आधुनिक व्यसन...

    दिनांक :04-Oct-2019
माधुरी साकुळकर
 
आईने ‘मोमो’ खेळायला मनाई केली म्हणून मुलाने आत्महत्या केल्याचे परवा वाचण्यात आले. त्याआधी, मोबाईल काढून घेतल्यामुळे सोळा वर्षांच्या एका मुलीने आत्महत्या केली होती, तर ‘ब्लूव्हेल’ खेळताना मनप्रीतने केलेली आत्महत्या, दर्शवितात- नवीन व्यसनं आणि त्याच्या आधीन होणारी तरुणाई!
 
 
मुलांवर कुठे कुठे व केव्हा केव्हा लक्ष ठेवायचं, मुलांचे मित्रमैत्रिणी कोण, मुले कुठे जातात, काय करतात, अभ्यास करतात का, कोणकोणते गेम्स मोबाईलवर खेळतात, कोणकोणत्या साईट्‌सना मुलं भेट देतात.... इ. आईबाबा सतत मुलांच्या मागे तर राहू शकत नाही. त्यांच्या मागे काही दिवसांनी गुप्तहेर लावायची वेळ येईल. 

 
 
कुठल्याही गोष्टींनी मर्यादा सोडली की, त्याचे व्यसनात रूपांतर होते. सध्या दारूचे व्यसनमुक्ती केंद्र आहे, तंबाखू-गुटख्याचे नाही. गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणे, हा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे काही लोक थुंकतात. इंटरनेट डिअॅडिक्शन सेंटर आहे. उद्या लहान लहान मुलांना या केंद्रात भरती करण्याची वेळ येईल.
 
 
कुणाला कशाचे व्यसन लागेल, हे सांगता येत नाही. हल्ली टीव्ही आणि सीरियल यांचे व्यसन इतके वाढले आहे की, कुणी कुणाकडे त्या वेळात जात नाही आणि गेलेच तर ज्यांच्याकडे जातात ते लक्षच देत नाहीत, टीव्हीच पाहात बसतात. वाटलंच तर ब्रेकब्रेकमध्ये बोलतात. माणसांपेक्षा (जवळच्या, स्नेही, नातेवाईक, रक्ताच्या) टीव्ही त्यांना जास्त जवळचा वाटतो. जीवनाचा सगळा टाईमटेबल टीव्ही ठरवितो. या ब्रेकमध्ये कूकर लावीन, त्या ब्रेकमध्ये भाजी फोडणी देईन, त्यानंतरच्या ब्रेकमध्ये जेवायला बसू, त्यापुढच्या ब्रेकमध्ये मी मागचं आवरेन. गप्पांचा विषयही त्या कृत्रिम माणसांच्या कृत्रिम सुखदु:खाचा. एखादा भाग जरी सुटला तरी बायका इतक्या अस्वस्थ होतात की, ज्याचे नाव ते!
 
 
तेच मोबाईलचे. परवा एका स्नेह्यांकडे गेलो. बाहेर चपला तर दिसत होत्या, पण घरातून आवाज येत नव्हता. बघितले तर आईवडील आपापल्या मोबाईलमध्ये डोळे घालून आणि मुले आपापल्या मोबाईलवर गेम खेळत होते. घरातला संवाद टीव्हीमुळे कमी झाला होता, आता मोबाईलमुळे संपलाच. संपर्काचं एक साधन! जगातल्या दूरदूरच्या माणसांशी संवाद वाढवतो, जुने मित्र भेटतात, बॅचमेटस्‌ भेटतात. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे माहीत असतं, पण आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय हे कळत नाही. ‘मोबाईल मॅनिया’ नावाचा एक नवीन रोग जन्माला आलाय. काही लोक मोबाईल सतत जवळ बाळगतात, अगदी सकाळी फिरायला जातानासुद्धा! जणूकाय तो सुटा अवयवच आहे. आपल्याला वेळी-अवेळी फोन यायला आपण काय डॉक्टर आहोत (पेशंटचा जीव आपल्या हातात आहे?), की पंतप्रधान? पण, काही लोक मोबाईलशिवाय एक सेकंदही राहू शकत नाहीत.
 
 
परवा एक मैत्रीण म्हणाली, ‘‘अगं, काल दिवसभरात एकही फोन आला नाही. मी इतकी अस्वस्थ झाले की, विचारू नकोस. मला वाटलं, आपण इतके दुर्लक्षित झालो की काय? आपल्याला लोकांनी वाळीत तर टाकलं नाही ना? मी दहादा मोबाईल पाहिला, न जाणो एखादा कॉल आला असेल, आपल्याला रिंग ऐकू आली नसेल, मोबाईल सायलेंट तर नसेल...’’ लोक दहादा मोबाईल पाहतात. कुणाचा फोन तर आला नसेल म्हणून. जणू काय एखादा फोन घेतला नाही तर जगबुडी होणार आहे.
 
 
स्त्रियांचे व्यसन म्हणजे खरेदी करणं. सतत काही ना काही खरेदी करत असतात बायका. याचा आपल्याला खरंच काही उपयोग आहे का?... ती वस्तू आपण वर्षातून एकदातरी वापरणार आहोत का?... कशाचाही विचार नाही. घरोघरी केकपॅन असतात, आप्पेपात्र असते, ओव्हन असते. याचा खरंच किती उपयोग आपण करतो? बाहेर इतके आकर्षक केक मिळत असताना खरंच आपण केक करतो का? साड्यांच्या सर्व सेलला भेट देणे, हा बायकांचा जन्मसिद्ध अधिकारच असतो, तर गाड्यांच्या आणि मोबाईलच्या शोरूमला भेट देणं हा पुरुषांचा नैसर्गिक आणि घटनादत्त अधिकार असतो. घ्यायचं नाही, पण बघायला काय हरकत आहे, पाहायला थोडीच पैसे लागतात. जस्ट विंडो शॉपिंग!
 
 
आधी ‘पोकीमॉन गो’ या व्हिडीओ गेमने गोंधळ घातला. मुलं हरवत, कुठेही जात. पण, ब्लूव्हेलने तर त्याच्याही वरची पायरी गाठली. फिलिप बुडेकीन या रशियन मुलाने हा खेळ तयार केला. त्याने व्यक्तिश: 17 जणांना आत्महत्या करायला लावली. सध्या तो तुरुंगात आहे. ब्लूव्हेल चॅलेंज गेममध्ये फिफ्टी डे डेअर म्हणजे 50 दिवस रोज एक आव्हान स्वीकारून ते पूर्ण करायचं. रोज एकापेक्षा एक कठीण आव्हान देऊन सवय केली जाते आणि शेवटचे पन्नासावे चॅलेंज म्हणजे आत्महत्या करणे. कोवळ्या वयातील मुलांना ना विचारशक्ती, ना सदसद्विवेकबुद्धी. ते झपाटल्यासारखे खेळतात आणि त्या अवस्थेत आत्महत्या करून मोकळे होतात. मुंबईच्या अंधेरीतील मनप्रीत सहानी या 14 वर्षांच्या मुलाने आपल्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या आधी शंभरेक जणांनी या गेममुळे आत्महत्या केली. रशिया, कझागिस्तान, किर्गिस्तान या देशांत या गेमवर बंदी आहे. भारतातही या गेमवर बंदीची मागणी होत आहे.
 
 
व्यक्ती तितकी व्यसनं! त्यापासून दूर राहायला कसं शिकायचं आणि शिकवायचं, हा प्रश्न आहे. पिढीगणिक व्यसनांच्या संकल्पना आणि दृष्टिकोन बदलतो. आमच्या पिढीत, दारू म्हणजे वाईटच, असं होतं. आमची पुढची पिढी म्हणते, ‘‘तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तो दारू पिऊन गटारात लोळत नाही, की आपल्या जबाबदार्‍या टाळत नाही, की रस्त्यावर गोंधळ घालत नाही. आजकाल पार्ट्यांमध्ये प्यावीच लागते, नाहीतर आपण वेगळे पडतो.’’ सोशल ड्रिंिंकग स्टेटस्‌ िंसबॉल आहे. सिगरेटमधून गांजा पिऊन आपल्या धुंदीत राहणारी काही मुलं आहेत. सगळ्यात आधी उघडणारं दुकान म्हणजे देशी दारूचं आहे!
9850369233