फळांचे रस आणि आरोग्य

    दिनांक :31-Oct-2019
मीरा टोळे
9225233263
 
आजकाल सगळ्यांचेच जीवन धावपळीचे झाले आहे. ऑफिस, घर सांभाळताना स्त्रियांची होणारी कसरत, कॉलेज, क्लासेस, अभ्यास, परीक्षा आदी सांभाळताना मुलांची होणारी तारांबळ, नोकरीतील वाढलेला ताण आणि कर्तव्ये, जबाबदार्‍या पार पाडताना पुरुषांना होणारा त्रास हे सगळे सहन करण्याची प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक ताकद टिकून राहावी याकरिता काहीतरी पौष्टिक गोष्टी शरीरात जाणे आवश्यक आहे. 

 
 
शरीराला व्यायाम व्हावा, शुद्ध हवा मिळावी याकरिता अनेकजण सकाळी फिरायला जातात. फिरून झाले की जवळच असलेल्या ज्यूसवाल्याकडे एखादा फळांचा रस घेतात व घरी जातात. परंतु हे फळांचे रस घेताना वातावरणाचाही विचार करणे गरजेचे आहे. काही फळांचे रस हे प्रकृतीला थंड असतात. तेव्हा हिवाळ्यात, उन्हाळ्यात कोणते रस घ्यावे, याचाही विचार करायला हवा. काही रस हे कोणत्याही ऋतूमध्ये शरीराला आल्हाददायक असतात. फळांबरोबरच दैनंदिन जीवनात आपल्या भोजनामध्ये येणार्‍या काही फळभाज्या व पालेभाज्यांचे रससेवनही प्रकृतीला फायदेशीर ठरते.
 
 
बीटचा रस घेतल्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. गाजराच्या रसात अ जीवनसत्व भरपूर असल्याने यकृताकरिता हा रस अतिशय पोषक ठरतो. याच्या नियमित सेवनाने डोळे निरोगी राहतात. वाढणारे वजन ही तर सद्यस्थितीत मोठी समस्या ठरत आहे. याकरिता गाजराचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. तसेच याच्या सेवनाने कन्सरसारख्या दुर्धर आजारापासून बचाव होण्यास मदत होते.
 
 
अनेकांची रक्तशर्करा वाढत असल्याने ती कमी कशी करता येईल, याचा ते विचार करीत असतात. पालकाचा रस प्यायल्याने रक्तातील शर्करा कमी होण्यास मदत होते. टोमॅटो ज्यूस किंवा सूप प्यायल्याने हृदयाबाबतचे आजार बरे होण्यास मदत होते. काकडीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. याच्या सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो, त्वचेशी संबंधित आजारी दूर होतात. उच्च रक्तदाबावर द्राक्षाचा रस देखील फायदेशीर ठरतो.
 
 
‘क’ जीवनसत्व आणि पोटॅशियमचे भरपूर प्रमाण असलेल्या चेरीचा ज्यूस रक्तक्षयामध्ये फायदेशीर ठरतो. रोज लिंबूपाणी प्यायल्यास वजन कमी होण्याबरोबरच शरीरातील दूषित पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. पचनक्रिये संबंधित आजारांमध्ये पपईचा रस फारच उत्तम ठरतो. डाळिंबाच्या रसाने शरीरातील कमजोरी दूर होते, तसेच सफरचंदाचा रस देखील एखाद्या आजाराने शरीराला आलेली कमजोरी दूर करण्यास मदत करतो. तसेच रक्तशर्करा नियंत्रित करण्यास मदत होते. अशाप्रकारे आपण आपले आरोग्य सुदृढ ठेवू शकतो.