पॅरिस पोलीस मुख्यालयात चाकूहल्ला; चार अधिकारी ठार

    दिनांक :04-Oct-2019
पॅरिस,
पॅरिसच्या मध्यवर्ती भागातील पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गुरुवारी चार पोलीस अधिकाऱ्यांना चाकूने भोसकून ठार केले, त्यानंतर या हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले.

 
 
 
दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर मुख्यालयाच्या संकुलास वेढा घालण्यात आला आणि पोलीस व आपत्कालीन वाहनांना पाचारण करण्यात आले. या परिसरातील एक मेट्रो स्थानक आणि पर्यटकांचे आकर्षण असलेले एक ठिकाण या घटनेनंतर बंद करण्यात आले.
हल्लेखोर पोलीस मुख्यालयातीलच कर्मचारी होता, त्याला मुख्यालय इमारतीच्या परिसरातच गोळ्या घालून ठार करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. हल्ला झाल्यानंतर ध्वनिक्षेपकावरून त्याबाबत तातडीचा संदेश देण्यात आला.
या घटनेनंतर लोक सैरावैरा धावताना दिसत होते तर काही जणांच्या रडण्याचा आवाजही ऐकू येत होता, असे हल्ला झाला त्या वेळी तेथे असलेल्या इमेरी सियामंदी यांनी सांगितले. पोलीस अधिकारी रडत असल्याचे आपल्याला दिसले, तेथे भीतीचे वातावरण होते, असेही त्यांनी सांगितले. अंतर्गतमंत्री ख्रिस्तोफर कॅस्टनर हे तुर्कीच्या दौऱ्यावर रवाना होणार होते, मात्र घटनास्थळी भेट देण्यासाठी त्यांनी आपला दौरा पुढे ढकलला आहे.