ड्रोनच्या मदतीने दहशतवाद!

    दिनांक :06-Oct-2019
ब्रिगेडियर हेमंत महाजन
9096701253
 
पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने ड्रोनच्या मदतीने एके-47 रायफल, स्फोटके, अमली पदार्थ आणि बनावट नोटा भारतामध्ये पाठवले आहेत. या सर्वांचे वजन 80 किलो होते. ड्रोनचा वापर अनेकवेळा करण्यात आला आहे. ड्रोन म्हणजे नेमके काय, तर एक छोटे विमान, जे विनापायलट रिमोटच्या मदतीने उडवता येते. ड्रोनची रेंज त्याच्या आकारावर, त्यातील तंत्रज्ञानावर अवलंबून असते. परंतु सध्या जे ड्रोन आपल्याकडे आहेत ते चार ते पाच किलो वजनापासून ते 20 -25 किलो वजन घेऊन 100 ते 200 किलोमीटर दूरपर्यंत जाऊ शकते. मात्र प्रश्न असा पडतो, की- हे ड्रोन पाकिस्तानच्या बाजूने आले. त्यांना आपल्या रडारने पाहिले की नाही? या प्रश्नाचे उत्तर सरळ सोपे आहे, की आपल्याकडील निरीक्षण रडार ही महत्त्वाच्या ठिकाणी लावलेली असतात, ती सुद्धा युद्धजन्य परिस्थितीत काम करत असतात. संपूर्ण साडेचार हजार पाकिस्तानी सीमेवरती िंकवा सात हजार सहाशे किलोमीटर या समुद्र सीमेवर अशा प्रकारचे लक्ष ठेवणारी सिस्टिम आपल्याकडे नाही. कारण सिस्टिम अतिशय महागडी असते. म्हणजेच पाकिस्तानने आपल्या विरुद्ध कमी पैसे लागणार्‍या तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन प्रकारचा दहशतवाद सुरू केला आहे.
 
 
 
ड्रोन सीमेवरून घुसल्याने
ड्रोन अतिशय स्वस्त असतात. ड्रोनचे तंत्रज्ञान आणि त्यांची निर्मिती ही त्या मानाने अतिशय सोपे आहे. म्हणून जर ड्रोनच्या मदतीने सीमावर्ती भागात शस्त्र िंकवा स्फोटक पदार्थ िंकवा अमली पदार्थ पाठवायचे असतील तर आपले रक्षण कसे करायचे? लक्षात ठेवावे की आपली रडार सातत्याने सुरू ठेवणे खर्चिक असते. त्याशिवाय सध्या पूर्ण सागरी सीमेवर आणि भूसीमेवर अशा प्रकारचे रडार कव्हरेज उपलब्ध नाही. म्हणूनच आपणच संपूर्ण सीमेवर रडार कव्हरेज घ्यायचे म्हटले तर ते खूप महाग ठरू शकते. म्हणजे काही ड्रोन्स सीमेवरून घुसल्याने आपण हजारो कोटी रुपये खर्च करून रडार कव्हरेज देण्याचा विचार करणे अव्यवहार्य आहे. म्हणून कमी किमतीने आपले रक्षण कसे करता येईल, यावर अधिक लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे.
सर्वात अत्याधुनिक हवाई हल्ला रक्षण व्यवस्था ड्रोन्स थांबवू शकले नाही
 
 
ही घटना दुसर्‍या एका घटनेच्या आधारानेही पाहिली पाहिजे.14 सप्टेंबर रोजी 18 ड्रोन आणि 7 क्रूझ क्षेपणास्त्र यांनी सौदी अरेबियाचा अरामकोमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला. त्यामुळे सौदी अरेबियाचे 50 टक्के तेलाचे उत्पादन बंद पडले. त्यामुळे तेलाच्या जागतिक भावामध्ये 20 टक्के भाववाढ झाली. सौदी अरेबियाचे डिफेन्स बजेट हे 67. 6 अब्ज डॉलर एवढे आहे. सौदी अरेबियामध्ये जो ड्रोन हल्ला झाला होता तो इराणी सैनिकांनी केला की हाउदी नावाच्या दहशतवाद्यांच्या मदतीने केला गेला हे महत्त्वाचे नाही. इराणची लष्करी ताकद ही सौदी अरेबियाच्या तुलनेत कमजोर समजली जाते. हाऊदी हा दहशतवादी गट आहे.
 
 
मात्र प्रचंड लष्करी बजेट, अत्याधुनिक शस्त्रे आणि अत्यंत महागडे हवाई दल, हवाई संरक्षण व्यवस्था सौदी अरेबियाकडे आहे. जगातील सर्वात अत्याधुनिक हवाई हल्ल्यापासून रक्षण करणारी व्यवस्था त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे असलेली शस्त्रे ही अमेरिकेने दिलेली सर्वांत अधुनिक शस्त्रे आहे. एवढेच नव्हे, तर सौदी अरेबियाच्या सैन्याचे प्रमुख म्हणून पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ काम करतात. ते खूप अनुभवी आहेत. परंतु एवढी महागडी, अत्याधुनिक शस्त्रे सुद्धा अतिशय स्वस्त दरात तयार होणार्‍या ड्रोन्स थांबवू शकले नाहीत. म्हणून आता अशा प्रकारचे हल्ले कसे थांबवायचे, हे आव्हान सर्वांसमोर आहे. ड्रोन्स कमी उंचीवरून उडतात. ते कोणत्याही दिशेने येऊ शकतात, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एअर डिफेन्स सिस्टिम लावणे सोपे नाही.
 
 
सर्वांचे रक्षण करणे अतिशय महागडे...
आज आपल्या देशामध्ये अनेक मोठी शहरे आहेत, त्यात विविध महत्त्वाच्या संस्था म्हणजे तेल कारखाने, न्यूक्लिअर रिअॅक्टर वगैरे आहेत. या सर्वांचे ड्रोनपासून रक्षण कसे करायचे, हा प्रश्न उभा राहातो. कारण या सर्वांचे रक्षण करणे इतके महागडे ठरते, की- अशा प्रकारचे रक्षण करणे जवळपास अशक्य आहे. आपण एस -400 नावाची अत्याधुनिक हवाई संरक्षण व्यवस्था रशियाकडून विकत घेत आहोत. परंतु ती केवळ एखाद्या मोठ्या शहराचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे, परंतु ती देशाच्या सर्व जमिनी सीमा किंवा सागरी सीमा यांचे रक्षण कधीही करू शकत नाही.
 
 
म्हणूनच प्रश्न आहे, की- स्वस्त ड्रोनपासून आपले रक्षण कसे करायचे. ज्या प्रकारे ड्रोन आणि स्टेल्थ तंत्रज्ञान पसरत आहे, त्यापुढे अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम त्यांना थांबवण्यात फारशी सक्षम नाहीत. अमेरिकेने बनवलेले पॅट्रिऑट क्षेपणास्त्राची िंकमत 2.4 बिलियन डॉलर आहे. एवढ्या महागड्या सिस्टिम असूनही इराणने छोट्या ड्रोनच्या मदतीने केलेले हल्ले त्यांना थांबवता आले नाहीत.
 
 
प्रचंड महागडी विमाने, महागड्या एअर क्राफ्ट कॅरिअर्स िंकवा मोठी जहाजे स्वस्त शस्त्रांपासून (ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्र) आपले रक्षण करू शकतात का?
 
 
ड्रोन्सचा उडती आयडी म्हणून वापर
या ड्रोन्सवर स्फोटके घालून त्यांचा इम्प्रोव्हाईज एक्स्प्लोजिव्ह डिव्हाईस म्हणजे आयडी म्हणून सुद्धा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये असलेले स्फोटक पदार्थ हे त्या त्या भागात असलेल्या साधनांच्या माध्यमातून तयार केली जाऊ शकतात. आयर्लंडमध्ये अशा प्रकारचे स्फोटक पदार्थ हवेतून ब्रिटिश सैन्याविरूद्ध वापरली गेल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत. एवढेच नव्हे, तर अशाच प्रकारच्या आयईडीज इराक आणि अफगाणिस्तानात हवेतून अमेरिकन सैन्याविरुद्ध थोड्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. अमेरिकेकडे असलेली चिलखती वाहने अशा हल्ल्याविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम नाहीत. याचाच अर्थ असा की- स्वस्त किमतीतील ड्रोन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने लहान देश िंकवा दहशतवादी एका मोठ्या देशाविरूद्ध हल्ला करून त्यांचे नुकसान करू शकतात.
 
 
खलिस्तानी दहशतवाद्यांना ड्रोन्समधून शस्त्रपुरवठा झाल्याने, हे थांबवा असा ओरडा आरडा सुरू आहे. ड्रोनपासून रक्षण करणे हे तितकेसे सोपे नाही, हे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. भारतीय सैन्याच्या पायदळाच्या बटालियन लढाईमध्ये शत्रूंच्या विमानाविरोधात स्वसंरक्षण कऱण्यासाठी त्यांच्याजवळ असलेली शस्त्रे म्हणजे स्मॉल आर्म्स, लाईट मशीनगन यांचा वापर करून स्वतःचे रक्षण करतात. अशाच प्रकारची संकल्पना सीमा संरक्षणासाठी आपल्याला वापरावी लागेल. म्हणजे सीमेवरती असलेले सीमा सुरक्षा दल िंकवा सैन्याने अशा प्रकारची वाहाने हवेतून येताना दिसली तर त्यांच्यावर फायर करून त्यांना तिथेच पाडण्याची योजना राबवू शकतील.
 
 
सागरी सीमांच्या सुरक्षेचे काय?
सागरी सीमांवर प्रचंड लांबलचक समुद्रकिनार्‍यावर कुठलीही संरक्षण व्यवस्था उपलब्ध नाही. त्यासाठी काय करावे लागेल? स्वसंरक्षणाची िंकमत प्रचंड असेल तर काही न करणे ही सुद्धा एक उपाययोजना असू शकते. मात्र येत्या काळात ड्रोनच्या विरूद्ध रक्षण करण्यासाठी कमी िंकमतीची एअर डिफेन्स सिस्टिम तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. परंतु त्या संशोधनाला वेळ लागेल.
 
 
पाकिस्तानला स्वसंरक्षण करण्यास भाग पाडा
याशिवाय आपल्याला पाकिस्तानला इशारा द्यावा लागेल, की अशा प्रकारचे ड्रोन भारतात पाठवण्याचा प्रकार केला तर आम्हीही ड्रोन पाठवून तुमचे नुकसान करू शकतो. स्वसंरक्षण कऱणे अत्यंत खर्चिक आहे. त्यापेक्षा अशा कडू औषधाची चव पाकिस्तानला देऊन स्वसंरक्षण कऱण्यास भाग पाडले पाहिजे. याशिवाय आपल्या देशात तयारी होणारे ड्रोन्स आणि त्यांचे महत्त्वाच्या आस्थापनांजवळ उड्डाण करणे यावरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कमी खर्चात दहशतवादी हल्ले भारतावर करून पाकिस्तान आपल्या देशाची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त कऱण्याचे प्रयत्न करत आहेत. म्हणून ड्रोनविरुद्धची लढाई आता आपल्याला पाकिस्तानच्या आत न्यावी लागेल. त्यामुळे भारताने स्वतःचे रक्षण ड्रोन हल्ल्याविरुद्ध कऱण्याऐवजी भारताकडून होणार्‍या ड्रोन हल्ल्यापासून पाकिस्तानला संरक्षण करण्यास भाग पाडावे, तरच त्यांना याची िंकमत कळू शकते. आक्रमक कारवाया आणि कमी खर्चीक उपाययोजना आणि अतिशय कल्पकतेने ड्रोन दहशतवादाविरोधात भारताला वापरावे लागेल.
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
••