दिवाळी संपूनही कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या

    दिनांक :31-Oct-2019
अनेक नागरिक दोन तास ताटकळले
 
तिवसा, 
सर्वसामान्य जनतेच्या बहुतांश कामांशी संबंधित असलेल्या तिवसा तहसील कार्यालयात दुपारी 3 ते 3.45 च्या सुमारास काही विभागातील अधिकारी व कर्मचारी हे अनुपस्थित असल्याने संबंधित कर्मचारी आहेत कुठे, असा प्रश्न काही महत्त्वाच्या कामानिमित्त तहसील कार्यालयात आलेल्या सर्वसामान्य जनता तसेच पत्रकारांसमोर उपस्थित झाला. त्या विभागात फॅन सुरू व खुर्च्या रिक्त अशी काहीशी परिस्थिती गुरुवारी दुपारी समोर आली.
 

 
 
शासकीय कार्यालयातील कामकाजाची वेळ सकाळी 10 ते 5.30 अशी आहे. या वेळेत कार्यालयीन अधिकारी तसेच कर्मचारी यांनी त्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य जनतेला सुविधा व सेवा देणे आवश्यक आहे; असे असताना तिवसा तहसील कार्यालयात अधिकारी तर उपस्थित नव्हते, शिवाय अर्धे कर्मचारी गेले कुठे? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला होता. हजर-गैरहजेरीची नोंदी ठेवणार्‍या विभागातही केवळ फॅन सुरू होता तर तेथे सुद्धा कुणीच नसल्याची बाब समोर आली.
संजय गांधी निराधार विभागात एक वृद्ध दाम्पत्य दुपारी 3 वाजता अर्ध्या तासांपासून अधिकारी, कर्मचार्‍यांची प्रतीक्षा करीत ताटकळत बसले होते. अखेर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी याबाबत संवाद साधला असता त्यानंतर तेथे 3.45 वाजता महिला नायब तहसीलदार व काही कर्मचारी उपस्थित झाले व जनतेच्या कामाचे समाधान झाले. अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असताना जर तेथे शासकीय वेळेत काही विभागात जबाबदार अधिकारी म्हणून कुणीच उपलब्ध नसेल, तर मग सर्वसामान्य जनतेने दाद मागायची कुठे? सर्वसामान्य जनतेने शासकीय वेळेत कामासाठी उपस्थित राहायचे आणि अधिकारी व कर्मचार्‍यांनी अनुपस्थित राहायचे, असे अनेक प्रश्न अनुपस्थितीच्या या प्रकारामुळे समोर आले असून, शासकीय वेळेतील पाऊण तासाच्या अनुपस्थितीच्या या प्रकाराची जिल्हा प्रशासन दखल घेणार काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.