अकोल्यात वादळी पावसाचा कहर; विज पडून एक ठार, २ जखमी

    दिनांक :30-Oct-2019
अकोट(अकोला),
अकोल्यातील अकोट तालुक्यात बुधवारी दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह अचानक कोसळलेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. लाडेगांवच्या जंगलाजवळील कोलविहीर शेतशिवारातील एका शेतात विज कोसळून एका शेतमजूराचा मृत्यू झाला असून त्याचा सहकारी शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. जवळच एका गुराख्यालाही विजेचा धक्का बसल्याने तो जखमी झाला आहे. शेतमजूराला अकोल्याला उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. तर जखमी गुराख्यावर अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले.
 
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तालुक्यातील ग्रामीण भागात अचानक वादळी पाऊस सुरु असताना लाडेगांवच्या जंगलाजवळ कोलविहीर शेतशिवारातील एका शेतात विज पडल्याचे वृत्त आले. त्या ठिकाणी एका शेतात शेतमजूरी करत असलेल्या दादाराव तुळशीराम पळसपगार यांच्यावर विज कोसळून त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचे सहकारी शेतमजूर अनिल भिमराव पचांग हे गंभीर जखमी झाले. त्या सोबतच गुराखी काम करणारे संग्राम बिबा अहीर हे सुध्दा जखमी झाले. या तिघांना अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता दादाराव पळसपगार यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जखमी अनिल पचांग यांना तातडीने उपचारार्थ अकोल्याला सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच जखमी गुराखी संग्राम अहीरवर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले.

 
दुसऱ्या घटनेत ग्राम अकोली जहागीर व परिसरातील शेतशिवारात वादळी पावसासह जोरदार गारपिट झाली. तेथे शेंगदाण्याच्या आकाराच्या गारा पडल्याची माहिती स्थानिक वार्ताहराने दिली. या गारपिटीमुळे कापूस, सोयाबीन व ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. या गारपिटीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
 
विशेष म्हणजे अकोली जहागीरला झालेल्या गारपिटीच्या संदर्भात तहसिल कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाशी संपर्क केला असता या गारपिटीबाबत हा विभाग अनभिज्ञ असल्याचे आढळले. स्थानिक तलाठ्याने गारपिट बाबत अहवाल दिला नसल्याने गारपिट झाली किंवा नाही, या बाबत कोणतीही माहिती नसल्याचे विभागाच्या सुत्रांनी सांगितले.