गरज संलग्न व्यवसायाची

    दिनांक :30-Oct-2019
|
1750 मध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. ही क्रांती इतर देशांपर्यंत पोहोचण्यासाठी 1850 पर्यंतचा कालावधी लागला. त्यामुळे विकसित देशांमधील शेतीधंद्यावरील बोजा हा औद्योगिक विकासामध्ये सामावला गेला. आपल्याकडे ही क्रांती 1900 च्या सुमारास आली. स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि नंतर ती परिपूर्ण झाली. विकसित देशात शेतीवर आधारलेल्या लोकांची टक्केवारी तीन ते पाच टक्क्यांपर्यंतच राहिली. इतर सर्वजण नोकरी, व्यापार, उद्योग यामध्ये सामावले गेले. कारण मुळातच त्या देशांची लोकसंख्या अत्यंत कमी होती. याचा परिणाम म्हणजे औद्योगिकीकरणामुळे तिथं नवनवीन रोजगार निर्माण झाले.
  
 
या पार्श्वभूमीवर भारताची आजची परिस्थिती विचार करण्यासारखी आहे. शिक्षणक्षेत्रातील कितीही पदव्या घेतल्या तरी संगणकक्षेत्र सोडून इतर पदव्यांना आणि तंत्रज्ञानाला फारसं महत्त्व राहिलेलं नाही. कला-विज्ञान आणि शास्त्र या शाखेतील पदव्या नोकरी मिळवून देण्यासाठी कुचकामी ठरत आहेत. उद्योगांमध्ये नवनवीन तंत्र आल्यामुळे नोकर्‍या कमी होत आहेत. व्यापारामध्ये स्पर्धा वाढली आहे. शिक्षणामध्ये व्यापारीकरण होऊन उच्च-तांत्रिक ज्ञानासाठी लाखो रूपये मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत गरीब शेतकरी आपल्या मुलाला तांत्रिक ज्ञान कसं देऊ शकेल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्याच बरोबर शेतकर्‍यांच्या मुलांनी कोठे जावे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यादृष्टीने शेतीक्षेत्रातच महत्त्वपूर्ण बदल होणं गरजेचं आहे.
 
 
एकंदर सार्‍या परिस्थितीचा विचार करता काही बाबी प्रकर्षानं लक्षात घेण्याजोग्या आहेत. मुख्यत्वे शेतीक्षेत्रात बुद्धीमान तरुण उतरल्यास तसंच त्यांनी निर्यात व्यापार, देशांतर्गत बाजारासाठी नवनवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग या सर्वांची कास धरल्यास त्यांना ग्रामीण भागातून शेतीशी संलग्न उद्योगाद्वारे आणि जोडधंद्याद्वारे जीवनात स्थिर होता येईल. त्यातून त्यांचं आर्थिक जीवनमानही उंचावेल. सद्यस्थितीत शेतीक्षेत्राशी निगडीत असलेल्या युवकांना स्वत:च्या पायावर उभं करून त्यांना उत्पन्नाची विविध साधनं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी अर्थसहाय्य, आवश्यक ते प्रशिक्षण, उत्पादित मालाच्या बाजारपेठेची हमी या बाबींवर भर दिला जायला हवा. त्यादृष्टीने खास धोरण आखून त्याची अंमलबजावणी नीटपणे झाल्यास शेतीक्षेत्रातील सध्याचं चित्र बदलण्यास निश्चित मदत होईल.
 
 
वानगीदाखल एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. तो म्हणजे अलीकडे महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कृषी पर्यटनाला बरंच महत्त्व प्राप्त झाल आहे आणि या पर्यटनाकडील ओघही वरचेवर वाढत आहे. शहरी कोलाहलापासून दूर मोकळ्या वातावरणात, ग्रामीण संस्कृती जाणून घेत काही काळ घालवण्यावर भर दिला जात आहे. हा जोड व्यवसाय शेतकर्‍यांसाठी उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन ठरत आहे. विशेष म्हणजे फारसं भांडवल न गुंतवता किंवा कुठलं प्रशिक्षण न घेताही हा व्यवसाय उत्तम होऊ शकतो. त्यामुळे या जोड व्यवसायाकडील शेतकर्‍यांचा कल वाढत आहे. अशाच पध्दतीने अन्य काही व्यवसायांची जोड शेतीला दिल्यास शेतकर्‍यांची आर्थिक समस्यांमधून निश्चित सुटका होऊ शकेल. आजकाल स्वीट कॉर्न मक्याला वाढती मागणी आहे आणि त्याला दरही चांगला मिळत आहे. त्यामुळे या संदर्भातील प्रक्रिया उद्योगाचा विचार केला जायला हवा. एकंदर सार्‍या बाबी लक्षात घेता तरुणाईने इतर क्षेत्राकडे धाव घेण्याऐवजी शेतीशी निगडीत व्यवसाय अधिक प्रभाविपणे राबवण्यासाठी प्रयत्न करावे. असं झाल्यास कृषीक्षेत्राला पुन्हा वैभवाचे दिवस प्राप्त होतील आणि या क्षेत्राकडे पुन्हा अनेकांचा नव्याने प्रवेश होईल, हे नक्की.