मोसंबी, संत्रा चोरणारी टोळी गजाआड

    दिनांक :05-Oct-2019
पाच जणांना अटक, दोन फरार
गुन्हे शाखेची कारवाई
 
अमरावती,
शेतकर्‍यांची मोसंबी व संत्रा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार 5 ऑक्टोबर रोजी गजाआड केली असून पाच जणांना अटक केली आहे तर दोन फरार आहे. या टोळीकडून एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
पोलिस अधिक्षक डॉ. हरी बालाजी यांनी अमरावती ग्रामीण हद्दीत वाढत्या संत्रा चोरी, शेती साहित्य चोरी, जनावरे चोरीच्या घटनांना आळा बसविण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेला मार्गदर्शन करुन चोरट्यांना अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पोलिस स्टेशन मंगरुळ दस्तगीर हद्दीतील ग्राम पिंपळखुटा येथे मोठ्या प्रमाणात मोसंबी चोरी घडली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरची मोसंबी चोरीची घटना ही लालखडी, अमरावती येथील अ. गफुर अ. कादर व त्याच्या साथीदारांनी केल्याचे समजले.
 
 
 
गोपनीय माहितीवरून अ. गफुर याला ताब्यात घेवून उपरोक्त घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने पहिले उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक बारकाईने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच सदर गुन्हा करताना इरफान शहा (34), फारुक अली (40), सय्यद वकील (40), सय्यद नौशाद (29), गोपाल विठ्ठल चव्हाण, रहेमान शहा, सलीम शहा सर्व रा. अमरावती हे सोबत असल्याचे त्याने कबुल केले. सदर 1 ते 5 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन फरार आहे. सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा डी.आय. 207 लोडींग वाहन क्रमांक एमएच 04 ईएल 9740, किंमत 5 लाख 50 हजार जप्त करण्यात आले आहे. यापुर्वी अब्दुल गफुर, फारुक अली यांना दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले होते. सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सुनील किनगे यांच्या नेतृत्वात सपोनि नरेंद्र पेंदोरे, पोउपनि भारत लसंते. सपोउपनि मुलचंद भांबुरकर, पोहेकॉ सुनील तिडके, नापेाकॉ सचिन मिश्रा, संदीप लेकुरवाळे, अमित वानखडे, शकील चव्हाण, चेतन दुबे, युवराज मानमोठे, चालक सईद यांनी केली आहे.