चाहूल दसर्‍याची

    दिनांक :04-Oct-2019
सायली पाठक
 
नवरात्रीचे नऊ दिवस संपले, की- चाहूल लागते ती दसर्‍याची. नऊ दिवसाची लगबग थोडीशी कमी होते, आणि उजाडतो दसर्‍याचा दिवस. दसर्‍याचा हा दिवस प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो. यांत्रिकीकरण झालेल्या या युगात पूर्वीसारखा लहान मुलांमध्ये दसर्‍याचा उत्साह दिसून येत नाही. काय मग मुलांनो जाणून घ्यायचंय का, कसा साजरा व्हायचा दसर्‍याचा सण? चला तर मग.. 

 
 
दसर्‍याच्या दिवशी सकाळी-सकाळी झेंडूच्या फुलांचे तोरण घराला, दरवाजाला लावले जायचे, मग सगळ्या देवांची पूजा करून, घरातील हत्यारांची, सरस्वतीची पूजा केली जायची. यावेळीस लहान मलांच्या वह्या-पुस्तकांना देखील पूजण्याची आपल्याकडे पद्धत असते, त्यामुळे इतर दिवशी वह्या पुस्तकांना कंटाळलेली ही चिल्ली-पिल्ली दसर्‍याच्या दिवशी मात्र या वह्या पुस्तकांसमोर हात जोडून उभे राहताना दिसून यायची. या शुभ प्रसंगी वहीवर सरस्वतीचे चित्र काढून, त्यासोबत आपट्यांच्या पानांची पूजा देखील ही मुले अगदी मनोभावे करताना त्यांच्या चेहर्‍यावरील भाव अगदी निरागस असायचे. मुलांनो या दिवशी आपट्यांच्या पानांना सोनं असे संबोधले जाते. आपट्यांची पानं नव्हे, तर सोनं घरी आलेलं असायचं.
 
 
आधी देवबाप्पाला आणि मग नंतर मोठ्यांना हे सोनं देऊन ही चिल्ली-पिल्ली सगळीकडे सोनं वाटण्यासाठी छान-छान कपडे घालून तयार होत असत. त्यांना या बदल्यात कोणी आशीर्वाद देत, तर कोणी गोड-गोड खाऊ, तर कोणी छान-छान भेटवस्तू. त्यांचे ते चिमुकले हात सोन्यांच्या पानांनी भरून जात. मिळालेल्या चॉकलेट्स, गोळ्यांनी या चिमुकल्यांच्या आनंदाला कशाचीही तोड राहत नसे. काही ठिकाणी छोट्या-छोट्या कुमारिकांचे पाय धुऊन, हळदी-कुंकू, भेटवस्तू देऊन त्यांचे पूजन केले जायचे, जेव्हा मोठ्या-मोठ्या बायका त्यांच्या इवलुशा पायांना हात लावून नमस्कार करायच्या, तेव्हा तर या लहान मुलींच्या चेहर्‍यावरचा आनंद बघण्यासारखा असे.
 
 
दसर्‍याच्या दिवशी आणखी एका गोष्टीचं कौतुक या लहान मुलांमध्ये असायचे, ते म्हणजे- रावण दहन दहा तोडांच्या महाकाय रावणाला जळताना पाहून कार्टूनमधीलं एखाद्या व्हिलन कॅरेक्टरला मारल्यावर जो उत्साह असतो, त्याप्रकारे पुतळ्याला जळताना पाहून ही चिल्ली-पिल्ली उड्या मारून धम्माल करत असत. आणि या दिवशाची सांगता आजी- आजोबांच्या मांडीवर डोकं ठेवून रावण दहनाची गोष्ट ऐकत या पिटुकल्यांचा सण संपन्न होतं असे.
 
 
काय मग मुलांनो मज्जा आली ना, हा लेख वाचून? चला तर मग थोडं त्या मोबाईलच्या अॅपमधून बाहेर निघून यावर्षीचा दसरा जरा हटके पद्धतीने साजरा करूया.