ऑनलाईन दृक्‌श्राव्य जगाची वेगळीच खिडकी!

    दिनांक :30-Oct-2019
|
मध्यंतरी ‘कॅपर्नम’ हा इराणी सिनेमा पाहिला. अर्थात नेटफ्लिक्सवर पाहिला. मोबाईलवर नेटफ्लिक्स पाहणार्‍यांत आपली गणना कधी झाली, हेही मला आता आठवत नाही. अनेकांनी हा चित्रपट बघाच, असे आवर्जून सांगितले. त्या अनेकांत अनेक दिग्गजांचा अंतर्भाव होता. पुरु बेर्डे म्हणाले, मुंबईला काही लेखक मित्र आहेत. मालिका, चित्रपटांसाठी व्यावसायिक लेखन करतात. अत्यंत विवेकी हळवेपणाने काही विषय हाताळतात. वाचन करतात, दृश्य माध्यमांतला व्यासंगही जोपासतात. त्यांनीही या चित्रपटाबद्दल सांगितले. पुण्याला ललित कला विभागात नाटक या विषयात पदवी करणारी लेकही म्हणाली, तू पाहिला नाहीस का अजून? मग पाहिलाच. तसेही इराणी सिनेमे छानच असतात. अत्यंत साधे वाटणारे विषय इतक्या सखोल जाणिवेने मांडलेले असतात की, आपण आपल्या आयुष्याकडे फार गांभीर्याने बघतच नाही, असे वाटते. त्यातही मग ते त्या घटनांचे इतके नाजूक पदर सोलून काढत त्याची इतकी नितांत सुंदर आणि पारदर्शक मांडणी आणि तीही खूप सहजपणे करणे म्हणजे काय असते, हे इराणी सिनेमांनी दाखविले आहे. माजीद माजिदीचे सगळेच सिनेमे तो मांडत नेत असताना उत्कटता कुठेच पातळ झालेली दिसत नाही. त्यांचा डिल्ड्रन ऑफ हेवन, सॉंग ऑफ स्पॅरोज पाहिल्यावर दरवेळी एका वेगळ्या अनुभूतीपर्यंत माजिदी आपल्याला घेऊन जातात. आता त्यांचा भारतीय कलाकारांना घेऊन आलेला ‘बियॉंड दी क्लाऊड’ तसलाच. त्यात शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टरने काम केले आहे. 

 
 
अशावेळी मग आपल्या चित्रपटांची चर्चा आपसूकच निघते. ती आता करायची नाही. आपल्याकडे सिनेमाच्या यशाचे मोजमाप पैशांतच केले जाते. लावलेला पैसा निघायला हवा, इतकेच काय ते गणित असते. प्रोड्युसरचा पैसा निघाला पाहिजे ना, असे मोठमोठे नट आणि दिग्दर्शकही म्हणतात. त्यामुळे विकल्या जाईल, असे काही त्यात घाला, असा आग्रह असतो. सिनेमात काय पैसाच लावला गेला असतो का? लेखकापासून इतर कलावंत अन्‌ स्पॉट बॉयदेखील त्यात आपले रक्त लावत असतो ना? त्याचे काय? हा विचार फारसा केला जात नाही. तसले सिनेमे होतच नाहीत असे नाही, मात्र ते यशस्वी अशी गणना होत नाही. आधीच्या काळी किती आठवडे चालला, हे यशाचे निकष होते. आता किती कमी कालावधीत 100 कोटींच्या क्लबमध्ये सिनेमा गेला, हे निकष असतात. मग त्यासाठी जो काय कलात्मक व्यभिचार करावा लागतो तो केला जातो. तो व्यभिचार आम्ही पैसे देऊन बघावा यासाठी जाहिरातीचे तंत्र वापरले जाते. या सार्‍यांत सिनेमा नावाची कला बाजारबसवी होते आहे, याकडे आमचे लक्षही जात नाही...
 
 
असो. तर ‘कॅर्पनम’ हादेखील एका नव्या इराणी दिग्दर्शकाने केलेला सिनेमा. निर्वासितांच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. एका लहानग्या मुलाची ही कथा आहे. विकत घेऊन त्याच्या बहिणीशी लग्न लावणार्‍या एका प्रौढ व्यक्तीवर तो हल्ला करतो आणि मग न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात ही कथा उलगडत जाते. चित्रपटभर हा मुलगा हसत नाही. अखेर तो न्यायाधीशांना म्हणतो की, आम्हाला जन्म दिला म्हणून आमच्या आई-वडिलांनाच शिक्षा करायला हवी. निर्वासितांचे जिणे जगणार्‍यांनी मुलांना जन्म तरी का द्यावा, हा त्याचा सवाल असतो. चित्रपटाची अखेरची फ्रेम मात्र त्याच्या हसर्‍या चेहर्‍याने व्यापलेली. कारण त्याला अधिकृत नागरिक म्हणून प्रमाणपत्र मिळणार असते आणि त्यावर लावायला त्याला फोटो काढायचा असतो...
 
 
आंतरजालीय माध्यमांवर आताशा अशा काही चांगल्या मालिका आणि चित्रपट बघायला मिळतात. व्यावसायिकतेने कलात्मकता क्षीण होणे, हा रोग काही केवळ भारतीय चित्रपटांनाच लागला आहे, असे नाही. जगभर हे व्हायरल इन्फेक्शन झालेले आहे. मात्र, भारतीय सिनेमांचे हे व्यावसायिकपण तद्दन उथळ असते आणि सिनेमे अधिकच मूर्ख- हास्यास्पद आणि तरीही यशस्वी असतात. त्यासाठी अगदी सलमान, शाहरुखपासून अजय देवगणादी अनेक बड्या नायकांचे अनेक चित्रपट आठवून बघा.
 
 
टीव्हीवरच्या मालिकांचेही तसेच आहे. तेच ते विषय आणि अत्यंत निसत्त्व अशा विषयांवर या मालिका बेतलेल्या असतात. त्यावर आता भाष्य करणे म्हणजे वेळ दवडणे आहे, तरीही तेच ते दळण दळले जाते. कारण हा व्यवसाय आहे. त्यात पैसा लागतो आणि तो निघाला पाहिजे. प्रेक्षकांना खरेच ते हवे आहे की, आम्हालाच ते तसे करून विकायचे आहे, हा प्रश्न आहे; पण आम्हाला तो विचारायचा नाही अन्‌ कुणाला तो ऐकायचाही नाही. विचार करणे तर त्यानंतर येते.
 
 
आता या ऑनलाईन चित्रपट आणि मालिकांमुळे त्यात नेटकेपणा आलेला आहे. मर्यादांमध्ये हे माध्यम अडकलेले नाही. सीमा असतातच, त्या कलावंतांची क्षमता आणि सर्जनाच्या पातळीच्या असतात. संस्काराच्याही असतात. मात्र, या माध्यमाला चौकटी नाहीत. त्यावर कुठलीच सेन्सॉरशिप नाही. राजकीय नाही आणि मग कसलीच नाही. अगदी प्रेक्षकांना त्या चित्रपट, मालिकांचा आस्वाद घ्यायचा आहे, त्याच्याही परिघाची मर्यादा नाही. खूप वेगेवगळ्या विषयांवरच्या नेट मालिका अत्यंत धाडसाने मांडल्या जातात आणि त्या जगभर पाहिल्या जातात. शेरलॉक होम्स, जशी इकडे पाहिली जाते, तशीच इकडची लैलादेखील तिकडे पाहिली जाते. त्यांना आता भाषेच्या मर्यादाही राहिलेल्या नाहीत. भूगोलाच्या तर नाहीतच. ओव्हरसीज विकल्या जाण्याची वाटही बघायची नाही. प्रेक्षकाला अगदी वेळ काढून कुठल्यातरी चित्रपटगृहात जा आणि तिथे काही सगळेच चित्रपट बघायलाच आलेले असतात असे नाही. त्यांच्या खाद्यपदार्थांच्या प्लॅस्टिकचा आवाज, मोबाईलची लुडबूड आणि उगाचच चाललेली चाळवाचाळव यांच्याशी जुळवून घेत आपल्याला सिनेमा बघावा लागतो. मागे ‘तुंबाड’ हा अत्यंत वेगळा चित्रपट बघत असताना अत्यंत गंभीर वळणावरही आलेल्या आंबलेल्या कॉमेंटस्‌मुळे वैताग आला होता. म्हणावे तर ‘हमभी पैसे देकेच्य आये ना!’ हे खास उत्तर तयार असतेच. आता नेट माध्यमांमुळे हे सगळे टळते. आपल्याला आपल्या मूडने सिनेमाचा आस्वाद घेता येतो. एखादे दृश्य पुढे- मागेही करून बघता येते. बंदही करता येते...
 
 
नेमके हेच स्वातंत्र्य लेखकांनाही मिळते. हवे ते लिहिता येते. उगाच कुणाचे दडपण नाही. धाक नाही. पहिली आडकाठी तर बाजाराची असते. विकलं जाणार असंच लिहा, असा आग्रह इथे नसतो. अर्थात हाही व्यवसायच आहे, त्यामुळे पैशाचा परतावा हवाच असतो, मात्र त्याचा पैस खूप मोठा आहे. वेळ आणि भूगोल व्यापक आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन मालिकांसाठी खूप वेगळे विषय हाताळले जाऊ लागले आहेत. उगाचच्या सोवळेपणाने आणि भंपक दांभिकतेने बाजूला सारलेले, त्याज्य ठरविलेले विषयदेखील आता या मालिका- चित्रपटांत येऊ लागले आहेत. त्याची छान मांडणीदेखील केली जाऊ लागली आहे. त्यावर नेटकर्‍यांमध्ये चर्चा होते. समाजमाध्यमांचे पडदे त्यासाठी उपयोगी पडतात आणि ‘कॅपर्नम’सारखा चित्रपट खूप दूरवर पोहोचतो. काही विषय नाही आवडले िंकवा मग त्यांची मांडणी चांगली नसेल तर ते बाजूलाही टाकले जातात. बाजारशरणता िंकवा राजकीय दबाव यांच्यापलीकडे हे माध्यम नक्कीच गेले आहे. या व्यासपीठांमुळे कलाकृतींचे नवीन आयाम शोधण्याची शक्यता तयार झाली आहे. निखळ कलाकृती मांडण्याची तहान आता भागविता येऊ शकते आहे. आता या माध्यमासाठी आवश्यक असलेली प्रगल्भता भारतीय प्रेक्षक आणि सर्जनकार यांच्यात नाही. मात्र, जागतिक सांस्कृतिक रेटा इतका मोठा आहे की, हा बदल आपल्याकडेही झाला. आता कलावंतांकडून परिपक्वता अपेक्षित आहे. या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन राजकीय सुजाण भाष्य करणार की लोकप्रियतेसाठी िंहसा, लैंगिकता आणि भडक विषय बोल्डनेसच्या नावाखाली अत्यंत भडकपणे सादर केले जाणार? संवेदना, प्रेरणा आणि निर्मिती यांना विवेकाची जोड हवीच. कलात्मक प्रगल्भता आणखी कशाला म्हणायचे असते?