कार -ऑटोमध्ये अपघात; १२ जखमी

    दिनांक :06-Oct-2019

 
 
हिंगणघाट,
भरधाव कार प्रवासी घेऊन चाललेल्या ऑटोवर धडकल्याने झालेल्या अपघातात एकूण 12 जण जखमी झाले. यातील चार गंभीर अवस्थेतील महिलांना उपचाराकरीता सेवाग्राम येथे पाठविण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील गीमा टेकस्टाईल्स समोर घडली.
सविस्तर वृत्त असे की, ह्युंडायी कार क्र एमएच 31 EA 7908 ही कार राष्ट्रीय महामार्गाने हिंगणघाट येथून वडनेरच्या दिशेने जात होती, तेवढ्यात रस्त्यात त्यांच्या कारला समोरून एक बंदर आडवा गेल्याने कार चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटले व कार त्याच दिशेने प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो क्रं एम एच 32 बी 7800 वर धडकली,ही धडक एवढी जबर होती की ऑटोने दोन पलटी घेतल्या, त्यामुळे यातील चार महिला प्रवासी प्रियांका फुलझले ,खतीजा  पठाण, नंदा मडावी आणि जिजाबाई कांबळे  या गंभीर जखमी झाल्या तर ऑटो चालक व अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले, त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सुट्टी देण्यात आली. या अपघाताची हिंगणघाट पोलिसात नोंद आहे.