भंडारा उधळला आहे आता इतिहास घडवणार : उद्धव ठाकरे

    दिनांक :05-Oct-2019
मुंबई,
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर, कुणबी, माळी, तेली, वंजारी, ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी या समाजातील लोकांच्या मागण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच आपण भंडारा उधळला आहे आता आपण इतिहास घडवणार, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 
 
यावेळी उद्धव ठाकरे म्‍हणाले की, अर्ज भरण्याची वेळ निघून गेल्यावर आपण मला भेटलात. म्हणून तुम्हाला खास धन्यवाद. आता तुम्ही प्रामाणिकपणे आलात व मला एकच म्हणालात आहात की, आम्हाला काही नको फक्त आम्ही ज्या समाजाचे नेतृत्व करतो त्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. जे सरकार समाजाला न्याय मिळवून देणार नसेल तर ते सरकार काय कामाचे? तसेच तुमच्यापैकी आज कोणीही आमदार, खासदार नाहीत, मात्र तुम्ही आमच्याबरोबर आहात. हीच ताकद मला हवी आहे, साधीसुधी माणसंच इतिहास घडवत असतात. त्यामुळे आता इतिहास घडणार नाही, तर तो आम्ही घडवणार आहोत. यावेळी त्यांनी समाजाच्या नेत्यांना तुम्ही केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी स्वतः एक शिवसेना म्हणून कटीबद्ध असल्याचेही सांगितले.
 
साध्या माणसांनीच मोगलांचे तख्त फोडले. तसेच आपण भंडारा उधळला आहे आता आपण इतिहास घडवणार. जे अशक्य होते ते शिवाजी महाराजांनी आपल्याला शक्य करून दाखवलं आहे. आपण या मातीतले असल्‍याचे उद्धव ठाकरे म्‍हणाले.
 
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्‍हणाले की, जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका, असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे. तसेच शिवसेना असा एक पक्ष आहे की जी सत्तेत असून देखील शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरला. शिवसेना पक्ष हा समाजासाठी आहे. समाजाचे प्रश्न हे गेली ६० ते ७० वर्ष पासून आहेत म्हणून ते आज आमच्या सोबत आलेले आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांचे प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि तसे नसेल तर दुसऱ्या मार्गाने ते सोडवू.माझ्यासोबत आलेले हे आजचे मित्र आहेत ते जागा मागत नाहीत तर फक्त आमच्यासाठी जागे रहा असे बोलत आहेत.