स्ट्रोकबाबत जागरूक रहा

    दिनांक :04-Oct-2019
भारतात स्ट्रोकचं प्रमाण वाढताना दिसत आहे. रस्ते अपघातानंतर भारतात सर्वाधिक मृत्यू स्ट्रोकमुळे होतात. पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक घटक न मिळाल्याने मेंदूतल्या पेशी मृतवत होणं म्हणजे स्ट्रोक. 2020 पर्यंत भारतात 1.6 दशलक्ष लोक स्ट्रोकने बाधित असतील, असं संशोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे वेळीच धोका ओळखून या विकाराबाबत जागरूक व्हायला हवं. 

 
 
स्ट्रोक म्हणजे काय?
स्ट्रोकला ‘सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडंट’ म्हणजे सीव्हिए असं म्हटलं जातं. मेंदूच्या विशिष्ट भागाला होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्याने त्याचं कार्य थांबण्याच्या अवस्थेला स्ट्रोक म्हणतात. रक्तपुरवठा खंडित झालेल्या भागाचं शरीराच्या ज्या अवयवांवर नियंत्रण असेल त्यांचं काम थांबतं. स्ट्रोकमुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्त्व येऊ शकतं.
 
 
लक्षणं
स्ट्रोक येण्याच्या काही क्षण आधी लक्षणं दिसू शकतात. हसताना रूग्णाचा चेहरा एका बाजूला झुकू शकतो. दोन्ही हात उचलण्याचा प्रयत्न करत असताना एक हात खाली राहणं, बोलताना अडखळणं, एकाच वाक्याचा पुनरूच्चार करणं, गोंधळल्यासारखं वाटणं, शुद्ध हरपणं, तीव्र डोकेदुखी, मळमळ-उलट्या अशी लक्षणं दिसू शकतात. मेंदूमध्ये रक्तस्राव होत असेल तर मळमळल्यासारखं वाटतं. स्ट्रोकची लक्षणं अचानक दिसून येतात. काही लक्षणं शरीराच्या एखाद्याच भागावर दिसून येतात.
 
 
कोणाला आहे धोका?
स्थूलत्त्व, बैठी जीवनशैली, शारीरिक अकार्यक्षमता, अति प्रमाणातील मद्यपान, अंमली पदार्थांचा वापर यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. उच्च रक्तदाब, धूम्रपान, धूम्रपानाशी येणारा सततचा संपर्क, कोलेस्टेरॉलची अतिरिक्त पातळी, मधुमेह, झोपेत अडथळे येणं तसंच हृदयविकार यामुळेही स्ट्रोकची शक्यता वाढते. स्ट्रोकमागे अनुवांशिक कारणंही असू शकतात. 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना स्ट्रोक होऊ शकतो. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये स्ट्रोकची शक्यता अधिक असते.
 
 
प्रतिबंध
आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून स्ट्रोक टाळता येऊ शकतो. पोषक आहार घेणं, वजन नियंत्रणात ठेवणं, नियमित व्यायाम आणि आरोग्य तपासणी, धूम्रपान- मद्यपान टाळणं यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.