गुरुदेव युवा संघाचा आंदोलनाचा इशारा

    दिनांक :31-Oct-2019
यवतमाळ,
दारव्हा तालुक्यातील आमशेत, उमार्डा वसाहत, चिकणी, मोझर, कामठवाडा, येथील शेतात रानडुक्करांचा कळप शेतपिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एकीकडे परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान केले, तर दुसरीकडे जंगली प्राण्याच्या हैदोसाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी तालुक्यातील गावांची पाहणी केली असता शेतकर्‍यांचे झालेले नुकसान दिसून आले. वन्य प्राण्यांकडून भरदिवसा उभे पीक उद्‌ध्वस्त केले जात आहे. बोंड अळीने शेतकर्‍यांचा कापूस पूर्णत: वाया गेला आहे. अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतमालाचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात भाजीपाला व अन्य पिके शेतात उभी असताना वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे.
 
 
 
त्यामुळे शेतकर्‍यांना आयुष्यभर संघर्षच करावा लागत आहे. शेतकर्‍यांच्या नशिबी संघर्षाचे जगणेच आले आहे. सरकार शेतामालाला भाव देत नाही. निसर्ग शेतकर्‍यांना साथ देत नाही. वन्यप्राणी शेतातील पीक उद्‌ध्वस्त करीत आहेत. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी स्वत:चा जीव धोक्यात घालताना दिसून येत आहे.
दारव्हा तालुक्यातील विविध गावात वन्यप्राण्यांची शेतकर्‍याच्या शेतमालाचे नुकसान केल्याचे दिसून येत आहे. दत्तू झामरे, बाजीराव पाटील, गणेश कोवे, सिद्धार्थ बनसोड, सुनीता चव्हाण, सुनील चव्हाण, प्रदीप शिवणकर, फुलिंसग राठोड, उत्तम खडके, तुकाराम गाडेकरसह अनेक शेतकर्‍यांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे.
शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा तीव‘ आंदोलनाचा इशारा गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व वनविभागला निवेदन दिले आहे.