गोंधळा ये वो जगदंबे...

    दिनांक :06-Oct-2019
प्र. जा. कुळकर्णी
भवानी आईच्या भक्तीचा प्रसार गोंधळी लोकांनी आजवर फार केलेला आहे. हे गोंधळी लोक देवीचा गोंधळ घालून समाजात भक्तीचा व ज्ञानाचा प्रसार करीत आले आहेत. गोंधळाच्या वेळी लोकांची करमणूक करून, नाना प्रकारच्या लोककथा हे गोंधळी सांगत असतात. पुष्कळ लोक विवाहविधी आटोपल्यावर एक दिवस गोंधळ घालून आणि अंबाभवानीची यथासांग पूजा करून विवाहविधीची सांगता करीत असतात. देवीचा गोंधळ घालण्याचा प्रघात बराच जुना असला पाहिजे, असे वाटते. एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडात गोंधळ घातलेला आहेच. त्यांची कुलदेवता भवानी आईच होती. एकनाथांनी गोंधळ मांडला आहे, त्यात त्यांनी त्रैलोक्याचा मंडप उभारला आहे. वर चारी वेदांचा फुलोरा बांधला आहे. शास्त्रपुराणांना साथीला बोलावले आहे. पुंडलिकाच्या हातात दिवटी बुधली दिलेली आहे व "गोंधळा ये वो जगदंबे। विठाबाई तू मूळ सांभे।।" म्हणून हाकारले आहे. 

 
 
गोंधळी लोक गोंधळ घालायला उभे राहतात, तेव्हा प्रथम जगदंबेचा धावा करतात आणि नंतर त्यांना माहीत असलेल्या सगळ्या देवतांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणांचा उल्लेख करून गोंधळाला येण्याबद्दल आवाहन करतात. भक्ताला यश देण्याबद्दल ते इतर सगळ्या देव-देवतांनाही विनवणी करीत असतात.
 
 
गोंधळी लोक यावेळी संबळ वाजवीत असतात. या वाद्याला कोणी ‘संबुळ’ही म्हणतात. हा मूळ शब्द ‘सम्मेल’ (सर्व प्रकारचा मेळ साधणारे) या शब्दावरून आला असावा. संबळ हे एक गमतीचे वाद्य आहे, ते चांगले वाजायला लागले की, एक प्रकारची वीरश्री निर्माण होते. भवानी आई हे क्षत्रिय दैवत आहे. महाराष्ट्राचे क्षात्रतेज जागते ठेवायला ती साहाय्य करते. संबळ वाजवून गोंधळी हे काम करीत असतात. ‘गोंधळ’ हा शब्द संस्कृत ‘गुंदल’ (एक प्रकारच्या वाद्याचा आवाज) या शब्दावरून आला असावा, असे दिसते.
गोंधळाच्या वेळी कवड्यांनी मढविलेला पोषाख आणि कवड्यांची माळ घालून देवीचा पोतही पाजळला जातो. हा पोत म्हणजे एकप्रकारची ज्ञानज्योतच आहे. त्याच्या प्रकाशात लोकांना नानाप्रकारचे ज्ञान देण्यात येते. अशी आहे ही भवानी आई. नवरात्रीच्यो पावनपर्वावर आपणही मनापासून तिचे स्मरण करू या-
 
‘‘आई जगदंबेचा उदोऽ उदोऽ’
9766616774