नवरात्रीचे विविध रंग

    दिनांक :04-Oct-2019
 
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
माझ्या वर्गात अनेक वेगवेगळ्या भाषांचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे जेव्हाही वेळ मिळतो, तेव्हा त्यांची भाषा आणि त्यांची राहणीमान जाणून घेण्याचा योग येतो. असच परवा परीक्षेच्या पूर्वतयारीच्या टेन्शनमधून जरासा निवांत वेळ मिळाला आणि मुलांशी गप्पा मारायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या भाषेच्या मुलांनी दिलेल्या माहितीची ही रंगेबिरंगी नवरात्री खास तुमच्यासाठी....
 

 
 
बंगाल
बंगाली लोकांमध्ये प्रत्येकाच्या घरात दुर्गादेवीची स्थापना होत नाही तर सार्वजनिकरीत्या दुर्गादेवीची स्थापना करतात. सर्व बंगाली लोक एकत्र येऊन नवरात्रीचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात. दुर्गादेवीची मूर्ती मोठी असते. डाव्या -उजव्या बाजूला गणपती, सरस्वती, लक्ष्मी व कार्तिकेय यांचीही प्रतिष्ठापना करतात. सप्तमीला दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्यावेळी पूजा करून होम-हवन केलं जातं. अष्टमीला कुमारिका पूजन केलं जातं. त्यावेळी एक ते अकरा वर्षांच्या वयोगटातील मुली बोलावून त्यांना दुर्गादेवीप्रमाणे सजवून त्यांची पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी संधिपूजेचा कार्यक्रम असतो. ही पूजा रात्रीच करतात. दसर्‍याच्या दिवशी सर्व बंगाली लोक एकत्र येऊन आरती करतात आणि नंतर देवीचं विसर्जन करतात.
 
 
गुजरात
घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी घरातील उमियादेवीला पंचामृताने अभिषेक केला जातो. देवीची विधिवत पूजा केली जाते. नऊ दिवसांसाठी देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवतात, त्याला दीप गरभ म्हटलं जातं. घरातील पुरुष किंवा महिला यापैकी एक जण नऊ दिवस कडक उपवास करतो. या उपवासामध्ये शिंगाडा, शेंगदाणे, राजगिरा, साबुदाणा या पदार्थाचं सेवन केलं जातं. नऊ दिवस सकाळ-संध्याकाळ देवीची आरती केली जाते. देवीला केळी, गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी घरातील सवाशीण महिला देवीसमोर फेर धरून कमीत कमी पाच वेळा तरी गरबा खेळते.
 
 
अष्टमीला देवीची महापूजा केली जाते. देवीसमोर होमहवन करण्यात येतं. त्या दिवशी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत र्सवच जण उपवास करतात. नवमीच्या दिवशी देवीला थाळीचा महानैवेद्य दाखवला जातो. यामध्ये साधी पोळी, हरभरे, चक्रीची भाजी, उडदाच्या डाळीचे वडे, चुरम्याचे लाडू, तांदळाची खीर, लापशी, वरण-भात या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. याच दिवशी देवीसाठी साज तयार केला जातो. वेणी, फणी, पोळपाट-लाटणे यांसारख्या वस्तू कणकेपासून बनवल्या जातात. त्या नैवेद्यावर मांडल्या जातात. हा सगळा साज नऊ पोळ्यांवर ठेवला जातो. त्यावर नऊ कणकेचे दिवे ठेवून देवीची आरती केली जाते.
 
 
तामिळनाडू
देवीच्या प्रतिमेसमोर तांदळाच्या राशीवर कलश मांडण्यात येतो. अष्टमीच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपापल्या वापरातील वस्तू एका पांढर्‍या कापडात गुंडाळून देवीसमोर ठेवतात. या वस्तूंची दशमीपर्यंत गोंडयाची फुलं वाहून पूजा केली जाते. नंतर दशमीच्या दिवशी संध्याकाळी वस्तू पुन्हा वापरात घेतल्या जातात. या वस्तूंमुळे शिक्षण, व्यापार वृद्धिंगत होतो, असं मानलं जातं. दशमीच्या दिवशी ज्या मुलांना शाळेत दाखल केलं जाणार असतं, त्यांना देवीसमोर आणतात. त्याच्या वडिलांच्या हातातली अंगठी दुधात बुडवून बालकाच्या जिभेवर ओम काढतात किंवा तांदळाच्या राशीवर ‘ओम हरी गणपतये नम: अविघ्नमस्तु!’ असं लिहिलं जातं. या कृतीमुळे मुलांच्या शिक्षणात प्रगती होते, अशी श्रद्धा आहे.
 
 
महाराष्ट्र-देशावर
घटस्थापनेच्या दिवशी मराठवाड्याचे लोक नवीन टोपली आणून त्यात काळी माती भरतात. ती माती थोडी ओली करून त्या मातीत देवीचा कळस मांडतात. त्या कलशाच्या बाजूने एकरंगी, पंचरंगी किंवा सप्तरंगी वेगवेगळे धान्य किंवा कडधान्य पेरतात. नऊ दिवस नऊ माळा घालतात. ज्या दिवशी घट बसतात, त्या दिवशी घटाला नऊ विड्याच्या पानांची माळ घालतात. त्यानंतर रोज झेंडूच्या फुलांची माळ घालतात.
 
 
तिसर्‍या दिवशी तिळाच्या फुलांची माळ घातली जाते. अष्टमीला फुलोर्‍यांची माळ घातली जाते. फुलोरा म्हणजे मैद्याची फुलं. त्याच दिवशी कुमारिकांना जेवायला बोलावले जाते. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केला जातो. त्यावेळी एक वेळ उडीद आणि ज्वारीची भाकरी करून ती लाल मिरचीच्या चटणीबरोबर खाल्ली जाते.
 
 
आगरी
घटस्थापनेच्या दिवशी आगरी समाजात एका परातीत माती घेऊन त्यात देवीचा कलश ठेवतात. त्या कलशावर ठेवलेल्या नारळाच्या शेंडीमध्ये हिराची काडी लावतात. त्यानंतर त्या हिराच्या काडीला विडयाची पानं लावून त्या पानांवर फुलं लावली जातात. त्या परातीत नऊ प्रकारचं कडधान्य टाकलं जातं. नऊ दिवस देवीला फुलांची माळ घातली जाते. घटस्थापनेच्या दिवशी तसंच नवमीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्याही एका दिवशी कुमारिकांना बोलावून त्याची पूजा केली जाते. त्यांना लाह्या नि खोबर्‍याचा प्रसाद दिला जातो. दसर्‍याच्या दिवशी होम केला जातो.
 
 
कोळी
घटस्थापनेच्या दिवशी एक नवीन टोपली आणून त्यात गाईचं शेण मिसळलेली लाल माती भरली जाते. त्याच्या मध्यभागी कलश मांडला जातो. कलशाच्या बाजूने पाच प्रकारचं कडधान्य पेरलं जातं. घटासमोर लावला जाणारा दिवा गाईच्या तुपाचा असतो. तो दिवा नऊ दिवस अखंड तेवत ठेवला जातो. पहिल्या दिवशी देवीला सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवला जातो. रोज महाआरती केली जाते. नऊ दिवस फुलांच्या माळा घातल्या जातात. नऊ कुमारिकांना बोलावून त्याची पूजा करतात. अष्टमीला होम केला जातो.
 
 
मालवणी
कलश मांडून कोकणात घटस्थापना केली जाते. कलशाच्या बाजूने फुलांच्या माळा लावल्या जातात. कलशासमोरचा दिवा अखंड तेवत ठेवला जातो. रोज दूध, साखर, खडीसाखर, फळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. नऊ कुमारिकांना बोलावून त्याची पूजा करतात. अष्टमीला होम केला जातो.
संस्कृत शिक्षिका, महाल, नागपूर