उपेंद्र लिमये मिळवून देणार एका कुटुंबाला न्याय

    दिनांक :31-Oct-2019
आपल्या दमदार अभिनयाने वेगवेगळ्या भूमिका सक्षमपणे साकारणारा अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये. लवकरच उपेंद्र ‘आक्रंदन’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका कुटुंबावर काही जणांकडून अमानुष अत्याचार केले जातात. त्यांची केस लढवण्यासाठी कोणीही तयार नसते. या पीडित कुटुंबाच्या वकिलाची भूमिका साकारताना उपेंद्र लिमये दिसणार आहे. गोविंद मोतीराम आहेर निर्मित, शशिकांत देशपांडे लिखित-दिग्दर्शित ‘आक्रंदन’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वंदे मातरम फिल्मस’ चे विवेक पंडित या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून ‘पार्वती पुत्र प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

 
 
चित्रपटातील या भूमिकेबद्दल बोलताना उपेंद्र सांगतो की, ‘आदित्य जहागिरदार या वकिलाची व्यक्तिरेखा मी साकारत आहे. अतिशय प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ वकिलाची ही भूमिका आहे. वकिलांची देहबोली त्यांचे व्यक्तिमत्त्व याच्या निरीक्षणातून ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी केला आहे. समाजात एखादी चुकीची घटना घडल्यानंतर त्याविरोधात तात्पुरता आवाज उठवला जातो. मात्र नंतर अशा घटना विसरल्या ही जातात. चित्रपटाच्या माध्यमातून अशा विषयांवर विचार मंथन होऊन बदल घडणार असतील तर असे चित्रपट आवर्जून यायला हवेत. हे चित्रपट आपल्याला किमान विचार करायला प्रेरित करीत असतात.’
‘आक्रंदन या चित्रपटात उपेंद्र लिमयेसोबत शरद पोंक्षे, मिलिंद इनामदार, विक्रम गोखले, गणेश यादव, बाळ धुरी, तेजश्री प्रधान, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. मिलन तारी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.