महायुती, ‘सरकार-2’च्या वाटेवर...

    दिनांक :05-Oct-2019
‘प्रात कि ही ओर हैं रात चलती, कौन बदलता हैं रंगमंच इतनी खूबीयोंके साथ, यह निशाका सपना था या अपने आप पर किया था गजब का अधिकार तुमने...’ या हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी आहेत. यातली, ‘कौन बदलता हैं रंगमंच इतनी खूबीयों के साथ?’ ही ओळ तशी वर्तमान परिप्रेक्ष्यात महत्त्वाची आहे. या प्रश्नाच्या उत्तराचं गूढच त्याचं सौंदर्य आणि शाश्वतता वाढविणारं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे चित्र अगदीच स्पष्ट झालेले होते. तसे ते त्या आधीही स्पष्टच होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘मीच परत येणार’ हा आत्मविश्वास होताच. अर्थात, तो त्यांच्या कामाने दिला होता. शरद पवारांनी त्यांची संभावना, नवा आहे, साधा आहे, (त्यांना कच्चा म्हणायचे असावे) अशी केली होती. मात्र, फडणवीसांनी ते कसे आहेत, हे दाखवून दिले. परवाच्या कसोटी सामन्यात नवख्या मयांक अग्रवालने सलामीला येत द्विशतकी नजराणा दिला, तशीच खेळी फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे 2024 पर्यंत राज्यातही भाजपाचेच सरकार असणार, हा आत्मविश्वास त्यांना असणे अत्यंत स्वाभाविक आहे, मात्र तो जनसामान्यांनाही आहे. पाचामुखी परमेश्वर बोलतो, असा एक वाक्‌प्रचार आहे. त्यामागचा भावार्थ असाच की, सामान्य जनांची जी भावना असते ती वाचता आली, तर भविष्य काय आहे हे कळते. यावेळी मराठी जनांची भावना हीच आहे, पुन्हा तेच सरकार!
 
 
 
निवडणुकीच्या या संधिकाळानंतर पुन्हा एकदा नवी पहाट होणार आहे. त्याच्याकडेच हा प्रवास आहे. या सरकारची गेल्या पाच वर्षांतली दमदार कामगिरी, भारतीय जनता पार्टीच्या बाजूनेे असलेले देशभरातले जनमत आणि राज्यात निराशेच्या गर्तेत फसलेले विरोधक, नेतृत्वहीन अवस्था, पैसा-केडर आणि नेतृत्व नाही अशी अवस्था, त्यामुळे मुख्यमंत्री फणडवीस म्हणाले त्याप्रमाणेच, राज्यात विरोधकच नाहीत, अशी अवस्था आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्यांदाच असे होते आहे की, कॉंग्रेसकडे अनेक ठिकाणी उमेदवारच नाही. कधीकाळी कॉंग्रेसचा गड असलेल्या उपराजधानीच्या शहरातही त्यांच्याकडे उमदेवार नाहीत, ही अवस्था केविलवाणीच आहे. सत्ताधारी पक्षाबद्दल जनतेत नाराजी असते. ‘अॅण्टी इन्कम्बन्सी’ असे म्हणतात, तसे ते अजूनही कॉंग्रेसबद्दलच आहे. त्यामुळे संहिता नीट लिहिली गेली आहे, तालमीही झाल्या आहेत, दिग्दर्शन चांगले आहे, आता निवडणुकीचे नेपथ्यही लागले आहे. प्रयोगाची घंटा वाजली आणि पडदा उघडला गेला आहे. काय सादर होणार आहे, हे माहिती असूनही हा प्रयोग कसा रंगत जातो, याची उत्सुकता मात्र आहे. याचे कारण सगळेच तेच असले आणि संहिता माहिती असली, तरीही प्रत्येक प्रयोग हा स्वतंत्र असतो आणि तो पहिला म्हणूनच रंगत असतो. त्या पृष्ठभूमीवर या निवडणुकीचा निकाल काय लागणार, हे माहिती असले आणि 2014 च्या निवडणुकीचाच हा दुसरा प्रयोग असला, तरीही तो कसा रंगत जातो याची उत्सुकता आहेच. त्याचे प्रयोगमूल्य वेगळे आणि म्हणूनच निकाल तोच असला, तरीही त्याचं नावीन्य असणारच आहे.
 
 
 
ते नावीन्य काय? त्याचा मात्र नीट अंदाज लावता येतो. युती होणार की नाही, यावर चर्चा रंगली. राजकारण हा मनोरंजनाचाही एक महत्त्वाचा भाग आहे. मराठी माणसाला तर राजकारणात रस आहेच. त्यामुळे या असल्या गप्पांना रंगत आणणार्‍या रंजन करणार्‍या चर्चा रंगविल्याच जात असतात. केंद्रात ‘अबकी बार तीनसौ पार’ असा नारा दिला होता आणि तो सार्थ करून दाखविला. स्वबळावर दुसर्‍यांदा सत्ता आल्यावरही रालोआतील मित्रपक्षांना सत्तेत त्यांचा वाटा देण्यात आला. त्यावरूनच भाजपाची मित्रपक्षांच्या संदर्भातील प्रामाणिक भावना लक्षात यायला हवी होती. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेच्या वेळी असलेली भाजपा-शिवसेनेची युती यावेळीही कायम राहणार, यावर शंका घेण्याचे काहीच कारण नव्हते. प्रत्यक्ष पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीच ती घोषित केली होती. तरीही युती तुटेलच, अशा बाता मारल्या जात होत्या. आता सगळेच चित्र स्पष्ट झाले आहे. युती झालेली आहे. भाजपा 150 जागा, शिवसेनेला 124 जागा आणि इतर मित्रपक्षांना 14 जागा देण्यात आल्या आहेत. त्यात नाराजीचा िंकचितही सूर लागलेला नाही. शिवसेनेकडूनही तो लागलेला नाही, याची खंत कुठेतरी फट शोधणार्‍या विरोधकांनाच जास्त आहे. शिवसेनेने पार नांगी टाकली, असे उसासे टीकाकारच टाकत आहेत. युतीचे शिल्पकार असलेले उद्धव ठाकरे आणि फडणवीस सारखे सांगत आहेत की, आमचे ठरले आहे! आता याचा अर्थ तर समजून घ्यायला हवा ना. जे काय ठरले आहे ते सार्वजनिक करण्याचे काही कारण नाही. जे ठरले आहे त्यानुसारच सारे होते आहे. राज्यातही ‘अबकी बार 220 पार’ असा नारा देण्यात आला आहे. तो खराच ठरेल, याची दाट शक्यता आहे. कदाचित त्याच्याही पलीकडे हा आकडा जाण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा टप्पा आता पार पडला आहे आणि राज्यात साधारण काय लढती रंगतील, हे स्पष्ट झालेले आहे. कुठे विरोधी पक्षांना संधी आहे, हेही कळते आहे. एकतर जिथे विरोधी पक्षांना संधी होती तिथे आता िंखडारच पडले आहे. तिथले नाराज सरदार सगळेच भाजपा िंकवा शिवसेनेच्या गोटात आपला दाणागोटा घेऊन या लढतीच्या आधीच सादर झालेले आहेत. त्यांचे नीट स्वागत करून त्यांच्यातल्याही योग्य लोकांना अचूक ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना हा प्रमुख मित्रपक्ष सोडला, तर बाकी मित्रपक्षांचे उमेदवार भाजपाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार आहेत. भाजपा ज्या 150 जागा लढत आहे त्यात अगदी सामान्य स्थितीत 90 टक्क्यांच्या आसपास यश मिळेल, हा यंत्रणांचा अंदाज आहे. मित्रपक्षांचे 14 उमेदवार कमळ या चिन्हावरच लढत आहेत. त्यांचीही गणती केली, तर 145 च्या वर जागा भाजपाच्याच येतील, असे आता जाणकारांचेच मत आहे. कुणाची काहीही इच्छा असली, तरीही अंदाजांचे आजचे वास्तव नेमके हेच आहे. त्यामुळे भाजपाची राज्यातही स्वबळावर सत्ता येण्याच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे. विद्यमान स्थितीचे नेपथ्यही तसेच लागले आहे. हे बच्चनजींच्या काव्यओळींनुसार सांजेचे स्वप्न नाही, या प्रकारचे यश मिळविण्यासाठी ‘अपने आप पर’ कमालीचा अधिकार मिळवावा लागतो, तेव्हा मग एकुणातच स्थिती तुमच्या हातात असते. तशी ती आता भाजपाच्या हातात आहे. त्यावर नेतृत्वाचे पूर्ण नियंत्रण आहे. म्हणूनच निवडणुकीचा रंगमंच अत्यंत खुबीने आधीच बदलण्यात आला आहे. भाजपा राज्यातही स्वबळावर सत्तेत येईल, असे स्पष्ट संकेत आहेत. ठाकरे घराण्यातील कुणीच आजवर निवडणूक लढविली नाही. यावेळी आदित्य ठाकरे पहिल्यांदाच मैदानात आहेत, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. तरीही निवडणुकीच्या आधीच युती करण्यात आली असल्याने ती पाळली जाईल. शिवसेना आणि मित्रपक्षांना सत्तेत योग्य तो सन्मानजनक वाटाही नक्कीच दिला जाईल. सत्तेवर नाममुद्रा भाजपाचीच असेल, त्यामुळे स्पष्ट दिशा आणि नेमक्या उद्देशाने यापुढच्या सरकारचीही वाटचाल असेल. थोडक्यात हा प्रयोग महायुती ‘सरकार-2’ कडे वाटचाल करणारच आहे...