आग्य्राहून सुटका : एक वेगळा परिप्रेक्ष्य़!

    दिनांक :06-Oct-2019
डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490
 
शिवाजीराजांनी आग्य्राच्या जीवघेण्या कैदेतून स्वतःची मुक्तता कशी करवून घेतली, हे आपण मागील लेखात पाहिले. आज एका पूर्ण वेगळ्या आणि नवीन मु्‌द्यावर आपण चर्चा करणार आहोत. इतिहास लेखनाचा आणि वाचकांच्या बाबतीत एक त्रिकालाबाधित सत्य आहे. साधारणपणे पहिले जो इतिहास लिहिल्या जातो त्याची छाप जनमानसावर दीर्घकाळ राहते. पण जेव्हा एखादा नवा विश्वसनीय पुरावा सापडतो, तेव्हा जुना इतिहास कमजोर पडतो. इतिहास अभ्यासकांना तर तो पुरावा मानणे क्रमप्राप्त ठरते पण वाचकांचे तसे नाही. त्यांच्या मनावरचा जुन्या घटनांचा पगडा सहजासहजी जात नाही. अस्सल कागदपत्रातून सापडणारी दादाजी कोंडदेव किंवा नेतोजी पालकर ही नवे आजही दादोजी व नेताजी म्हणूनच लोकांच्या मनात आहेत. इतकेच काय, पण लोकमान्य टिळकांनी ‘वैशाख शु. 2’ ला शिवजन्मतिथी ठरवून सार्वजनिक शिवजन्मोत्सव सुरू केले. हीच तिथी जनमानसात रुळली. पण जेव्हा जेधे शकावली, परमानंदकृत ‘शिवभारत’ या सर्व अस्सल साधनांनी ‘फाल्गुन वद्य 3’ ही जन्मतिथी सांगितली, लोकांनी ती सहजासहजी कबूल केली नाही. आग्य्राहून सुटकेच्या बाबतीतही तसेच आहे. पेटार्‍यांची कथा जनमानसात इतकी घर करून राहिली आहे, की- आपण दुसर्‍या कुठल्याही प्रमेयावर विश्वास ठेवणार नाही. पेटार्‍यांची ती सुरस कथा मागील लेखामध्ये सविस्तर मांडण्यात आलेली आहे. त्याच लेखात सूतोवाच केलेल्या एका घटनेकडे आपण मोकळ्या मनाने पाहण्याचा प्रयत्न करूया.
 

 
 
पेटार्‍यांची कथा कितीही चित्तवेधक असली, तरी हे लक्षात घेतले पाहिजे, की- ही कथा आली कुठून? सिवा निसटला हे समजल्यानंतर 3 सप्टेंबर 1666 मध्ये लिहिलेल्या राजस्थानी पात्रात पहिल्यांदा पेटार्‍यातून निसटल्याचा उल्लेख येतो. मोगल अधिकार्‍यांनी जो अहवाल सादर केला, त्यात पहिल्यांदा त्यांनी असे म्हटले, की-‘सिवा कुठे गेला कळले नाही, कदाचित पेटार्‍यातून गायब झाला.’ आपल्या मालकाचा (औरंगजेबाचा) एवढा मोठा शत्रू आपल्या डोळ्यादेखत गायब झाला आणि आपण त्याला पकडू शकलो नाही, ही बाब पहारेकर्‍यांच्या दृष्टीने मारक होती. म्हणून त्यांनी पेटार्‍यांच्या नावाने त्यातल्या त्यात समर्पक अन स्वतःचे संरक्षण होऊ शकेल असे विधान केले. पुढे इतिहासकारांनी तेच उचलून धरले. पण या कथेला ग्राह्य धरल्यास पुढीलप्रमाणे काही महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात, 
  1. राजांनी पहारेकर्‍यांना कितीही गाफील ठेवले तरी एक लक्षात घ्यावे लागेल की हे पेटारे रोज न येता केवळ गुरुवारी येत असत. 7 दिवसांनी येणार्‍या गुरुवारी पेटारे तपासले जाणार नाही याची शाश्वती काय?
  2. राजे 18 ऑगस्टला निसटल्याचे मोगल अधिकार्‍यांच्या लक्षात आले. डेर्‍यामध्ये कुणीही नाही ही बातमी 1 दिवसावर लपून राहणे शक्य नाही. त्यामुळे राजे 17 ऑगस्टला पेटार्‍यातून निसटायला हवे, पण गुरुवार तर 16 ऑगस्टला होता. म्हणजे सुमारे 48 तास डेर्‍यात कुणीही नाही अन तरी पलंगावर पहुडलेल्या अविचल (उशा अन्‌ तक्के) ‘नकली’ शिवाजीराजांकडे पहारेकरी पाहत बसले हे तर्कसंगत वाटत नाही.
  3. ‘सिवा जर पळून गेला तर त्यास दिसेल तिथे गिरफ्तार करण्याचे’ औरंगजेबाचे 12 जूनच्या पत्रातील कडक निर्देश आपण मागील लेखात बघितले. त्यामुळे बाहेरही तपासणी होणार हे निश्चित होते.
  4. संभाजींना सोडायला राजे स्वतः मथुरेला गेले अन्‌ तरी 25 दिवसांत (बखरीतील उल्लेखांप्रमाणे) स्वराज्यात पोचले असे मानले तर प्रवासाचा वेळ (आग्रा ते स्वराज्य अंतर कापायला साधारण 1 महिना) लक्षात घेता राजांनी स्वराज्यात येणे, संभाजींना आणायला पत्र पाठवणे, मथुरेहून काशीपंत शंभू राजांना घेऊन 20 नोव्हेंबर 1666 (ही तारीख इतिहासाला नक्की माहिती आहे.) रोजी राजगडावर परत येणे हे संभवनीय नाही. हा कालानुक्रम तेव्हाच जुळतो जेव्हा राजे जुलैमध्ये निसटल्याचे आपण गृहीत धरतो.
  5. काही संशोधकांनी असेही म्हटले आहे, की- राजे अपमानास्पद पद्धतीने पेटार्‍यात बसून स्वतःची कुचंबणा करून घेणार नाहीत. ते पालखीचे भोई म्हणून निसटले. पण इथे महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे, की- जिथे जीवनमरणाचा प्रश्न आहे तिथे मान-अपमान कुठून आले. आणि राजस्थानी लोकांनी वर्णन केले आहे, की- ‘सीवा गौरवर्णी आहे, तो राजिंबडा आहे. परिचय न करून देताही लक्षात येते, की- तो एखाद्या साम्राज्याचा नेता असला पाहिजे’. अशी विलक्षण जरब अन करारी चेहरा असेलला माणूस भोई म्हणून कसा दिसेल आणि खपेल? आणि त्यासाठी किती मेकअप करावा लागेल याची कल्पना करावी.
  6. ‘शिवाय पिता पुत्राने सोबत प्रवास करू नये’ या आपल्याकडील संकेतानुसार राजे संभाजींना सोबत घेणार नाही असे वाटते.
  7. राजे जर 17 ऑगस्टला निसटले असतील तर 18 ऑगस्टला औरंगजेबाला कळूनही ते धरल्या का गेले नाही. मोगलांचे लष्करी जाळे मजबूत होते, त्यामुळे राजे सहज धरल्या जाणे संभव होते. कारण 18 ऑगस्टला चौकशीचे आदेश काढल्यावरच परमानंद, बल्लाळ, कोरडे ही मंडळी धरल्या गेली होती. इतकेच नव्हे, तर याच आदेशान्वये साधू, संत, संन्यासी दिसले तरी त्यांची कसून तपासणी करा असे निर्देश होते. त्यामुळे राजांचे निसटणे जवळजवळ दुरापास्त होते.

या सर्व प्रश्नांचा आणि तत्कालीन कागदपत्रांचा क्रम बसविल्यास एक नावेच तथ्य डोळ्यांपुढे उभे राहते. पहिली गोष्ट म्हणजे- राजांनी स्वतःच्या आधी आपल्या सहकार्‍यांना आग्य्रातून यशस्वीपणे बाहेर काढले. या सर्वांसाठी मोगली सही शिक्क्‌याचे दस्तक (म्हणजे परवाने िंकवा लायसेन्स) तयार करवून घेण्यात आले. राजांसोबत 450 माणसे होती, हे गृहीत धरल्यास, किमान 4-5 दस्तक तरी हुशारीने जास्त तयार करवून घेतले गेले होते. रस्त्याने प्रवास करणार्‍या प्रत्येकाला चौकशी नाक्यावर या दस्तकाशिवाय पुढे जाऊ दिले जात नसे. साधारणतः जुलैपासूनच राजांची माणसे तुकड्या तुकड्यांनी दख्खनकडे जाऊ लागली. यातील अनेकांना राजांनी काहीन्‌ काही गुप्त कामगिरी सोपविली होती, जी फक्त त्यांनाच माहिती होती.
 
चाणक्य लिहून ठेवतो-
नास्य परे विद्यु: कर्म िंकचिच्चिकीर्षीतम्‌ ।
आरब्धारस्तु जानीयुरारब्ध कृतमेव वा ।।
 
राजाला जे करायचे आहे, ते इतरांना कळू देता कामा नये. इतकेच नव्हे, तर ज्यांच्याकडून काम करवून घ्यायचे असेल त्यांनाही काम सुरू झाल्यावर िंकवा संपल्यावरच कळावे.
 
यासोबतच राजांनी उत्तर भारताचे उत्तम माहितगार म्हणून कविकलश कवीश्वर (हा पुढे शंभूराजांसोबत छंदोगामात्य म्हणून आपणास परिचित आहे.) आणि कायस्थ सक्सेना यांनाही नोकरीवर ठेवले होते. दर गुरुवारी महत्त्वाच्या लोकांना मिठाया जाणे सुरूच होते पण त्यासोबतच गरिबांनाही ती मिळत असल्याने डेर्‍याभोवती गर्दीही होत असे. पण हे सगळं मोगलांच्या अंगवळणी पडलं होतं. सरहद्दीवर पठाणांच्या बंडाळ्या वाढत होत्या, त्यामुळे स्वाभाविकपणे औरंगजेबाचे लक्ष त्या भागाकडे होते. अपेक्षेपेक्षा जास्त काळ आग्य्रात राहावे लागल्यामुळे अन्‌ अधिकार्‍यांना भेटवस्तू, फळे-मिठाया यावर होणार्‍या खर्चामुळे राजांकडचे पैसे संपत आले होते. त्यामुळे त्यांनी रामिंसहाकडून 66,000 रुपये उधार घेतल्याचा उल्लेख परकळदासाने 13 व 18 जुलैच्या पत्रात केला आहे. राजांनी त्याला हुंडी लिहून दिली, जी स्वराज्यात जिजाऊसाहेबांनी वठवून मिर्झा राजा जयिंसहाकडे ते पैसे वळते केले आहेत. सर्वात महत्त्वाचे होते स्वतःच्या जागी कुणाची तरी ‘शिवाजी’ म्हणून योजना करणे. आणि तो केवळ दिसायला सारखा असून चालणार नव्हते तर तो स्वतः एक उत्तम मुत्सद्दी सुद्धा हवा. आता हे काम हिरोजी फर्जंदांकडे देऊन त्याला सोबतच्या वकील मुत्सद्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वागायला सांगितले, की- एखादा मुत्सद्दीच तिथे शिवाजी म्हणून बसविला हे आज आपल्याला माहिती नाही. यावेळी राजांनी उत्तरेकडील काही लोकांना भेट घेण्यासाठी निमंत्रण धाडले होते त्यात कवींद्र परमानंद गोिंवद नेवासकर (‘शिवभारत’चा रचयिता) हा मूळ नेवाशाचा पण आता काशीमध्ये स्थायिक झालेला महापंडितसुद्धा होता.
 
 
18 जुलैच्या राजस्थानी पत्रात परकळदास लिहितो, की- ‘रामिंसहाने शिवाजीस सांगितले, की- औरंगजेब काही दिवस शिकारीसाठी जाणार आहे’. (राजस्थानी लेटर्स हा एक विश्वासनीय पुरावा मानल्या जातो. दिल्ली-आग्रामध्ये असलेले रजपूत राजांचे प्रतिनिधी रोज घडणार्‍या घटना राजपुतान्यामध्ये असलेल्या आपल्या मालकाला पत्राद्वारे कळवत असत. याला राजस्थानी लेटर्स म्हणतात.) शिकारीचे हे दिवस होते 24, 25, 26 अन 27 जुलै 1666. अतिशय सावधचित्त शिवाजीराजे या घटनेचा फायदा न उठवतील तर नवलच. अचानक शिवाजीराजांनी कवींद्र परमानंदाचा समारंभपूर्वक भव्य सत्कार योजिला व विपुल दानधर्म केला. हा उत्सव 22 जुलैला झाला. औरंगजेब 24 जुलैला शिकारीवर जाणार याचा अर्थ तो 22 जुलैच्या आसपास कदाचित आग्र्‍यातून निघून गेलेला असणार. उत्सव पार पडला. त्या दिवशी प्रचंड गर्दी होती. हळूहळू लोक बाहेर पडले अन्‌ कदाचित त्याच गर्दीचा फायदा घेऊन राजे वेषांतर करून निसटले. हा समारंभ घेण्यासाठी राजांना मुहूर्त पाहण्याची आवश्यकताच नव्हती कारण औरंगजेबाचे आग्य्रात उपस्थित नसणे, यापेक्षा दुसरा सुमुहूर्त कुठला ठरला असता?
 
 
राजांनी आधीपासूनच भेटीगाठी कमी केल्या होत्या, नंतर त्या बंदच करून टाकण्यात आल्या. 23 ऑगस्टच्या राजस्थानी पात्रात उल्लेख आढळतो, की- रोज पहाटे अन्‌ संध्याकाळी अंधुक प्रकाशात शिवाजीराजे चेहेर्‍यावर शाल पांघरून बागेत फेरफटका मारीत असत. गंमत म्हणजे ही कृती ऑगस्ट महिन्यातही सुरू होती. म्हणजे शिवाजीराजे जर 22 जुलैला निसटले असतील तर हा तोतया शिवाजी मात्र आपले काम व्यवस्थित पार पाडत होता. (तोतया म्हणजे डुप्लिकेट फक्त सद्दाम हुसेनच वापरतो असे नाही, ज्ञात इतिहासात राजांनी किमान 2 वेळा तो वापरला आहे.) आणि अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे- 22 जुलै ते 18 ऑगस्ट राजांचा एकही अर्ज औरंगजेबाकडे गेलेला नाही आणि या दरम्यान एकाच ठिकाणी राहत असतानाही रामिंसह व शिवाजीराजांची एकही भेट नाही. याचा एक अर्थ हा पण आहे, की- आत खरे शिवाजी नाहीच, तोतया शिवाजी फक्त दिवस पुढे ढकलतोय्‌.
 
 
पुढे ग्वाल्हेर जवळच्या नरवरमधून इबादुल्लाखान या नावाच्या फौजदाराने वाकियानवीसच्या (रोजची बातमी म्हणजे ‘वाक्या’ सरकारला पाठविणारा माणूस) हाताने एक वाका (बातमी) पाठविली. हे वाके संकलित करून दर शनिवारी पाठविले जात. त्यामुळे 4 ऑगस्ट 1666 ला निघालेला हा वाका 7-8 ऑगस्टला आग्य्रात पोहोचून औरंगजेबा पुढे यायला 23 ऑगस्ट उजाडले. या वाकामध्ये एक जबरदस्त गोष्ट होती. 28 जुलैच्या संध्याकाळी एक तुकडी नरवर घाटी ओलांडताना तपासणीसाठी चौकीवर थांबली. विचारपूस केल्यावर त्यातल्या एकाने आधी म्हटले, की- ‘मी शिवाजीचा माणूस आहे’ आणि जातांना तो म्हणाला, की- ‘मी शिवाजी आहे!’ (शिवाजीराजांचा मिष्किल स्वभाव पाहता हे शक्य आहे). या प्रकारामुळे तो स्थानिक चौकीदार जरा गोंधळाला, त्याने या लोकांना जाऊ दिले. पण त्याने ही गोष्ट वाकियानवीसपर्यंत पोहोचविली. पुढे 23 ऑगस्टला औरंगजेबापुढे हे प्रकरण आल्यावर त्याने इबादुल्लाखानवर जाहीर असंतोष व्यक्त केला. पण हा वाक्या जर खरा मानला तर ते शिवाजीराजेच होते, यात शंका नाही. आणि ते 28 जुलैला नरवरला होते. याचा अर्थ 22 जुलैच्या आसपास आग्य्रातून बाहेर पडले असले पाहिजे.
 
 
 
यानंतर मात्र महाराज त्वरेने दक्षिणेकडे निघाले. वाटेमध्ये गावागावांमध्ये असलेल्या सरयांमध्ये राजांची माणसे थांबली होती. त्यांच्याकडून ताज्या दमाचे घोडे घेऊन व आपले थकलेले घोडे तेथे सोडून राजे तुफान वेगाने दौडत सुटले. काही पुस्तकांमध्ये असेही उल्लेख सापडतात, की- समर्थ रामदासांनी बांधलेल्या मठांचा व महंतांचा या सर्व प्रवासात राजांना बराच उपयोग झाला. एका इंग्रज अधिकार्‍याच्या पत्रात अशी नोंद आढळते, की- शिवाजीसोबत आग्य्राला गेलेल्या लावाजम्यामध्ये एक रामदासीसुद्धा होता. पण प्रत्यंतर पुरावे सापडल्यास या घटनांवरही नवा प्रकाश पडू शकेल. आज तरी आपल्याला खात्रीने असे सांगता येत नाही. असो! साधारण 35-40 दिवसांत राजे स्वराज्याच्या सरहद्दीवर आले व तिथून शंभुराजांना आणण्यासाठी पत्र रवाना केले गेले. त्यानुसार काशीपंत शंभुराजांना घेऊन 20 नोव्हेंबरला राजगडावर सुखरूप येऊन पोहोचले. स्वराज्याचे प्राण स्वराज्यात परत आले. औरंगजेबाच्या कल्पनेपलीकडील ही घटना होती. आग्य्रात सारेच स्तंभित झाले होते. मोगल अधिकारी व सरदार जिथे शिवाजीराजांविरुद्ध आग ओकत होते, तिथे अजूनही स्वाभिमान न गमावलेली राजपूत मंडळी, बुंदेले आणि दिल्ली-आग्य्रातील सामान्य जनता मात्र शिवाजीराजांचे, त्यांच्या बुद्धिमत्तेचे, चातुर्याचे गोडकौतुक करत होती. राजांनी आपल्या कमालीच्या नियोजनकौशल्याच्या जोरावर सगळे पारडे फिरवून टाकले होते. सगळेच कल्पनातीत होते, अनाकलनीय होते.
 
 
अद्भुत होते, केवळ ‘अद्‌भुत!’
(लेखक कार्पोरेट आणि
व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक आहेत.)
••