लोकमान्य, संतमान्य, देवमान्य...

    दिनांक :06-Oct-2019
आनंद देव
9422465567
 
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे उभं राहून परिस्थितीवर मात करून देशाचा नावलौकिक वाढविणार्‍या थोर पुरुषांची संख्या आपल्या देशाच्या इतिहासात खूप मोठी आहे. रामायण, महाभारतकाळापासून विचार केला, तर अशा महान व्यक्तींची यादी कोणी बनवूच शकणार नाही. एवढंच काय, नुसतं स्वतंत्रतापूर्व आणि स्वतंत्रताप्राप्तीनंतरच्या काळातील थोर पुरुषांची यादी तयार करता येणंदेखील अत्यंत कठीण आहे. त्यामुळे यादीचा विचार थोडा दूर ठेवू या. त्या सर्वांनी त्या त्या काळानुरूप आपल्या लढाया लढून, वैचारिक क्रांती करून, प्रखर संघर्ष करून आपली नावं इतिहासात अजरामर करून ठेवली आहेत. आपल्या देशाच्या उज्ज्वल संस्कृतीमुळे आणि अशा सार्‍या पुरुष- स्त्रियांच्या योगदानामुळे आपला देश आजवर केवळ टिकूनच राहिलेला नाही, तर प्रगतीही करत आलेला आहे, यात शंका नाही. 
 
 
यात अनेक व्यक्ती अशा आढळतील, ज्या लोकमान्य होत्या. अनेक व्यक्ती अशा आढळून येतील ज्या लोकमान्य आणि सोबत संतमान्यही होत्या. या मालिकेतील तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे देवमान्यता. पण, या तिन्ही मान्यताप्राप्त असलेल्यांच्या नावांचा विचार केला, तर तशी नावं मात्र फारच थोडी निघतील. अगदी अवतारांपासून विचार केला, तर संघर्ष अशा सार्‍यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होता आणि त्यांनी तो पूर्णत्वास नेला, त्यामुळे त्यांची नावं इतिहासात अजरामरही झालीत.
 
 
हे सारे त्यांच्या कार्यात सफल झाले, पण बहुतेक असं दिसून येतं, की त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे म्हणा िंकवा सामाजिक कार्य हेच अंतिम ध्येय मानल्यामुळे आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं असलेलं ईश्वरस्मरण हे अनेकांना जमलेलं नाही, तर अनेकांनी तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. हा ट्रेंड प्रत्यक्ष भगवंताला ठाऊक नसेल तरच नवल! त्यामुळे अर्जुनाचं सारं आयुष्य संघर्षमय असलं, तरी युद्ध करताना (परिस्थितीशी दोन हात करत असताना) ते ‘माझ्या स्मरणात’ कर, हा मोलाचा संदेश त्यानं भगवद्गीतेत दिला. ही एक साधना असून देवमान्यता प्राप्त करण्यासाठी तिच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे ज्यांना जमतं त्यांचं नाव इतिहासात केवळ अजरामर होत नाही, तर ते त्यांचं कार्य इतिहासातील एक सोनेरी पर्व ठरतं आणि जगाला त्यांचं कधीच विस्मरण होत नाही. हे कुठल्या धर्मविशेषापुरतं मर्यादितही नाही. सार्‍या ब्रह्मांडाला नियंत्रित करणारी एक शक्ती अस्तित्वात आहे आणि आपण जी काही चांगली, वाईट कामं करत असतो, त्याची नोंद ही शक्ती करत असते, एवढं भान राहिलं तरी देवमान्यतेसाठी ते पुरे आहे. ज्यांच्या ठायी ही समज पूर्णार्थाने नसते अशा व्यक्ती लौकिकार्थाने कितीही मोठ्या दिसत असल्या तरी त्या खर्‍या तशा नसतात.
 
 
या सार्‍या पार्श्वभूमीचं कारण हे, की अनेक वर्षांनंतर स्वतंत्र भारताच्या (इतिहासात नव्हे तर) वर्तमानात अशी एक व्यक्ती आपल्या देशात विद्यमान आहे ती नरेंद्र मोदींच्या रूपात. देशभक्तांसाठी हा गौरवाचा विषय आहे, तर इतरांसाठी हा अत्यंत िंचतेचा विषय होऊन बसलेला आहे. अशा व्यक्तींचं क्वालिफिकेशन कधी बघितलं जात नसतं, कारण त्याला काही अर्थ नसतो. आज बघा, एकीकडे प्रचंड क्वालिफिकेशन प्राप्त केलेले ‘मोठे’ (करण्यात आलेले) लोक देशाच्या दृष्टीने एकतर दुर्लक्षित झालेले आहेत िंकवा तुरुंगात आहेत. काहींना आपलं मोठेपण सिद्ध करण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागतोय. दुसरीकडे मोदींना त्यांचं क्वालिफिकेशन विचारण्याची िंहमत केलेले तथाकथित उच्च शिक्षित लोक हे त्यांच्या देखतच काळाने तुच्छ ठरवले. ज्यांनी ज्यांनी त्यांच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला ते केवळ असफल नाही झाले, तर अक्षरशः छिन्नविच्छिन्न होऊन गेले आणि ज्यांनी मोदींचं म्हणणं ऐकलं ते प्रसिद्धीची अनेक शिखरे पादाक्रांत करू शकले. मोदी हे कुठल्या ऑक्सफोर्डचे विद्यार्थी वगैरे असते, तर त्यांना झालेल्या (आणि होत असलेल्या) विरोधामुळे त्यांनी केव्हाच राजकारण सोडून दिलं असतं. पण, भारताच्या सुदैवाने त्यांचं क्वालिफिकेशन ‘अध्यात्म’ असल्याने ते देशातल्याच नव्हे, तर जगातल्या ऑक्सफोर्ड, केंब्रिजवाल्यांना आणि काही नाठाळ देशांनाही पुरून उरले आहेत.
 
 
मोदींना केदारनाथच्या गुहेत ध्यान करताना पाहून ज्यांनी त्यांची खिल्ली उडवली ते लोक अत्यंत क्षुद्र आहेत. कारण अशांचं ध्यान केवळ स्वार्थ, संस्कृतिद्रोह आणि देशद्रोह हेच आहे. ज्यांच्या जीवनात कोणतेही आदर्श नाहीत, असतीलच तर ते देशाबाहेरील आहेत. कोणत्याही प्रकारची शिस्त नाही, स्वधर्माचं नेमकं ज्ञान नाही, देशाबद्दल कोणता अभिमान नाही, आपली सगळ्या जगात उज्ज्वल असलेली संस्कृती (जिच्यामुळे हा देश आजही टिकलेला आहे ती) ज्यांना सगळ्यात मागास वाटते अशा लोकांना भक्ती, साधना, समर्पण या गोष्टी कशा कळणार! असो!
 
 
लोकमान्यतेची पायरी ओलांडल्याशिवाय संतमान्यता मिळत नसते. मोठ्या हुद्यांवर असलेले अनेक लोक, अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक पक्षांचे नेते हे समाजासाठी काम करत असल्यामुळे स्वाभाविकपणे लोकमान्य असतात, पण अशा बहुतेकांमधे, त्यांना प्राप्त झालेल्या यशामुळे गर्व, भ्रष्टाचार, स्वैराचार यांचा प्रादुर्भाव होत असतो. यातले (सर्व नाही तर) काही अडथळे पार करण्यात जे यशस्वी होतात त्यातल्या काहींना संतमान्यता मिळून जाते, पण अशांनाही देवमान्यता मिळेलच असं नाही. याचं कारण, कार्यरत असताना होणारं ईश्वराचं विस्मरण. केवळ लौकिकार्थाने मंदिरात जाऊन देवदर्शन हा देवमान्यतेसाठीचा निकष नाही, तर नैतिकतेच्या निकषांवर खरे उतरणारे आणि जीवनात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ, स्वैराचार यांचा लवलेश नसणारेच देवमान्यतेसाठी पात्र ठरत असतात. अशा व्यक्तींच्या भोवती एक तेजोवलय असतं, ज्यामधे समोर असणार्‍या हजारो, लाखो लोकांना प्रभावित करण्याची क्षमता असते. एवढंच नव्हे, तर स्वतःच्या कार्यनिष्ठेमुळे त्यांच्या नकळत प्रभावित होणार्‍या लोकांची संख्या त्याहूनही शेकडो, हजारो पटींनी अधिक असते.
 
 
आज 2019 मधे या सार्‍या क्षमता नरेंद्र मोदींमधे विद्यमान असल्यामुळेच, देशांतर्गत आणि देशाबाहेरीलही विरोधक त्यांच्यापुढे निष्प्रभ होताना दिसत आहेत. यासाठी फक्त हुशारी कामाची नाही, तर त्यांच्याभोवतीचं वलय हे त्यासाठी कारणीभूत आहे. ते वलय त्यांना गिफ्टमधे कुठून मिळालेलं नाही, तर त्यांचे स्वतःचे अथक परिश्रम, सद्गुरूंची कृपा, अनेक वर्षांची प्रत्यक्ष साधना, हे त्यासाठी कारण आहेत आणि त्यामुळेच त्यांना देवमान्यता मिळालेली आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासाठी ‘देवमान्यता’ ही अत्यंत दुर्मिळ, दुरापास्त असते, पण मोदींनी ती अत्यंत चिकाटीने प्राप्त केलेली आहे. या बाबतीत नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी ही तंतोतंत खरी ठरली आहे.
 
 
मोदींना बघून सगळं जग स्तंभित आहे आणि त्यांचे विरोधक जगाच्या खिजगणतीतही नाहीत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न जे जे करतील त्यांना पुढे माफीच मागावी लागणार आहे, हे विधिलिखित आहे. अशा नतद्रष्टांना मोदींचं मोठेपण पाहवतही नाही आणि समजतही नाही. अटकेपार झेंडे लावणे ही काही साधी, सोपी गोष्ट नाही. राजकारण्यांमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनंतर थेट नरेंद्र मोदींनाच हे शक्य झालंय, ही बाब नजरेआड करून चालणार नाही. हे सारं आज प्रत्यक्ष अनुभवणारे आपण आपल्याला खरोखरच भाग्यवान म्हटलं पाहिजे. कारण मोदींच्या कार्याचा इतिहास पुढील 20-25 वर्षांनंतर जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा त्यांच्या कार्याला निश्चितपणे अवतारकार्यच म्हटलं जाईल, हे नक्की! भगवान श्रीकृष्णाला आपल्या अवतारकार्यात प्रचंड संघर्ष करावा लागला, अनेक लढाया, युद्ध लढावे लागले. त्यांच्यावरही खोटेनाटे आरोप झाले, त्यांना गवळ्याचं पोर, जादूटोणा करणारा म्हणून हिणवण्यात आलं. त्याच्या कुळातील लोकांनीच त्याला कडाडून विरोध केला. पण, त्या सार्‍या बिकट परिस्थितीवर मात करून त्यांनी देशासाठी, धर्माच्या पुनरुत्थानासाठी आयुष्य खर्ची घातलं. तेच आणि कदाचित त्याहूनही कितीतरी अधिक बिकट परिस्थितीत नरेंद्र मोदी कार्य करत आहेत. तेव्हा गुन्हेगारांच्या रक्षणासाठी कायदे, घटना काहीही नव्हतं. आजच्या गुन्हेगारांच्या रक्षणासाठी हे कटिबद्ध आहेत. त्यामुळे मोदींचं कार्य हे भयंकर कठीण आहे, पण तरीही ते समर्थपणे करत आहेत.
 
 
लोकमान्य, संतमान्य आणि देवमान्य अशा तिन्ही उपाधी ज्यांना प्राप्त आहेत अशा व्यक्तीपुढे संस्कारहीन विरोधकांना, देशद्रोह्यांना नमावंच लागेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!
••