ढोबळी मिरचीचं व्यवस्थापन

    दिनांक :30-Oct-2019
|
अलिकडच्या काळात बाजारात ढोबळी मिरचीला बर्‍यापैकी मागणी प्राप्त होत आहे. हॉटेलमध्येही विविध पदार्थांमध्ये ढोबळी मिरचीचा वापर वाढला आहे. साहजिक या मिरचीला किफायतशीर दर मिळणं शक्य होत असल्याने या पिकाच्या लागवडीकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढला आहे. मात्र, अपेक्षित आणि दर्जेदार उत्पादनासाठी योग्य व्यवस्थापन गरजेचं आहे. 

 
 
सर्वसाधारणपणे ढोबळी मिरचीची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात. तर याची काढणी जानेवारी, फेबु्रवारी महिन्यात करता येते. या पिकासाठी चांगली कसदार आणि सुपीक जमीन आवश्यक असते. या शिवाय मध्यम ते भारी, काळ्या आणि पाण्याचा उत्तम निचरा होणार्‍या जमिनीतही हे पीक चांगलं येतं. अशा जमिनीचा सामू सहा ते सातच्या दरम्यान असायला हवा.
 
 
ढोबळी मिरचीची लागवड रोपं लावून केली जाते. ही रोपं तयार करण्यासाठी निवडलेली जागा योग्य पध्दतीनं तयार करावी. 60 सें.मी. अंतरानं सर्‍या पाडून या रोपांची पुनर्लागवड करावी. या पिकाच्या उत्तम उत्पादनासाठी हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत, त्याच बरोबर 150 किलो नत्र, 150 किलो स्फुदर आणि 200 किलो पालाशची आवश्यकता असते. या पिकाला लागवडीनंतर सुरूवातीच्या काळात व्यवस्थित पाणी आणि उत्तम सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी.
 
 
ढोबळी मिरचीवर चुरडा-मुरडा, मर या रोगांचा प्रादुर्भाव होत आढळतो. त्यादृष्टीने वेळीच रोगप्रतिबंधक उपाययोजना कराव्या. या पिकाची काढणी वेळीच करावी. अन्यथा फळांचा रंग बदलण्याची शक्यता असते. अशा प्रकारे उत्तम व्यवस्थापनातून ढोबळी मिरचीचं अपेक्षित उत्पादन घेता येतं.