महायुतीला विक्रमी यश मिळेल

    दिनांक :04-Oct-2019
- मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
- भाजपा 150 पेक्षा जास्त जागांवर लढणार
तभा वृत्तसेवा
मुंबई,
भाजपा-शिवसेना, रिपब्लिकन, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती यांच्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी व्यक्त केला. ते महायुतीच्या संयुक्त पत्रपरिषदेत बोलत होते.
 
 
 
महायुतीत भाजपा 150, शिवसेना 124 व इतर मित्रपक्ष 14 जागा लढणार, असे सूत्र असले तरी, प्रत्यक्षात भाजपा 150 पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मित्र पक्षांकडून काही जागा त्यांच्या चिन्हांवर, तर काही जागा भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जाणार असल्याने हा आकडा 150 पार होणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
 
 
लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीला मोठे यश मिळाले. भाजप शिवसेना युती ही िंहदुत्वाच्या विचारधारेवर आधारित आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष व्यापक वैचारिक भूमिकेतून एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणुकीचे जागावाटप करताना आम्ही सर्व घटक पक्षांनी तडजोड केली आहे. आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्याच्या विकासाला गती दिली. पुन्हा सत्तेवर आल्यावर आम्हाला राज्यातील दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करून सुजलाम सुफलाम करायचे आहे. आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीला अभूतपूर्व यश मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 
बंडखोरांना इशारा
जागावाटपावरून काही ठिकाणी नाराजी असली तरी दोन दिवसांत सर्व बंडखोरांची समजूत काढण्यात यश मिळेल. जे ऐकणार नाहीत त्यांना महायुती एकत्रितपणे धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.
उमेदवारी मिळाली नसलेल्यांच्या भूमिकेत बदल
ज्यांचे टिकीट कापल्या गेले, त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे सांगत जे बाहेर होते, त्यांना सभागृहात आणले आणि आत असलेल्यांना बाहेरची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्रिपद आकड्यांवर अवलंबून नाही : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्रिपद हे वाट्यात आलेल्या आकड्यांवर अवलंबून नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र घडवायचा असेल तर ओढताण करुण चालत नाही. आदित्यच्या मुख्यमंत्री पदाच्या एका प्रश्नावर बोलताना उद्धव म्हणाले की, निवडणुकीच्या सक्रीय राजकारणात िंकबहूना वैधानिक प्रक्रियेत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील कुणी व्यक्ती पाऊल टाकत आहे. आता शिवसैनिक जर त्याच्याकडून मुख्यमंत्रिपदाची आशा ठेत असेल, तर त्यात काही गैर नाही िंकवा कुणाला याबाबत आक्षेप असण्याचेही काही कारण नाही.
 
 
युतीत लहान भाऊ मोठा भाऊ हे काही नसून, मुळात भावाच नाते मजबूत असणे जास्त महत्त्वाचे असल्याचे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. महायुतीचा पहिला प्रश्न जागा सोडविण्याचा होता आणि दोन्ही नेत्यांनी तो समजूतदारपणे सोडवला. त्यामुळे आता पहिले निवडणूक, त्यानंतर निकाल आणि नंतर काय ते आम्ही चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.