गोष्ट तशी छोटीच, पण...!

    दिनांक :05-Oct-2019
चौफेर
सुनील कुहीकर 
 
गोष्ट तशी छोटीच आहे. राजकारणात तर ती शोभूनही दिसणारी आहे. गेल्या काही वर्षांतल्या इथल्या राजकीय वाटचालीत, ती बाब आक्षेपार्ह तर अजीबात राहिलेली नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाहीव्यवस्था असलेल्या या देशातील जनतेने ज्या सफाईदारपणे घराणेशाही मान्य केली आणि स्वीकारलीदेखील आहे, ते बघता या घटनेकडे अगदीच दुर्लक्ष करायला हवे, इतकी क्षुल्लक म्हणावी अशी घटना आहे ती. मुद्दा आहे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांनी त्या मतदारसंघासाठी जाहीर केलेली एका कार्यकर्त्याची उमेदवारी मागे घेऊन स्वत:च्या नातवाचे नाव पुढे करण्याचा...
 
 
 
 
शेतकरी कामगार पक्ष हा, गोरगरिबांचा, शेतकरी-शेतमजुरांचा आवाज बुलंद करणारा पक्ष. निदान त्याचा दावा तरी तसाच आहे. कम्युनिस्ट विचारांची बैठक त्याला विशेषत्वाने लाभलेली. गेली कित्येक वर्षे, काही मोजकी अन्‌ ठरावीक नावं त्या पक्षाचे प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधिमंडळात करताहेत. गणपतराव देशमुख हे तर या पक्षाचं एक ऋषितुल्य नेतृत्व. 1962 पासूनची सांगोल्यातली प्रत्येक निवडणूक त्यांनी लढवली. 1972 आणि 1995चा अपवाद वगळला, तर एकूण बारा निवडणुकीतील विजयाने त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा वारसा सुशोभित झाला आहे. तब्बल 55 वर्षांपासून सांगोल्याचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी राखलेली परंपरा, जपलेला साधेपणा अलीकडच्या काळातील राजकारणाला न शोभणारा. पण, गणपतरावांनी स्वत:च्या आचरणातून हे वेगळेपण साधले, साकारले अन्‌ त्याची जपणूक करत स्वत:चे आगळेपण सिद्धही केले. आमदारकी पदरी पडताच सारी भौतिक सुखं चरणी लोळण घेत असल्याची स्वप्नं बघण्याच्या या काळात लोकांनी एसटीतून फिरणारा आमदार पाहिला. लोकांच्या प्रश्नांसाठी तळमळीनं रस्त्यावर उतरणारा लोकप्रतिनिधी पाहिला. त्या प्रश्नांची उकल करणारा, त्याच्या सोडवणुकीसाठी तळमळीनं झटणारा माणूस पाहिला. जो पक्ष आजच काय, पुढील कित्येक वर्षे सत्तेत येण्याची शक्यता नाही, अशा पक्षासाठी काम करणारा, त्याच्या बांधणीसाठी राबणारा अन्‌ संघर्षातून यश प्राप्त करणारा कार्यकर्ता गणपतरावांच्या रूपात या महाराष्ट्राने पाहिला. खरंतर, डाव्यांचा विचार हा काही भारतीय भूमीत सहज, सर्वसामान्य माणसांच्या मनात रुजणारा विचार नाही. व्यक्तिपरत्वे तो काही विशिष्ट भागात, काही विशिष्ट लोकांचा व्यक्तिगत प्रभाव, कार्य, संघर्ष, जिद्द आणि मेहनतीतून रुजत गेला एवढंच. सांगोल्यातील शेकापचे कार्य अन्‌ देशमुखांना आजवर मिळालेले निवडणुकीच्या राजकारणातले यश, यात िंसहाचा वाटा गणपतरावांच्या साध्या राहणीचा, त्यांच्यातल्या समर्पित कार्यकर्त्याचा आहे. अन्यथा, कायम विरोधी पक्षात राहून यशस्वितेचे सातत्य राखणे जरासे जिकिरीचेच काम. पण, गणपतरावांनी ते लीलया साधले. सरळ सरळ किंवा आडमार्गाने सत्तेतील भागीदार होण्याच्या संधी त्यांनी जाणतेपणाने गमावल्यात. पण, यंदाच्या निवडणुकीत सांगोल्यातली उमेदवारी पक्षाच्या वतीने स्वत:च्या नातवाच्या पदरात टाकताना मात्र, ती निर्मोही भूमिका त्यांना बजावता आलेली दिसत नाही. इतकी वर्षे ज्या त्याग, बलिदान, संघर्षाची कहाणी स्वत:च्या आचरणातून अजरामर केली, ती गणपतरावांना वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षी शाबूत राखता येऊ नये, ही राजकीय हाराकिरी मानायची की, विचारांची बैठक सर्वोपरी मानणार्‍या एका राजकीय पक्षाने कालौघात स्वीकारलेल्या व्यावहारिक बदलांचा तो सहज परिपाक समजायचा?
 
 
 
खरंतर, 1978 अन्‌ 1999चा अल्पकाळाचा अपवाद वगळला, तर शेतकरी कामगार पक्ष कधीच सत्तेत राहिला नाही. त्या पक्षाचे विधिमंडळातील संख्याबळही, बोटांवर मोजता येईल यापलीकडे कधी गेले नाही. परिणामी, तीच ती माणसं त्या पक्षाचा झेंडा सर्वदूर मिरवत राहिली. तब्बल पंचावन्न वर्षे एकच व्यक्ती एका मतदारसंघातून पक्षातर्फे लढत राहिली, याचा वृथा अभिमान बाळगायचा, की त्यांच्यापलीकडे दुसरी कुणी सक्षम व्यक्ती तेथे तयारच होऊ शकली नाही, याचे शल्य बाळगायचे, हे त्या पक्षाने ठरवायचे आहे. पण, वयाच्या शंभरीतही पक्षाची सत्ता आपल्या कुटुंबाच्या बाहेर जाऊ नये याची दक्षता घेण्याची, त्यासाठी अन्य कुणाला देऊ केलेली उमेदवारी मागे फिरवून स्वत:च्या नातवासाठी ती राखून ठेवण्याची परिपाठी आताशा राजकारणाला नवखी नसली, तरी डाव्या विचारांचा आलेख चढत्या क्रमाने मांडण्याचा दावा करणार्‍या धुरीणांना मात्र न शोभणारी आहे. सत्तेच्या ज्या ‘कॉंग्रेसी तर्‍हे’ची ते सातत्याने चिरफाड करीत आलेत, सत्तेला चिकटून राहण्याची जी पद्धत भावली नसल्याचे वेळोवेळी त्यांनी स्पष्ट केले, नेमकी तीच तर्‍हा गणपतरावांना शेकापमध्ये अनुसरावीशी वाटावी, कार्यकर्त्यांना डावलून नातेवाईकांना पुढे करण्याची दुर्दम्य इच्छा, दस्तुरखुद्द गणपतरावांच्या मनात जागावी, यासारखे दुर्दैव दुसरे असू शकत नाही!
 
 
 
कालपर्यंत ज्या पक्षाशी सातत्याने लढा दिला, ज्या कॉंग्रेसी धनशक्तीविरुद्ध शेकापची निर्धनता निकराने संघर्ष करीत राहिली, तिथे पक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या चरणी लोटांगण घालू लागतो, ही केवळ काळाची महिमा कशी असू शकेल? पण, उभ्या हयातीत सातत्याने ज्यांच्याविरुद्ध संघर्ष केला त्या कॉंग्रेससोबत आघाडी करून लढण्याची अन्‌ कम्युनिझमचा डावा विचार मातीत गाडण्याची किमया शेकापला सहज साध्य झाली, यात आश्चर्य शोधण्याची गरज राजकारणात एव्हाना उरलेली नाही. इतकी वर्षे आमदार राहिलेल्या गणपतरावांना स्वत:च्या कुटुंबापलीकडे पक्ष शोधता येऊ नये, यातही खरं म्हणजे आश्चर्य वाटून घेण्याची परिस्थिती राहिलेली नाही आताशा. स्वत:ला उमेदवारी मिळाली नाही म्हटल्यावर चाललेला कार्यकर्ता नामक घटकाचा थयथयाट सर्वदूर परिचयाचा ठरतो आहे. वर्षानुवर्षे आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदं उपभोगणारी माणसं, पाचव्या-सहाव्यांदा तिकीट नाकारलं गेलं तर लागलीच, ‘हेचि फळ काय मम तपाला,’ असा सवाल उपस्थित करून स्वत:वरील कथित अन्यायाचा पाढा वाचणे सुरू करतात, हे चित्रही नवलाईचे राहिलेले नाही इथे. पण, शेकाप हा तर विचारांची कास धरणारा राजकीय पक्ष. सत्तेच्या अपेक्षेविना सामान्य माणसाच्या हक्काचा लढा लढणारा. नेतृत्व कुणाचे, हा प्रश्न अलहिदा, असे म्हणत विचार महत्त्वाचे मानणारा. पण, गत कालखंडात घडून आलेले वैचारिक परिवर्तन इतके चमत्कारिक की, आता या पक्षाचे नेतृत्वही घराणेशाहीची महती गाऊ लागले आहे.
 
 
 
लोकशाहीची गाथा गौरवाने गाणार्‍या या देशात वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीकडे सत्ता केंद्रित राहण्याची आणि त्यात कुणालाही काहीही आक्षेपार्ह वाटू नये, ही परंपरा नेहरू-गांधी घराण्याने कधीचीच निर्माण करून ठेवली आहे. इतरही कित्येक राजकीय घराण्यात त्याची जपणूक झाली आहे. सत्तेचे केंद्र परंपरेने बापाकडून मुलाकडे, मग मुलाकडून नातवांकडे प्रवाहित होण्याची परंपराही त्याच घराण्याने प्रस्थापित करून ठेवलीय्‌. त्याचेही अनुकरण देशभरात काही कुटुंबांनी बिनदिक्कतपणे केले आहे. पण, त्यांनी निदान कधी मार्क्सवादी विचारांच्या पोथ्या वाचल्या नाहीत की, सामान्य माणसाच्या, शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या घामाची गाथा गायिली नाही. पण, शेतकरी कामगार पक्षाने तर हयातभर तेच केले. त्यांनी तर कायम, सामान्य माणसाच्या हिताची भाषा वापरली. त्यासाठीच तो पक्ष संघर्षरत असल्याचे जगजाहीर केले. त्या बळावरच निवडणुकी लढवल्या. िंजकल्या- हरल्या. राजकारण सत्तेसाठी करीत नसल्याची हाळीही त्यांचीच. कॉंग्रेसने प्रस्थापित केलेल्या घराणेशाहीला कडाडून विरोध केला. राजकारणातील निषिद्ध बाबींना तिलांजली देण्यासाठी सर्वथा सज्ज मानले स्वत:ला. मग आता, वयाच्या 95व्या वर्षी स्वत:ला निवडणुकीच्या राजकारणापासून बाजूला सारताना गणपतरावांना नातू का आठवला? पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला जाहीर झालेली उमेदवारी नातवासाठी मागे घेण्याचा प्रकार कुणी समर्थनीय ठरवला?
 
 
सत्ता भल्याभल्यांना भुरळ घालते म्हणतात! पण, समाजकारणासाठी म्हणून राजकारण करणार्‍या, जनहितासाठी राजकीय हयात पणाला लावणार्‍या, विचारांसाठी राजकारण करणार्‍या शेकापला, घराणेशाहीची राजकीय परंपरा मोडीत काढता येऊ नये, ही दुर्दैवी शोकांतिका आहे...
 
9881717833