सीमा ओलांडू नका, भारत तुम्हाला अतिरेकी ठरवेल

    दिनांक :05-Oct-2019
- इम्रान खान यांचा गुलाम काश्मिरींना सल्ला
इस्लामाबाद,
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यावेळी काश्मीरचा राग वेगळ्याच पद्धतीने आळवला. सीमेपलीकडून भारतात घुसणार्‍या अतिरेक्यांना त्यांनी चक्क नागरिक संबोधले आणि नियंत्रण रेषा ओलांडू नका. भारत तुम्हाला अतिरेकी ठरवेल आणि तुमच्या मानवतावादाला पाकिस्तान प्रायोजित इस्लामिक दहशतवाद जाहीर करेल, असे त्यांनी सांगितले.
 
 
 
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 निष्प्रभ करण्यात आल्यापासून तेथील नागरिक त्रासदायक जीवन जगत आहेत. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी गुलाम काश्मिरातील नागरिक मानवतावादी दृष्टिकोनातून भारतात जाण्याचा प्रयत्न करतात, पण भारत त्यांना अतिरेकी संबोधतो आणि गोळ्या घालतो. आमच्या प्रत्येक नागरिकाला अतिरेकी ठरविण्याचे धोरणच भारत सरकारने स्वीकारले आहे, असे टि्‌वट त्यांनी केले आहे.
 
अतिरेक्यांना भारतात पाठविण्यासाठी पाकिस्तानचे सैनिक नेहमीच सीमेवर गोळीबार करीत असतात, पण भारतीय जवान त्यांचा प्रत्येक डाव उधळून लावत असतात. या कारवाईत अनेक अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे. यामुळे इम्रान खान यांनी आता या अतिरेक्यांना गुलाम काश्मिरातील नागरिक संबोधणे सुरू केले आहे.
 
आपल्या काश्मिरी बहीण-भावांचे दु:ख दूर करण्यासाठी आमचे नागरिक तिथे जाण्याचा प्रयत्न करीत असतात. मानवतेच्या दृष्टिकोनातून ते असे करतात, पण भारत त्यांना अतिरेकी ठरवतो. पाकिस्तान आपले अतिरेकी भारतात पाठवतो, असा आरोप केला जातो, असेही ते म्हणाले. आपल्या काश्मिरी बहीण-भावांचे दु:ख पाहून, गुलाम काश्मिरातील जनता संतप्त झाली आहे. त्यांच्या मनात भारत सरकारविरोधात प्रचंड रोष आहे, असे सांगण्याचा विसरही त्यांना पडला नाही.