क्रीडा क्षेत्रातील स्त्रीशक्ती

    दिनांक :06-Oct-2019
मिलिंद महाजन
 
मातृत्व लाभल्यानंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन करणार्‍या सेरेना विल्यम्सचा आदर्श सानिया मिर्झासह आता चारवेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणार्‍या बेल्जियमच्या किम क्लिस्टर्सने डोळ्यासमोर ठेवला आहे. निवृत्तीनंतर तब्बल सात वर्षांनी वयाच्या 36 व्या वर्षी क्लिस्टर्स पुन्हा टेनिस कोर्टवर परत येऊ इच्छित आहे, नव्हे तशी तिने घोषणाच केली आहे. सानिया मिर्झाही नववर्षात व्यावासायिक टेनिस कोर्टवर परत पाऊल ठेवणार आहे. यावरूनच क्रीडा क्षेत्रातील स्त्रीशक्ती व सामर्थ्य लक्षात येते. अशा स्त्रीशक्तीला सलाम. 
 
 
आपल्या 14 वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीत क्लिस्टर्सने 41 एकेरीचे विजेेपद पटकावले. शिवाय ती 2003 मध्ये प्रथम विश्वमानांकनपदावरही आरूढ झाली होती. आता क्लिस्टर्स तीन मुलांची माता आहे. 2012 साली अमेरिकन ओपनमध्ये ती अखेरची खेळली होती. पुनरागमन करण्याची क्लिस्टर्सची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी तिने पहिले ग्रॅण्ड स्लॅम जिंकल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2007 साली वयाच्या 23 व्या वर्षी तिने निवृत्ती जाहीर केली होती. दोन वर्षांनी म्हणजे 2009 मध्ये अमेरिकन ओपनच्या निमित्ताने पुन्हा पुनरागमन केले.
 
 
टेनिस खेळणार्‍या माता खेळाडू सेरेना विल्यम्स व व्हिक्टोरिया अझारेंका यांच्या प्रेरणेने मी पुनरागमन करीत आहे. माझी स्पर्धा माझ्याशीच राहील. आज मी 36 वर्षांची आहे. मी आधीसारखी खेळण्याइतकी सक्षम नाही, पुनरागमन माझ्यासाठी आव्हान आहे, असे क्लिस्टर्स म्हणाली.
 
 
मातृत्व लाभल्यानंतर दोन वर्षांनी 32 वर्षीय सानिया मिर्झाने जानेवारी 2020 मध्ये पुनरागमन करणार असल्याची घोषणा केली असून त्यादृष्टीने तिची तयारी सुरु झाली आहे. मातृत्व लाभल्यानंतर तिने 4 महिन्यात आपले 26 किलो वजनही घटविले आहे. जिम्नॅशियममध्ये ती तासन्‌ तास मेहनत करीत आहे. ती दररोज चार तास ट्रेिंनग घेते. इझान हे सानिया व पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या सुपुत्राचे नाव आहे.
 
 
काहीही सिद्ध करून दाखविण्यासाठी मी पुनरागमन करीत नाही. मात्र आपल्या दुसर्‍या इिंनगमध्ये जे काही यश मिळेल,ते माझ्यासाठी ‘बोनस’ राहील, असे सानिया म्हणाली.
 
 
मातृत्व लाभल्यानंतर फारशा टेनिस खेळाडूंनी यशाची चव चाखली नाही. केवळ मार्गारेट कोर्ट, इव्होनी गुलागॉंग व किम क्लिस्टर्स यांनी मातृत्व लाभल्यानंतर मोठ्या स्पर्धेतील एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. सेरेना अजूनही 24 वे ग्रॅण्ड स्लॅम जिंकण्यासाठी धडपडत आहे.
 
  
जर्मनीची टेनिसपटू तातयाना मारिया हीसुद्धा आई झालेली खेळाडू असून तिला 100 वे मानांकन आहे. गतवर्षी तातयानाने ब्रिटनच्या हिथर वॉटसनच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. सेरेना, तातियाना, व्हिक्टोरिया यांच्यासारख्या खेळाडूंची प्रेरणा मला पुनरागमनासाठी प्रोत्साहित करत आहे, असेही ती म्हणाली.
 
  
आता सानिया आणि किम क्लिस्टर्स पुनरागमनानंतर किती विजेतेपद पटकावतात, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार असले तरी त्यांनी पुनरागमनासाठी केलेले धाडस, साहस कौतुकास्पद आहे.