मोबाईलवर कॉल उचलताच त्यांच्या अंगावर कोसळली वीज; तीन ठार

    दिनांक :30-Oct-2019
अमरावती/पुर्णानगर,
वीजेच्या कडकडाटासह अचानक सुरू झालेल्या पावसात वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. अमरावती ते अचलपूर मार्गावरील पूर्णानगर जवळ ही घटना बुधवारी सांयकाळच्या सुमारास घडली.

 
 
सोनाली गजानन बोबडे, शोभा संजय गाठे आणि अंजनगाव सुर्जी येथील सैय्यद नरूद्दीन सैय्यद बदरोद्दीन अशी मृतांची नावे आहेत. यासोबतच अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील काही भागात विजांच्या गडगडटासह बुधवारी दूपारनंतर पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामध्ये दुचाकीने अचलपूरकडे जाणार्‍या काही मंडळी पुर्णानगर जवळील श्रीकृष्ण डेअरी जवळच्या झाडांचा आसरा घेऊन थांबले. झाडाखाली उभ्या असलेल्या ६ पैकी एकाचा मोबाईल वाजला असता त्याने तो उचलताच ही मंडळी उभ्या असलेल्या झाडावर अचानक वीज कोसळली.
 
 
या घटनेत दोन महिला व एक पुरूष असा तिघांचा मृत्यू झाला. मृतक सोनाली ही बडनेरा जुनीवस्ती माळीपुरा येथे राहणारा भाऊ स्वप्नील ज्ञानेश्वर वाठ सोबत अचलपूर येथे दुचाकीने जात होती. मृतक शोभा गाठे ही महिला अमरावती येथील पीडीएमसी रुग्णालयात नातेवाईक दाखल असल्याने भेटण्यासाठी आली होती. ती देखील भावासोबत दुचाकीने अचलपूरला जात होती. तर मृतक सैय्यद नरूद्दीन हे मुलासोबत दुचाकीने अंजनगाव सुर्जीला जात होते. या घटनेत अन्य तिघे जण जखमी झाले आहे. वीज पडल्याची माहिती मिळताच जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, इर्वीनमध्ये तिघांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. तीन कुंटुबांवर शोककळा पसरली आहे.