'कौन बनेगा करोडपती' खेळायला आली मांजर

    दिनांक :31-Oct-2019
मुंबई,
'मैं हूँ अमिताभ बच्चन और आप देख रहे हैं 'कौन बनेगा करोडपती''... सुपरस्टार अमिताभ बच्चनच्या धीरगंभीर आवाजात हा शो सुरू होतो. त्यातल्या प्रश्नांच्या चढत्या क्रमवारीने स्पर्धक आणि त्यासोबत आपलीही उत्सुकता शिगेला पोहोचते. या वातावरणात अधूनमधून बिग बी हास्यविनोदाने वातावरण हलकेफुलके ठेवण्याचा प्रयत्न करतात.. पण त्या दिवशी 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर चक्क एक मांजर आली आणि वेगळीच गंमत झाली.

 
'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवरील काही प्रसंग, अनुभव अमिताभ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत असतात. या मांजरीचा प्रसंगही त्यांनी आपल्या चाहत्यांशी शेअर केला. 'कौन बनेगा करोडपती'च्या ११ व्या सीजनच्या एका शोच्या शूटिंगच्या वेळी एक मांजर सेटवर आली. बिग बींनी या मांजरीची छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केली आहे. एका छायाचित्रात ही मांजर रोखून बघताना दिसत आहे तर दुसऱ्या छायाचित्रात ती जमिनीवर लोळताना दिसत आहे.
बिग बींनी या पोस्टसोबत मस्त ओळी लिहिल्या आहेत. ते लिहितात, 'ऐ बिलौरी , बिल्ली बिल्ली , खेलन चली KBC, जैसे आइ Fastest Finger, लोट पोट हो गयी वहीं ~ अब।' अमिताभ यांची ही पोस्ट खूप व्हायरल झाली. त्यांच्या चाहत्यांनीही त्यावर जोरदार कमेंट केल्या. 'ऑडिशन झाली नाही, तरी मांजर कशी आली', ही ७ कोटी नक्की जिंकणार... वगैरे प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी पुन्हा शूटिंग सुरू केलं आहे. आजारपणामुळे जवळपास एक आठवडा त्यांनी शूटिंग केले नव्हते.