भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभांसाठी 70 उमेदवारांचे 109 उमेदवारी अर्ज

    दिनांक :04-Oct-2019
भंडारा,
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील तीन मतदार संघात एकूण 70 उमेदवारांनी 109 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात सर्व प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. भंडारा विधानसभा मतदार संघात 34 उमेदवारांचे 39 अर्ज आजपर्यंत भरले गेले. साकोली मतदार संघात 28 उमेदवारांनी 42 तर तुमसर मतदर संघात 16 उमेदवारांचे 28 अर्ज भरल्या गेले आहेत.
 
 
 
भंडारा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणा-या प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपाचे अरविंद भालाधरे, राष्ट्रवादीचे नेते चेतन डोंगरे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे, काँग्रेसचे नेते विकास राऊत, आघाडीचे अधिकृत उमेदवार जयदीप कवाडे, नितीन तुमाने, नितीन बोरकर, मनसेच्या पूजा ठवकर यांचा समावेश आहे.
साकोली विधानसभा मतदार संघातून भाजपाचे डॉ.परिणय फुके, काँग्रेसचे नाना पटोले, वंचित आघाडीचे सेवक वाघाये, बसपाचे डॉ.प्रकाश मालगावे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. तुमसर विधानसभा मतदार संघात भाजपचे प्रदीप पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे, वंचित आघाडीचे विजय शहारे, विद्यमान आमदार चरण वाघमारे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.