमेट अँड फ्यूचर फॉर फ्रायडे’ ही मोहीम जगभरात प्रसिद्ध आहे.
 

 
 
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून तिने ही मोहीम सुरू केली. सुरवातीला तिच्या या आंदोलनाला कुणीच प्रतिसाद दिला नाही. ती दर शुक्रवारी स्वीडनच्या संसदेबाहेर हवामान बदलाविरोधात हातात फलक घेऊन एकटीच निषेध नोंदवायची, परंतु आता जगभरातल्या लाखो विद्यार्थ्यांचा म्हणजेच नव्या पिढीचा तिला पाठिंबा मिळतोय्‌. पृथ्वीच्या प्रदूषणात इतक्या झपाट्याने वाढ होत आहे की, याचा गंभीर परिणाम येणार्‍या पिढीला भोगावा लागणार आहे. नवीन पिढीसाठी पर्यावरणाच्या बाबतीत कुठल्याच देशाने ठोस पावले न उचलल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. ऊन, पाऊस आणि थंडी हे तिन्ही दरवर्षी एक नवा विक्रम नोंदवत आहेत. जगभरातले सर्वच देश आपला आर्थिक स्थर वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असले तरी पर्यावरणाच्या बाबतीतला त्यांचा हलगर्जीपणा ग्रैता तुनबैर हिच्या भाषणाच्या निमित्याने चव्हाट्यावर आला आहे.
 
 
पर्यावणाचे रौद्ररुप नुकतेच पुणे पुरात आपल्याला पाहायला मिळाले. योग्य नियोजन आणि शिस्त यामुळे आपला देश सुद्धा स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतो. आपले सरकार यासाठी झाडे लावा, जलयुक्त शिवार यासारख्या अनेक योजना सतत राबवत असते परंतु एक नागरिक म्हणूनही आपण पर्यावरणाचे काही देणे लागतो म्हणून त्याची जपणूक करणे हे आपलेही कर्तव्य आहे.