स्त्री पुरुष भेदाचे चिंतन नको

    दिनांक :04-Oct-2019
सुनीला सोवनी
 
'दृष्टी' या स्त्री अध्ययन केंद्राच्या वतीने महिला कार्यकर्त्यांच्या द्वारे महिलांचे जे व्यापक सर्वेक्षण करण्यात आले, त्यातून बाहेर आलेले निष्कर्ष हा जसा स्वतंत्र चिंतन-मंथन आणि त्या आधारे उपाययोजनांचा विषय आहे; अगदी तसाच सर्वेक्षणाच्या लोकार्पण समारंभावेळी रा. स्व. संघाचे सरसंघचालक प.पू. मोहनजी भागवत यांनी केलेले भाष्य अभ्यासणे भविष्यातील कार्ययोजनांसाठी त्याचा उपयोग करून घेणे, हादेखील महत्त्वाचा विषय आहे. 

 
 
झालेल्या सर्वेक्षणामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीची द्वारे खुली होतील, असा विचार व्यक्त करून प्रामुख्याने तीन बिंदूंवर त्यांनी आपले विचार केंद्रित केले : 
 
  1. स्त्री आणि पुरुष यांची शक्तिस्थाने भिन्न आहेत. स्त्रियांकडे निर्माणाची अफाट ताकद आहे. त्याप्रमाणे विश्वसाचीही ताकद आहे. वास्तल्य हा तिच्यातील सर्वात मोठा गुण. तर पुरुषाकडे शिकार करण्याची, परिश्रम करण्याची ताकद असली, तरी विपरीत परिस्थितीत संघर्ष करण्याची ताकद बाईकडेच असते.
  2. पुरुषांच्या प्रबोधनाची गरज, देशातील अर्ध्या संख्येतील महिलांना सक्षम करण्यापासून त्यांना न्याय्य हक्क देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. महिलांच्या सद्य:स्थितीबाबतचा अहवाल पुरुषांनी वाचला पाहिजे. तसेच त्याची सुरुवात घरापासून केली पाहिजे. महिलांना आवश्यक तेथे संरक्षण देत स्वावलंबी तसेच स्वयंसिद्ध होण्यासाठी प्रोत्साहन आणि स्वातंत्र्य दिले पाहिजे.
  3. महिलांना विकासाबाबत संदेश देण्याची पुरुषांची औकात नाही, महिलांना आपली परिस्थिती आणि मर्यादा लक्षात घेऊन आपल्या विकासाचा मार्ग स्वत:च निवडला पाहिजे.
 
 
वास्तविक पाहता, सरसंघचालकांनी व्यक्त केलेले विचार भारतीयांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन स्पष्ट करणारे असेच आहेत आणि त्याचा विस्तार अनेक प्रकारे करता येणे शक्यही आहे. लक्षात घ्यायलाच हवे ते म्हणजे, आज 2019 मध्येही मूळ चिंतनाच्या आधारेच स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठीचा सुयोग्य मार्ग उपलब्ध होऊ शकतो, हेच मोहनजी भागवत स्पष्ट करीत आहेत.
 
 
सरसंघचालकांच्या प्रतिपादनाचा गाभाच एकात्म जीवनदर्शनातून प्रकटला आहे. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋृषी, स्त्री-पुरुषांना द्विदल धान्याची उपमा देतात. दोघेही संपूर्णतः समान आहेत. कुणीही काकणभर सरस नाही िंकवा कमीही नाही. दोघेही मूलतः एकात्म परस्परपूरक, परस्परसंबंधी आहेत. बीज अंकुरणासाठी, फुलण्यासाठी, फळण्यासाठी दोघांची अनिवार्य सहयोगी आवश्यकता आहे. मात्र, पुरुष म्हणजे स्त्री नव्हे अथवा स्त्री म्हणजे पुरुष नव्हे. बृहदारण्यकातला संदर्भ सांगतो की, (14-4-2-4,5) परमेश्वर एकटाच स्वतःशी रममाण होऊ शकला नाही. त्याला दोन व्हावेसे वाटले. त्याप्रमाणे मनुष्यही रममाण होऊ शकत नाही. परमेश्वराला दुकटे व्हावेसे वाटल्यावर त्याने स्वतःचे दोन भाग केले ते म्हणजे पती-पत्नी होत. त्यातील कोणतेही एक जीवन अपूर्ण होय. पुरुषाच्या जीवनातील अपूर्ण भाव स्त्रीमुळेच पूर्ण होतो. तिच्यापासून मनुष्याची उत्पत्ती आहे.
सरसंघचालक मोहनजी तरी यापेक्षा वेगळे काय सांगत आहेत? स्त्रीमधील निर्माणशक्ती, वास्तल्यभाव पुरुषांनी लक्षात घ्यावा व तिच्या प्रगतीसाठी साहाय्यक बनावे, असेच तर सांगत आहेत.
 
 
मूळ चिंतनात दोघांमधील एकात्मता आणि नैसर्गिक वेगळेपणा अधोरेखित झाला आहे. त्याच आधारे सरसंघचालक पुरुषांची कर्तव्ये सांगत आहेत. कालौघामध्ये मूळ चिंतनमूल्ये तशीच कायम ठेवून, व्यवस्थात्मक परिवर्तन मोठ्या प्रमाणात करावे लागले. प्राचीन काळामध्ये क्रहमवादिनी तत्त्ववेत्तीपासून युद्धनिपुण विविध विद्या, कलानिपुण स्त्रिया भरपूर प्रमाणात सापडतात. स्वकर्तृत्व गाजवायला पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही संधी उपलब्ध असावी, याची अनेक प्रमाणे मिळतात. भारतावर विभिषक आक्रमणे सुरू झाली. काळ बदलला तशी परिस्थितीही बदलली आणि मग बाईचे कार्यक्षेत्र घर आणि गृहव्यवस्थापन एवढेच सीमित राहिले. पुरुषाने घराबाहेर सर्व प्रकाराने कर्तृत्व गाजवावे, अर्थार्जनासाठी संसाधने जोडावीत; तर बाईने त्यात लक्ष घालूच नये, इतकी सुस्पष्ट रेखा निर्धारित केली गेली.
 
 
सुधारणेचे वारे वाहू लागले तसे जुन्या व्यवस्थांसमोर आव्हान उभे राहणे साहजिकच होते. यातूनच समानतेचे वारे वाहू लागले. आपले स्त्रीत्व कशात आहे, याचा पुरेसा विचार न करताच, स्वतःचे पुरुषीकरण करण्यात ती धन्यता मानू लागली. त्यानेही तिचे, तिच्या परिवाराचे आणि समाजाचेही नुकसान होणे अटळच आहे.
 
 
म्हणूनच मग आजही स्त्री आणि पुरुषाने वेगळी असलेली स्वतःची ओळख व्यवस्थात्मक गरज आणि त्याच्याशी संबंधित कर्तव्ये, याची जाणीव जागी करणे आवश्यक ठरते. जे काम सरसंघचालकांनी उत्कृष्टपणे केले. स्त्रियांच्या प्रगतीला पुरुषांनी बाधक न बनता साहाय्यक बनावे, स्वतःच्या बळाचा उपयोग प्रसंगी स्त्रीच्या संरक्षणासाठी करावा. याचाही अर्थ हाच की, मुळात आपण एक आहोत, मात्र एकसारखे नाही तर परस्परपूरक साहाय्यक आहोत. त्यातूनच मनुष्याची प्रगती साधणार आहे.
 
 
सरसंघचालक मोहनजी भागवतांच्या विवेचनातील काहीसा गोंधळात टाकणारा, परंतु सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा आहे तो महिलांच्या विकासनीतीसंदर्भातला. स्त्री निसर्गतःच पुरुषापेक्षा निराळी आहे. तिच्या भावना, विचार करण्याची पद्धत, अभिव्यक्तीची साधने इत्यादी सर्वच अशारीरी गोष्टी शारीरिक भेदांप्रमाणेच वेगळ्या आहेत. याचाच दुसरा अर्थ, स्त्री-पुरुषांच्या गरजा, आव्हांनाना प्रतिसाद देण्याची तयारी, प्राधान्यक्रम, प्रतिबद्धता इ.मध्येही अंतर असण्याची शक्यता आहे. यातूनच प्रकट होणारा अर्थ म्हणजे दोघे परस्परांशी जोडले गेलेले तर आहेतच, परंतु स्वतंत्र, एकमेकाद्वितीय असेही आहेत. त्यामुळेच स्त्रियांना आपला विकास कसा साधायचा आहे, जीवनातील प्राधान्यक्रम कसे ठरवावेत, जीवन सफल नव्हे तर जीवनाचे साफल्य कशात मोजावे, हे स्त्रियांनीच ठरवणे योग्य- आवश्यक ठरते.
 
 
मात्र, जेव्हा विषय प्रश्न म्हणून येतो त्या वेळी त्याचे निराकरण फक्त महिलांनी करावे, हे येथे अभिप्रेत नाही. सृष्टीतला र्‍हास मानवाच्या विनाशास कारणीभूत होतो. उलट समृद्ध पर्यावरणातच मानवी समृद्धता दडलेली असते. स्त्री आणि पुरुष हे तर मुळातच परस्परपूरक आहेत. त्यामुळे एकातील कमतरता दुसर्‍यासाठीही मारकच असते. स्त्रियांमधील अशिक्षा िंकवा त्यांच्यावरील अत्याचार, कन्याभ्रूणहत्या यांसारखे प्रश्न संपूर्ण समाजाचेच नुकसान करणारे असतात. त्यांची सोडवणूक परस्परसहकार्यानेच व्हायला हवी.
 
 
स्त्रियांनी घरातच राहावे की घराबाहेर पडावे, की घर अणि घराबाहेर असा विचार करावा, याचा निर्णय स्त्रीनेच घ्यायला हवा. ती जर स्वतःला दुर्गास्वरुप मानत असेल तर कपडे कोणते घालावेत, कसे घालावेत, हे तिचे तिनेच ठरवावे. त्याची उठाठेव पुरुषांनी करू नये. कोणत्या रूढी-परंपरांचे जतन करायचे, कोणत्या नष्ट करायच्या, हे ठरविण्याचे धारिष्ट्य तिलाच दाखवावे लागेल. सर्व स्त्रियांना शिक्षण मिळालेच पाहिजे वा स्त्री आणि पुरुषांचा समान आग्रहाचा विषय असावा. मात्र, त्याचे स्वरूप कसे असावे हा निर्णय तिचा असायला हवा. दोघांचे जीवन बदलत्या काळात घरात आणि घराबाहेर, या प्रकारचे झाले आहे. त्यामुळे घरातल्या कार्यविभाजनात प्रत्येकाचेच सहकार्य लागेल तसेच होणार्‍या अर्थार्जनावर प्रत्येकाचाच हक्क असेल. महिलांनी राजकारणात सहभागी व्हायचे की नाही, हा सक्तीचा विषय असू शकत नाही. मात्र, निर्णयप्रक्रियेत घरात अथवा घराबाहेरील तिचा सहभाग वाढेल कसा, ही चिंता स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही करावी लागेल. तिच्या मतांचा आदर करीत निर्णय घ्यावे लागतील. काही विशिष्ट क्षेत्रे वगळता रात्रपाळीची सक्ती स्त्रीच्या एकूण व्यक्तिमत्त्वासाठी त्रासदायक ठरणारी असेल, तर स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व व्यक्ती-परिवार व समाजासाठी ओझेच ठरण्याची शक्यता आहे. याचाही निर्णय स्त्रियांनाच घेता आला पाहिजे. जेंडर बजेिंटगऐवजी महिला अभ्यास स्त्री-पुरुषांनी करून मार्गदर्शक सूत्र तयार करावे लागेल. येथे फक्त वानगीदाखल काही मुद्दे उपस्थित केले. याचप्रकारे मोठी सूची होऊ शकेल.
 
 
एक वादग्रस्त विषय गंभीर प्रश्न बनून समोर येतोय, तो म्हणजे तिच्यामधील निसर्गदत्त निर्माणशक्ती, वात्सल्यभाव, त्यासंबंधाने येणार्‍या मर्यादा, या सगळ्याकडे स्त्री-पुरुष समरूपतेच्या विकृत आग्रही कल्पनांनी बाईच बाईचे नुकसान करून घेत आहे. गर्भधारणा कधी हवी? किती वेळा हवी? मुलांचे संगोपन कसे करावे, स्वतःच्या नोकरी-व्यवसायात कधीपासून, किती वेळेसाठी गुंतावे, यांसारखे निर्णय तिच्या एकटीचेच असूच शकत नाहीत. तसेच तिच्यातील वात्सल्यभावनेला आवाहन करणारेही आहेत. पुरुषांनी संगोपनात सहकार्य दिलेच पाहिजे, मात्र मातेनेही बाळाचे हक्क, अपेक्षा आणि स्त्रीची सहजभावना याच्याशी प्रतारणा होण्याचे कारणच नाही. तिच्याकडे असणार्‍या वात्सल्यभावनेमुळे ‘दुरितांचे तिमिर जावोे। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछिल तो ते लाभो। प्राणिजात।।’ अशी आदर्शवत स्थिती निर्माण होऊ शकते.
 
 
स्वामी विवेकानंद आपल्या एका भाषणात म्हणतात, आपण स्त्री आणि पुरुषांमधील भेदांचे चिंतन करण्याची गरजच नाही. आपण सर्व जण मानव आहोत आणि परस्परांमध्ये सद्व्यवहार व साहाय्य करण्यासाठीच उत्पन्न झालो आहोत. काळ कितीही बदलला तरी जीवनमूल्यावरची दृष्टी कायम असेल, तर गरुड पक्ष्याला आपल्या दोन्ही सक्षम पंखांसह आकाशात उंच भरारी घ्यायला कितीसा वेळ लागणार?
मुक्त पत्रकार, स्त्रीविषयक अभ्यासक
94232 51909