लव्ह यू जिंदगी...

    दिनांक :31-Oct-2019
समिधा पाठक
 
काय झालंय्‌ माझं आयुष्य यार. कोण होतो मी आणि काय झालोय्‌ मी! शाळा कॉलेजमध्ये काय लाईफ होतं यार. काय हवा होती माझी! क्लासमध्ये, होस्टेलमध्ये, मित्रांमध्ये आपलीच चलती असायची आणि आज बघा! पूर्ण एकटा पडलोय्‌ मी. जिच्यासाठी मित्रांना सोडले, ती सुद्धा मला सोडून गेली, कारण माझा गोल ठरलेलाचं नव्हता. तेव्हाच ठरवलं झाला तो अपमान पुरे आता. स्वतःच्या बळावर उभं राहायलाच हवं. मग स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धडपड करू लागलो आणि या नादात माझी उरली सुरली मनःशांती देखील हरवली. वर अपेक्षांचे ढीग साचत गेले ते वेगळेच. नात्यांचे गुंते सुटत नाहीत आणि समाजातील टोमण्यांचा मारा पोकळी निर्माण करतो. दात आहे तर फुटाणे नाहीत आणि फुटाणे आहेत तर दात नाहीत, अशी परिस्थिती झालीय्‌ माझी. आयुष्याच्या परीक्षेला आता पार कंटाळलोय्‌ मी. अशात हे एकटेपण! मन मोकळं बोलायला किंवा अश्रू पुसायला आज या जगात माझे असे कोणीच नाही. तारुण्य ही आयुष्याची सर्वात रुपेरी सायंकाळ असते, असे मी ऐकले होते. पण माझ्यासाठी तारूण्य ही एक घबाड रात्र बनली आहे. 

 
 
मन चंगा तो कठौती में गंगा, हलके फुलक आणि आनंदी मन असणारा माणूस खरा श्रीमंत. पण खरंच आज माणसाची ही श्रीमंती ढळतेय्‌. ताण आणि नैराश्य हे मनःशांती लुटत आहेत. रोजच्या आयुष्यातील दगदग, अपयश, नकार, विरह, बदल, पैशांचे व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी अपमान, यांमुळे ताण वाढत आहे. मनःशांतीच्या जाण्याबरोबरच नैराश्य, बीपी, कोलेस्ट्रॉल, हायपर टेन्शन अशा अनेक आजारांना आमंत्रण मिळतंय्‌.
 
 
सगळ्यात आधी तर बोलायला सुरुवात करायला हवी. भावना व्यक्त केल्या, की- मन शांत होतं. मनातले बोलण्याची कला अवगत करायला हवी. एकटेपणा आपोआप दूर सरेल. स्वकीयांशी असलेली नाराजी मिटवायला हवी. कुठलाही गिल्ट मनात ठेवण्यापेक्षा बोलून हलके वाटते. आपल्या घरातच आपले हितचिंतक असतात. त्यांचा दिलासा बरेच वेळा आपल्याला मोठ्या गुंत्यातून सोडवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम ठेवणे फार गरजेचे आहे. किसमत के आगे और वक्त से पहले कुछ नहीं मिलता म्हणून प्रयत्न थांबवून किंवा हार मानून चालायचे नाही. अविरत प्रयत्न करणार्‍यांपुढे नशीबही हार मानत. परिवर्तन हा समाजाचा नियम आहे आणि तो स्वीकारायला हवा. सुरुवातीला त्रास नक्की होतो, पण एक चॅलेंज म्हणून स्वीकारले तर आपण होणारे बदल देखील एन्जॉय करू शकतो. उद्याच्या काळजीत किंवा कालच्या ओझ्याखाली, आपण आज जगू शकत नाही. स्वतःला वेळ देवून छंद जोपासता येईल. जिम, योगा, म्युझिक यांनी जगायला एक नवा हुरूप येईल.
 
 
सगळीचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत आणि स्वप्न मोडली तरी कणा मोडत नसतो. पुन्हा लढण्यासाठी तो सज्ज असतो. आयुष्यात धुके कितीही दाटून आले, लांब बघणे अशक्य असेल तरी, एकएक पाऊल टाकून, रस्ता ओलांडता येतो. आपल्यात प्रचंड सामर्थ्य आहे, गरज आहे ती फक्त ते ओळखण्याची...
 
असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावूनी अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
 
7276583054