निवडणूक : महाराष्ट्राची आणि हरयाणाची...

    दिनांक :03-Oct-2019
दिल्ली वार्तापत्र   
 
श्यामकांत जहागीरदार  
 
महाराष्ट्र आणि हरयाणात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. 4 ऑक्टोबर ही अर्ज भरायची अंतिम तिथी आहे. 5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. म्हणजे 7 ऑक्टोबरला निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झालेले असेल.
 
 
21 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांत मतदान होणार असल्यामुळे प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या हातात आता फक्त 15 दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे पुढचे 15 दिवस महाराष्ट्र आणि हरयाणात प्रचारयुद्ध शिगेला पोहोचणार आहे.
2014 ची विधानसभा निवडणूक वेगवेगळी लढवणार्‍या भाजपा आणि शिवसेनेने यावेळी युती करत विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने आपली सव्वाशे उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेनेनेही 124 उमेदवारांची आपली पहिली आणि अंतिम यादी जाहीर केली.
 
2014 मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसही अलगअलग लढले होते. यावेळी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागा लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यावेळी चार राजकीय पक्षांमध्ये नाही, तर दोन आघाड्यांत निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी आघाडी केली असली, तरी दोन्ही पक्षांत प्रचंड मरगळ आली आहे. या दोन पक्षांतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपा वा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे कोणताही उत्साह या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये दिसत नाही. निवडणूक लढवली पाहिजे, म्हणून हे दोन्ही पक्ष रिंगणात उतरले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एकप्रकारे लढाईपूर्वीच या दोन पक्षांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत.
हरयाणात कॉंग्रेसला एकट्यालाच निवडणूक लढवावी लागत आहे. राज्यातील कॉंग्रेसमध्ये गटबाजीही मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील कॉंग्रेस, माजी मुख्यमंत्री भूपेंद्रिंसह हुडा आणि माजी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अशोक तंवर यांच्या गटात विभागली गेली आहे. तिकीटवाटपातून अशोक तंवर गटाला बाजूला सारण्याचा आणि आपला वरचष्मा ठेवण्याचा भूपेंद्रिंसह हुडा यांचा प्रयत्न आहे. त्याला तंवर तेवढाच प्रखर विरोध करत आहेत. त्यामुळे या गटबाजीचा परिणाम राज्यातील कॉंग्रेसच्या स्थितीवर होणार आहे.
 
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 कलम रद्द केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण बदलून गेले आहे. देशाच्या दृष्टीने ही ऐतिहासिक अशी घटना म्हणावी लागेल. त्यामुळे भाजपा याचा निवडणुकीत वापर करू शकते. निवडणुकीत आपली उपलब्धी सांगून मते मागितली जातात. जम्मू-काश्मिरातून 370 कलम रद्द करणे, ही मोदी सरकारची ऐतिहासिक अशी उपलब्धी आहे. आजपर्यंत जे कोणत्याही सरकारला जमले नाही, ते मोदी सरकारने करून दाखवले. मात्र, यावरून कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या पोटात दुखू लागले आहे. भाजपाने 370 चा निवडणूक प्रचारात वापर करू नये, अशी मागणी कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, निवडणुकीत कोणत्या मुद्याचा वापर करायचा, हा राजकीय पक्षांचा अधिकार आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगत आयोगाने ही मागणी फेटाळून लावली.
महाराष्ट्रात 288, तर हरयाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. या दोन्ही राज्यांत मिळून विधानसभेच्या 378 जागा होतात, 378 जागांच्या प्रचारासाठी 370 चा मुद्दा कामात येणार, हा योगायोग म्हणावा लागेल.
 
 
 
 
 
महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यांत तसेच तेथील राजकारणात फारकाही साम्य नाही. 2014 ची विधानसभा निवडणूक या दोन राज्यांत एकत्रच झाली होती. या दोन्ही राज्यांत त्या वेळी कॉंग्रेसची राजवट होती. या दोन्ही राज्यांत भाजपाने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवली होती.
दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणूक भाजपाने स्वबळावर लढवली होती आणि दोन्ही राज्यांत विजय मिळवला होता. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 पैकी 123 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, मात्र बहुमत भाजपाजवळ नव्हते. हरयाणात 90 पैकी 45 जागा भाजपाने िंजकल्या होत्या. महाराष्ट्रात भाजपाने सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन केले, राष्ट्रवादी कॉंग्रेसने न मागता भाजपाला पािंठबा दिला होता. आधी विरोधी पक्षात असलेली शिवसेना नंतर भाजपासोबत सत्तेत सहभागी झाली होती. हरयाणात अपक्षांच्या मदतीने भाजपाने सरकार बनवले.
 
या दोन्ही राज्यांत भाजपाने प्रस्थापित नेते बाजूला सारत नव्या दमाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले; तर हरयाणात नेतृत्वाची धुरा ज्येष्ठ अशा मनोहरलाल खट्टर यांच्याकडे सोपवण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बनण्यापूर्वी हे दोघे साधे मंत्रीही नव्हते. मात्र, या दोघांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ते जाणवूही दिले नाही. दोघांनीही पाच वर्षांच्या काळात स्थिर आणि सक्षम नेतृत्व देत, आपापल्या राज्यांना विकासाच्या मार्गावर नेले. आज या दोघांच्या नेतृत्वात भाजपा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे.
 
दोन्ही राज्यांतील आपल्या उमेदवारांच्या याद्या भाजपाने जाहीर केल्या. महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावाचा समावेश होता. हरयाणाच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष सुभाष बराला यांचा समावेश आहे. म्हणजे दोन्ही राज्यांतील आपल्या अध्यक्षांना भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सामान्यपणे कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा 30 टक्के नवीन चेहरे देत असते. महाराष्ट्र आणि हरयाणात भाजपाने काही आमदारांची तिकिटे कापली असली, तरी बहुतांशी जुन्याच आमदारांवर विश्वास दाखवला आहे. आमदारांमध्ये मोठा बदल भाजपाने दोन्ही राज्यांत केला नाही.
 
दोन्ही राज्यांत भाजपाच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर राहणार आहे. महाराष्ट्रात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही प्रचाराची धुरा राहणार आहे. नवीन वर्षात दिल्ली आणि झारखंड या दोन राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या दोन राज्यांतील निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून भाजपा या निवडणुकीकडे पाहात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत या तीन राज्यांतील पराभवाचा बदला भाजपाने घेतला.
 
महाराष्ट्र आणि हरयाणात विजयाची पूर्ण खात्री असली, तरी कोणताही धोका पत्करण्याची भाजपाची तयारी नाही. या दोन राज्यांत भाजपा पूर्ण तयारीने निवडणुकीला सामोरे जात आहे. कोणतीही निवडणूक निवडणुकीसारखीच लढवायची, अशी भाजपाची भूमिका आहे. निवडणुकीत आत्मविश्वास आवश्यक असला, तरी अतिआत्मविश्वास नेहमीच अडचणीत आणत असतो, याची भाजपाला जाणीव आहे. त्यामुळे प्रयत्नात कोणतीही कसर राहणार नाही, याची खबरदारी भाजपा घेत आहे.
या दोन राज्यांतील निवडणुकीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची बारिक नजर आहे. अमित शाह भाजपाचे सर्वाधिक यशस्वी अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात बहुतांश राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही अपवाद वगळता भाजपाने विजय मिळवला आहे. त्यामुळे या दोन राज्यांतही विजयापेक्षा काहीही कमी अमित शाह यांना मान्य नाही.
9881717817