दुष्यंत चौटाला यांचे शहाणपण...

    दिनांक :31-Oct-2019
दिल्ली वार्तापत्र
शामकांत जहागीरदार  
 
 
दोनदा देशाचे उपपंतप्रधानपद भूषवलेले तसेच दोनदा हरयाणाचे मुख्यमंत्री राहिलेले चौधरी देवीलाल यांचा पणतू दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत, आपल्या पणजोबाच्या पावलावर पाऊल टाकत आपली राजकीय कारर्कीद सुरू केली आहे.
 
 
नुकत्याच झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांच्या 10 महिन्यांच्या जननायक जनता पार्टीने 10 जागा जिंकत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. हरयाणात भाजपाने 40 तर काँग्रेसने 31 जागा जिंकल्या. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीच्या हातात सत्तेची चाबी आली.
 
 
सात अपक्ष आमदारांना आपल्या बाजूला ओढत भाजपाने सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत मिळवले होते. मात्र, राज्याला स्थिर आणि सक्षम सरकार देण्यासाठी भाजपाने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीचाही पाठिंबा मागितला आणि दुष्यंत चौटाला यांनी राजकीय दूरदर्शिता दाखवत भाजपाला पाठिंबा दिला. भाजपाला पाठिंबा देताना दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्रिपद मागितले आणि भाजपाने ते दिलेही. 

 
 
सत्तेची चाबी हातात असतानाही तिचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचे जे कौशल्य दुष्यंत चौटाला यांनी दाखवले, तसे ते महाराष्ट्रात शिवसेनेला दाखवता आले नाही. भाजपाला पाठिंबा देण्यात चौटाला यांचा राजकीय फायदा होता. काँग्रेसला पाठिंबा देऊनही काही उपयोग नव्हता. 31 सदस्यांच्या काँग्रेसला पाठिंबा दिल्यावरही दोघांचे संख्याबळ 41 होत होते. जे आवश्यक त्या संख्याबळापेक्षा पाचने कमी होते. कारण 7 अपक्ष आमदारांनी आधीच भाजपाला पाठिंबा देत काँग्रेसचा सरकार बनवण्याचा मार्ग अडवला होता.
 
 
देवीलाल यांना चार मुलं होती. सगळीच राजकारणात होती. मात्र, देवीलाल यांचा राजकीय वारसा ओमप्रकाश चौटाला यांच्याकडे आला. ओमप्रकाश चौटाला यांनी पाच वेळा हरयाणाचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ओमप्रकाश चौटाला यांना दोन मुलं. अजय आणि अभय. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचा मुलगा अजय चौटाला सध्या तुरुंगात आहेत. ओमप्रकाश चौटाला तुरुंगात गेल्यामुळे त्यांच्या भारतीय राष्ट्रीय लोकदलाची सूत्रे त्यांचे छोटे पुत्र अभय चौटाला यांच्याकडे आली. 2014 च्या हरयाणातील विधानसभा निवडणुकीत अभय चौटाला यांच्या नेतृत्वात भारतीय राष्ट्रीय लोकदलाने 19 जागा जिंकत राज्यात काँग्रेसला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले.
 
 
त्यानंतर भारतीय राष्ट्रीय लोकदलावर ताबा मिळवण्यासाठी ओमप्रकाश चौटाला यांच्या दोन मुलांत- अजय आणि अभय यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. दोन्ही बाजूने पक्षाची कार्यालयं ताब्यात घेण्याची लढाई रस्त्यावर आली. या कौटुंबिक लढाईत ओमप्रकाश चौटाला यांचा कल अभय चौटाला यांच्याकडे होता. गुरुग्रामच्या (गुडगाव) एका सभेत ओमप्रकाश चौटाला यांनी अभय चौटाला यांची प्रशंसा केली, मात्र दुष्यंत चौटाला यांचे नावही घेतले नाही, त्यामुळे दुष्यंत चौटाला यांचे समर्थक दुखावले गेले.
 
 
त्यानंतर म्हणजे 7 ऑक्टोबर 2018 ला भारतीय राष्ट्रीय लोकदलातर्फे सोनीपत जिल्ह्यातील गोहाना येथे देवीलाल यांच्या सन्मानार्थ सद्भावना सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीसाठी आपल्या मोठ्या संख्येतील समर्थकांसह दुष्यंत चौटाला ट्रॅक्टरने पोहोचले. ओमप्रकाश चौटाला यांचे भाषण सुरू असताना दुष्यंत चौटाला यांचे समर्थक दुष्यंत यांच्या जिंदाबादच्या घोषणा देत होते. त्यामुळे ओमप्रकाश चौटाला भडकले. त्यांनी पक्षातील दुष्यंत चौटाला यांच्या समर्थकांची हकालपट्‌टी केली.
 
 
भारतीय राष्ट्रीय लोकदलात राहून आपल्या काकाशी म्हणजे अभय चौटाला यांच्याशी संघर्ष करण्यापेक्षा दुष्यंत चौटाला यांनी राजकीय शहाणपणा दाखवत 9 डिसेंबर 2018 ला जननायक जनता पार्टीची स्थापना केली. देवीलाल यांना हरयाणात जननायक म्हटले जात होते. त्यांच्या नावाने दुष्यंत चौटाला यांनी नवा पक्ष काढला. सुरुवातीला हरयाणाच्या राजकारणात बच्चा पार्टी म्हणून या पक्षाची खिल्ली उडवण्यात आली. पण, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जननायक जनता पार्टीने आपली राजकीय ताकद दाखवली. मागील विधानसभा निवडणुकीत दुसर्‍या स्थानावर असणार्‍या आणि 19 जागा जिंकणार्‍या अभय चौटाला यांच्या भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे पानदान वाजले, त्यांना फक्त एक जागा जिंकता आली.
 
 
हरयाणातील लोक दुष्यंत चौटाला यांच्यात देवीलाल यांना पाहतात. उच्च शिक्षित दुष्यंत चौटाला यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली, त्यानंतर नॅशनल लॉ स्कूलमधून मास्टर ऑफ लॉ केले. सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय लोकदलात दुष्यंत चौटाला यांच्याकडे विद्यार्थी आघाडीची जबाबदारी होती. आपल्या वडिलांसोबत म्हणजे अजय चौटाला यांच्यासोबत दुष्यंत चौटाला यांनी राजकारणाचे धडे गिरवले.
 
 
अजय चौटाला यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या दुष्यंत चौटाला यांची 16 व्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार म्हणून ओळख होती. भारतीय राष्ट्रीय लोकदलाच्या तिकिटावर हिस्सार मतदारसंघातून ते लोकसभेवर विजयी झाले होते. शेतकरी नेता, अशी आपली प्रतिमा जपण्यासाठी अनेक वेळा दुष्यंत चौटाला संसदभवनात ट्रॅक्टरवर यायचे. संसदेतील अभ्यासू खासदार, अशी त्यांची प्रतिमा होती.
 
 
हरयाणातील ताज्या सत्तासंघर्षात दुष्यंत चौटाला कोणती भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कोणताच राजकीय पक्ष आम्हाला अस्पृश्य नाही, असे सांगत दुष्यंत चौटाला यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवले तसेच राजकारणात आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे सिद्ध केले. योग्य वेळी सरकार बनवण्यासाठी भाजपाला पाठिंबा देत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदही स्वत:साठी मिळवले.
 
 
दुष्यंत चौटाला यांच्या वडिलांवर म्हणजे अजय चौटाला यांच्यावर तसेच आजोबांवर म्हणजे ओमप्रकाश चौटाला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र, दुष्यंत चौटाला यांच्यावर आतापर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. आपली स्वच्छ पाटी घेऊन ते राजकारणात उतरले आहेत.
 
 
राजकारणात किती ताणायचे आणि कुठे ढील द्यायची, माघार घ्यायची, हे समजणे महत्त्वाचे असते. अनेक वर्षे राजकारणात असलेल्या शिवसेनेला जो राजकीय शहाणपणा दाखवता आला नाही, तो 10 महिन्यांच्या पक्षाचे नेतृत्व करणार्‍या दुष्यंत चौटाला यांनी दाखवून दिला. राजकारणात कोणतीही मागणी करताना आपली लायकी आणि पात्रताही ओळखता आली पाहिजे. आपली लायकी आणि पात्रता नसताना मागितल्याने हसे होत असते, याचे भान शिवसेनेने ठेवले पाहिजे. दुष्यंत चौटाला यांचा उपहास करण्यापेक्षा त्यांच्याकडून शिवसेनेच्या नेत्यांनी हे शिकले पाहिजे.
 
 
एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणे यात गैर काही नाही. राजकीय पक्ष म्हणून तो शिवसेनेचा अधिकार आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेना मुख्यमंत्रिपदाची मागणी करत असेल, त्यासाठी अडून बसत असेल, तर असे करून शिवसेना स्वत:चे आणि आदित्य ठाकरे यांचेही नुकसान करून घेत आहे.
 
 
आदित्य ठाकरे यावेळी पहिल्यांदा आमदार झाले. विधानसभेच्या कामकाजाचाही त्यांना अनुभव नाही. सरकारी कामकाजाबाबत त्यांचा अनुभव शून्य आहे. त्यामुळे त्यांनी आधी विधिमंडळाचे तसेच सरकारचे कामकाज कसे चालते हे शिकून घेतले पाहिजे. खूपच वाटत असेल, तर एखाद्या खात्याचे मंत्रिपद घेत सरकार कसे चालते आणि चालवले जाते, हे समजून घ्यावे. घोड्यावर बसताना आपली मांड पक्की ठेवायची असते, घोड्यावरची मांड पक्की नसेल तर घोड्याने आपल्याला कधी खाली फेकले ते समजतही नाही!
 
 
त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी आडमुठेपणा दाखवण्याऐवजी दुष्यंत चौटाला यांचे अनुकरण करावे आणि सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पाठिंबा देत, मिळत असेल तर उपमुख्यमंत्रिपद मुकाट्याने घ्यावे, यातच शिवसेनेचे आणि आदित्य ठाकरे यांचे हित आहे...
9881717817 पप