ग्रेटा थुनबर्गच्या निमित्ताने...

    दिनांक :04-Oct-2019
न मम  
श्रीनिवास वैद्य  
 
ग्रेटा थुनबर्ग नावाच्या या षोडशीने सध्या जगातील वामपंथी विचारवंतांना व दांभिक पर्यावरणवाद्यांना भारावून टाकले आहे. स्वीडनच्या या मुलीने, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरणविषयक परिषदेत एक जोशपूर्ण, भावपूर्ण भाषण देऊन जगातील तमाम राजकारण्यांना ‘ग्लोबल वार्मिंग’वरून यथेच्छ धुतले. आमच्या भविष्याला, स्वप्नांना नष्ट करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आमच्या वतीने काही बोलण्याचाही तुम्हाला हक्क नाही, असे ती म्हणाली. ‘हाऊ डेअर यू?’ (तुमची हिंमतच कशी होते?) हे तिचे वाक्य खूप गाजले, आजही गाजत आहे. तिच्या या अल्प भाषणाने जगातील ग्लोबल वार्मिंगची समस्या काही सुटणार नाही. पण तिने खळबळ माजवली. काहींचे म्हणणे आहे की, ही खळबळ हेतुपूर्वक माजवण्यात आली आणि माझेही हेच मत आहे. याचे कारण, या भाषणानंतर एका पत्रकार परिषदेत तिला एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता, ती त्या प्रश्नाला धड उत्तरही देऊ शकली नाही. याचा अर्थ, तिचे भाषण कुणीतरी तिला लिहून दिले असावे आणि तिने ते व्यवस्थित पाठ केले असावे. तसेही, तिचे घराणे अभिनयाच्या क्षेत्रात आहेच. भाषण देताना मनातील चीड व्यक्त करताना आपला श्वेतवर्णी चेहरा लालबुंद करण्याचा अभिनयही तिला छान जमला होता. थोडक्यात, अभिनय व पाठांतर यांचा सुरेख मिलाफ तिच्या भाषणात होता, असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही. तिच्या या भाषणानंतर तिला ‘राईट लिव्हलीहूड अवॉर्ड’ नावाचा समांतर नोबल पुरस्कार घोषित करण्यात आला. म्हणजे एका भाषणावरून तिला सुमारे 70 लाख रुपये (94 हजार युरो) पुरस्कार म्हणून मिळाले. एवढेच नाही, तर स्वीडनच्या चर्चने ग्रेटा थुनबर्गला येशू ख्रिस्ताचा खरा वारस म्हणून जाहीर करून टाकले आहे.
 

 
 
ग्रेटाचे वय लहान आहे. काही हरकत नाही. परंतु, तिने पर्यावरणरक्षणाचे काही काम केले का, हे कळायला मार्ग नाही. भाषण देणे, जगात खळबळ माजवून देणे, याने काही पर्यावरणरक्षण होत नाही. ‘पर्यावरण रक्षणासाठी काम करणे’ आणि ‘पर्यावरण रक्षण करणे’ यात फरक आहे. आम्ही तो समजून घेतला पाहिजे. त्यासाठी भारताकडे वळू या. कर्नाटक राज्यातील बंगळुरूपासून 80 किमी. अंतरावर असणार्‍या हुलिकल गावातील सालुमरद तिमक्का या 105 वर्षीय महिलेचे नाव बर्‍याच जणांना माहीतही नसेल. या तिमक्का यांना 2019 साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. असे काय केले या तिमक्का आजींनी? त्यांनी गेल्या 80 वर्षांत 385 वटवृक्ष लावून त्यांचे संगोपन केले. एवढेच नाही, तर अन्य प्रकारची 8000 झाडे लावलीत. कुठेही भाषणे नाहीत, लेखन नाही, एखादा एनजीओ स्थापन करण्याचे नाटकही नाही. फक्त पर्यावरण रक्षणाचे प्रत्यक्ष काम करीत राहिली ही आजी! याला म्हणतात पर्यावरणरक्षण. ग्रेटा जे करते ते ‘पर्यावरणरक्षणासाठी’, आणि तिमक्का आजी करतात ते ‘पर्यावरणरक्षण.’ इतका हा, म्हटला तर सूक्ष्म नाहीतर ठळक फरक आहे. आपल्या भारतात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी प्रसिद्धीकडे ठामपणे पाठ फिरवून पर्यावरणरक्षणाचे प्रत्यक्ष काम केले आहे. त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. परंतु, पाश्चात्त्यांकडे असले काही दिसत नाही. तिकडे दिखाव्यालाच महत्त्व आहे की काय असे वाटते आणि या असल्या पाश्चात्त्य दिखाव्याला आमचे भारतीय पत्रकार, विचारवंत भुलतात, हे अधिक दुर्भाग्याचे आहे. त्यांना असले हुरळून जाण्याचे भरपूर पैसे मिळतात, हे खरे असले तरीही...
 
धर्माच्या बाबतीतही आपल्याकडे असाच गोंधळ उडालेला दिसतो. कशाला धर्म म्हणायचे आणि कशाला ‘धर्मासाठी’ म्हणायचे, या संकल्पना स्पष्ट नसतात. जुनी घटना आहे. मुरारी बापू यांची एका शहरात सात दिवसांची रामकथा होती. स्थळ शहरापासून थोडे दूर होते. आसपासच्या गावातील भाविक येणार होते. शहरातील ऑटोरिक्षाचालकांनी ठरविले की, रेल्वेस्थानक वा बसस्थानकापासून कथास्थळी जाणार्‍या सर्व भाविकांना मोफत न्यायचे. बापूंच्या रामकथेत अशा पद्धतीने योगदान द्यायचे. ऑटोचालकांच्या या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत, कौतुक, अभिनंदन केले. नंतर याच शहरात काही महिन्यांनी एक घटना घडली. आपल्या मागण्यांसाठी एक दिवस अचानक शहर वाहतूक बसचालकांनी संप पुकारला. दैनंदिन प्रवाशांची प्रचंड कुचंबणा झाली. ऑटोरिक्षाचालकांनी तिप्पट-चौपट भाडे घेऊन या संधीचा वारेमाप फायदा घेतला. पण, यातही काही चालक असे होते की त्यांनी, पैशाचा लोभ बाजूला सारून प्रवाशांकडून नित्याचेच भाडे घेतले. आता या दोन घटना जवळ आणून बघा. रामकथेसाठी येणारे भाविक प्रवास खर्चाच्या तयारीने आले होते, तरीही ऑटोचालकांनी त्यांना मोफत नेले. त्यांना वाटले की हा धर्म आहे. तो धर्म नव्हता. ते कृत्य ‘धर्मासाठी’ होते. परंतु, संपकाळात अडचणीतल्या प्रवाशांकडून नित्याचेच भाडे घेणे, हा धर्म होता. हा फरक ज्याला कळतो तो खरा ‘धार्मिक’ असतो. पूजापाठ, उपासना, व्रतवैकल्ये इत्यादी धर्मासाठी असतात, धर्म नसतो. हा विवेक समाजात जागृत करण्यात समाजधुरीण कमी पडलेत, म्हणून आज आपल्या समाजात भलत्याच गोष्टींना ‘धार्मिक’ समजण्याची प्रथा पडली असावी.
 
आणखी एक आठवण. एकदा संघाच्या काही कार्यकर्त्यांची बैठक होती. दिवसभर, संघटनेच्या दृष्टीने काय करायचे, याची चर्चा झाली. रात्री भोजनोत्तर सर्वत्र निजानीज झाली असताना, काही तरुण कार्यकर्ते गप्पागोष्टी करत बसले. त्यात हसणे-खिदळणेही सुरू होते. याचा त्रास बाजूच्या खोलीत झोपलेल्या संघचालकांना झाला. ते तिथे आले आणि थोडे दटावून म्हणाले- हे काय सुरू आहे? या तरुणांसोबत गप्पा करत बसलेले संघाचे अखिल भारतीय अधिकारीही होते. ते म्हणाले- हा संघ आहे. संघचालक थोडे चपापले व नंतर म्हणाले- मग दिवसभर आपण केले ते काय होते? संघ अधिकारी म्हणाले- ते संघासाठी होते.
 
पाश्चात्त्यांच्या पर्यावरणरक्षणाच्या बाबतीतही हेच घडले आहे. हे देश पर्यावरण रक्षणासाठी खूप काही करतात. परंतु, म्हणून ते पर्यावरण रक्षण करत असतील, असे नाही. तिमक्का आजींसारखे हजारो भारतीय, एकवेळ पर्यावरण रक्षणासाठी काही करत नसले, तरी पर्यावरणरक्षण मात्र करीत असतात. त्यांना मात्र जागतिक स्तरावरचे पुरस्कार मिळत नाहीत. ते मिळतात कैलास सत्यार्थी अथवा मलाला युसुफजाईसारख्यांना. कैलास सत्यार्थी, बालमजुरीविरुद्ध काम करतात. बालमजुरीमुळे मुलांचे बालपण हरविले जाते, हे खरे आहे. पण, आईवडील आपल्या मुलांना शाळेत न पाठवता, मजुरीवर का पाठवितात? त्यांची काय अपरिहार्यता असते? हे दूर करण्यासाठी मात्र सत्यार्थी यांचे प्रयत्न दिसून येत नाहीत. तीच गोष्ट मलालाची. तिने पाकिस्तानातील मुलींना शिक्षणाची वाट सहजसुलभ व्हावी म्हणून काय केले, हे जगासमोर आले पाहिजे. जगभरात हिंडून  फक्त भाषणे देण्याने होत नाही. परंतु, पाश्चात्त्य देशात अशाच लोकांना, अशाच कार्याला मान्यता असली पाहिजे, असे दिसते. ‘अम्ही असू सुखाने पत्थर पायातील। मंदिर उभविणे हेच आमुचे ध्येय।’ ही वृत्ती जितकी भारतातील लोकांमध्ये दिसते, तितकी ती पाश्चात्त्यांमध्ये दिसते की नाही, माहीत नाही. शिक्षणातही हेच दिसून येते. मूलभूत विषयांकडे विद्यार्थी वळताना दिसत नाहीत. उपयोजित विषयांकडेच (अप्लाईड) सर्वांची धाव असते. या बाबतीत मात्र पाश्चात्त्यांची विवेकबुद्धी शाबूत आहे. तिकडे मूलभूत विषयांतील संशोधनाला आजही प्रतिष्ठा आहे. त्यासाठी आयुष्य खर्ची घालण्याची तिकडे तयारी दिसते.
समाजजीवनात ‘धर्म’ आणि ‘धर्मासाठी’, ‘संघ’ आणि ‘संघासाठी’ तसेच ‘पर्यावरणरक्षण’ व ‘पर्यावरणरक्षणासाठी’ दोन्हीही आवश्यक आहे. परंतु, यातील फरक ओळखून वेळप्रसंगी आपल्या हातून धर्मच घडेल, याचा विवेकही जागृत असायला हवा. आपल्या प्राचीन साहित्याचा, इतिहासाचा डोळे उघडे ठेवून सूक्ष्म अभ्यास केला, तर आपल्यातही हा विवेक जागृत होईल. असा अभ्यास असला की, मग जीवनातील कुठल्याही प्रसंगात, ‘धर्म’ म्हणजे काय आणि ‘धर्मासाठी’ म्हणजे काय, याचा कधीही संभ्रम राहणार नाही.
9881717838