दहशतसमर्थकांना अमेरिकी संदेश...

    दिनांक :30-Oct-2019
|
इसिसचा म्होरक्या अबु बक्र अल्‌ बगदादी ठार झाल्याची माहिती, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दिली. सीरियाच्या वायव्येकडील प्रांतात अमेरिकेच्या विशेष कमांडो दलाच्या जवानांनी बगदादी आणि त्याच्या काही साथीदारांना घेरले आणि जोरदार हल्ला चढविला. आपण आता मरणार, याची खात्री पटल्यानंतर त्याने स्वत:ला बॉम्बस्फोट करून उडवले. यात बगदादी व त्याच्या तीन मुलांसह इतर काही अतिरेकीही ठार झाले. या घोषणेचे आणि अमेरिकेच्या साहसी कृत्याचे जगभरात स्वागत केले जात आहे. इसिसच्या कारवाया सध्या कमी झाल्याचे जाणवत असले, तरी या संघटनेची दहशत कायम होती. अबु बक्र अल्‌ बगदादी याच्या मृत्यूमुळे जगाची त्याच्या दहशतीतून कायम मुक्तता होणार आहे. कधीही हमले करण्याची धमकी देण्यासाठी कुख्यात असलेल्या, लहान मुले आणि महिलांवरील अत्याचारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या तसेच मुस्लिम राष्ट्रांनाच नव्हे, तर इतर राष्ट्रांनाही आपल्या करंगळीवर नाचवण्याची ताकद असलेल्या बगदादीच्या मृत्यूमुळे जगाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

 
 
अल्‌ बगदादीला कुत्र्याच्या मौतीने मारले, अशी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाड ट्रम्प यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया, या व्यक्तीविषयी अमेरिकेच्या मनात किती चीड होती, हे दाखवून देणारी आहे. त्याला ठार मारल्याच्या घटनेचे, अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांनीही खुल्या दिलाने स्वागत केले आहे. कुणीही ट्रम्प यांच्या या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. ते ट्रम्पविरोधी असले तरी त्यांनी या राष्ट्रीय मुद्याशी त्या विरोधाचा संबंध जोडला नाही. भलेही ते ट्रम्प यांचा तिरस्कार करीत असले, तरी त्यांनी त्या तिरस्काराचा लवलेशही राष्ट्रीय मुद्याला समर्थन देण्याच्या प्रसंगी जाणवू दिला नाही. कारण त्यांचे अमेरिकेवर, आपल्या देशावर नितांत प्रेम असून, ते अमेरिकेचा शत्रू असलेल्या प्रत्येकाला आपला वैयक्तिक शत्रू मानतात. म्हणून अमेरिकेतून अबु बक्र अल्‌ बगदादी याच्याविरोधात निघालेला हुंकार एकसुरात बघायला मिळाला. भारतात मात्र याउलट उमटलेली प्रतिक्रिया लोकांनी अनुभवली आहे. ज्या वेळी रात्रीच्या काळोखात भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून उरी हल्ल्याचा बदला घेतला आणि सीमा सुरक्षा दलाच्या 40 जवानांचा अतिरेक्यांनी घेतलेल्या बळींचा बदला म्हणून बालाकोटमध्ये हल्ले करीत अतिरेक्यांची प्रशिक्षण शिबिरे उद्ध्वस्त केली, त्या वेळी आपल्याकडील विरोधकांनी सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही आणि तो केला असेल तर लष्कराने त्याचे पुरावे द्यावे, अशी मागणी करून सरकारच्या प्रामाणिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
 
 
दोन देशांतील विरोधी पक्षांमधील हे अंतर बरेच काही सांगणारे आहे. एका देशातील विरोधकांना देशाच्या मुद्यावर राजकारण करणे अमान्य आहे आणि भारतासारख्या देशात राष्ट्रीय मुद्यांवरही राजकारण करण्याची विरोधकांची खोड काही जात नाही. अबु बक्र याच्या झालेल्या मृत्यूचे भारतानेही स्वागत केले आहे. मानवतेचा आणखी एक शत्रू नष्ट झाल्याचे विधान करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दहशतवादाच्या लढाईत भारत जागतिक समुदायाबरोबर असल्याचे जाहीर केले आहे. दहशतवादाविरुद्धची ही लढाई एवढ्याने संपणार नाही. अफगणिस्तानातील तालिबानी नेता ओसामा बिन लादेनला अमेरिकेने अशाच पद्धतीने संपविले होते. रात्रीच्या वेळी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये घुसून तो राहात असलेले घर नेस्तनाबूत केले होते. त्या हल्ल्याची कल्पना पाकिस्तानला देण्यात आली होती की नव्हती, याबाबतचा खुलासा अद्यापही झालेला नाही. पण, त्या वेळी ना पाकिस्तानने, ना अफगाणिस्तानने अमेरिकेच्या त्या कृतीविरुद्ध ओरड करण्याची िंहमत दाखविली. कदाचित काही आर्थिक गणिते पक्की झाल्यामुळे या देशांनी त्या वेळी मूग गिळून राहणे पसंत केले असावे, अशा चर्चा नंतर रंगल्या. पण, एक मात्र खरे, अमेरिकेने दहशतवाद्यांविरुद्ध निव्वळ एकजुटीने उभे राहण्याची शपथ खाल्ली नसून, त्या दिशेने त्याने पावलेदेखील उचलली आहेत, हे अल्‌ बगदादीच्या मृत्यूच्या घटनेमुळे सिद्ध झाले आहे.
 
 
या कृतीमुळे जगातील दहशतवाद संपून जाईल, अशी दांभिकता दाखवता येणार नाही. कारण आज एकाचा खात्मा झाला आहे, उद्या दुसराच कुणी इसिसची सूत्रे हाती घेऊन मानवतेविरुद्धचे युद्ध सुरू ठेवण्याची शपथ घेईल. त्यामुळे दहशतवादाविरुद्धचा लढा निरंतर सुरू ठेवणे, हीच पुढच्या काळातील कामाची दिशा निश्चित करण्याची गरज आहे. इसिस ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना व स्वयंघोषित खिलाफत आहे. इस्लाम धर्मातील सुन्नी पंथाच्या वहाबी, सलाफी विचारांच्या कट्‌टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना प्रामुख्याने पश्र्चिम आशियातील इराक व सीरिया या देशांमध्ये कार्यरत आहे. सध्या इराक व सीरियाच्या मोठ्या भूभागावर हिचे नियंत्रण आहे. तिची स्थापना 2004 साली झाली व तिने अल्‌ कायदामध्ये प्रवेश केला. 2014 साली इसिस अल्‌ कायदामधून वेगळी झाली व अबु बक्र अल्‌ बगदादीने इस्लामिक खिलाफतीची घोषणा केली व स्वतःला खलिफा जाहीर केले. 2014 साली इसिसने इराकच्या वायव्य भागातील मोठा भूभाग काबीज केला व मोसुल शहर ताब्यात घेतले. इसिस हा एक अत्यंत िंहसक गट असून, सुन्नीवगळता इतर मुस्लिम पंथांच्या लोकांचे शिरकाण, महिलांचे शोषण, अपहरण, बलात्कार इत्यादी अनेक गुन्ह्यांमध्ये या संघटनेचा हात असतो. या संघटनेचे अतिरेकी जगभर कार्यरत असून भारत, अमेरिका, रशिया, युरोपियन संघ इत्यादी प्रमुख देशांनी इसिसला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे.
 
 
जगभरात ठिकठिकाणी हल्ले करण्यात या संघटनेचा हात राहिलेला आहे. बोको हराम, तालिबान आदी मुस्लिम अतिरेकी संघटना सातत्याने इसिसच्या मागे उभ्या ठाकल्या आहेत. कट्‌टर सुन्नी असलेली इसिस शियांच्या निर्घृण हत्येसाठी ओळखली जाते. सरकारी आणि लष्करी संस्थांवर हल्ले करून, या संस्थेच्या सदस्यांनी हजारो नागरिकांचे खून केले आहेत. संघटनेचे म्होरके म्हणविणारे स्वतः किती भेदरट असतात, हे कालच्या कृतीने सिद्ध झाले आहे. ज्या वेळी अमेरिकी कमांडो गुहेत घुसले आणि त्यांनी एकेक करीत अनेक अंगरक्षकांचा पाडाव केला हे स्पष्ट झाले, त्या वेळी अबु बक्र अल्‌ बगदादी अक्षरशः गुहेच्या दुसर्‍या बाजूला पळू लागला, सैनिकांपुढे दयेची याचना करू लागला. पण, कमांडोंनी त्याचे काही एक न ऐकता त्याचा पिच्छाच पुरविला. सुटकेचे सारे मार्ग खुंटल्याने अखेर बगदादीने आत्मघाती स्फोटांनी स्वतःला उडविले. या आत्मघाती हल्ल्यात त्याच्या बायका आणि मुलांचाही करुण अंत झाला. दहशतवादविरोधी लढ्याला वेगळे वळण देणारी घडामोड म्हणून याकडे बघितले जायला हवे. अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्ती आणि सीरियात इसिसच्या छळाला बळी पडलेल्या कायला मुल्लरचे नाव या मोहिमेला देण्यात आले होते. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अमेरिकेची कृती प्रशंसनीयच म्हणावी लागेल. तिच्या छळाचा बदला घेऊन अमेरिकी कमांडोंनी या मानवाधिकार कार्यकर्तीला यथोचित श्रद्धांजली अर्पित केली आहे. देशाला वंदनीय असलेल्या सत्पुरुषांच्या भावनांशी खेळणे अतिरेक्यांना किती महाग पडू शकते, असा संदेशही अमेरिकेने जगाला या निमित्ताने दिला आहे...