ह्युंदई देणार कारबरोबर ई-स्कूटर

    दिनांक :07-Oct-2019
ह्युंदई मोटर ग्रुपने ग्राहकांच्या ‘फर्स्ट अँड लास्ट माईल मोबिलिटी’चा विचार करत आगामी काळात येणार्‍या ‘ह्युंदाई’ आणि ‘किया’ कार्ससोबत इलेक्ट्रिक स्कूटर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. जगात कोणत्याही कार उत्पादक कंपनीने असं पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्कूटर संबंधित कारमध्ये बसवलेली असेल आणि कार सुरू असताना उत्पन्न होणार्‍या विजेवर तिची बॅटरी चार्ज होत राहील. म्हणजे ग्राहकाने वापरण्यासाठी ती सदैव तयार असेल. परिणामी, ग्राहकाला कार पार्क केल्यानंतर गंतव्य स्थानी जाण्यासाठी ती वापरता येईल आणि त्याचा प्रवास सुरळीत आणि विना कटकटीचा होईल. 

 
 
आजघडीला जगातल्या प्रत्येक मोठ्या आणि महत्वाच्या शहरामध्ये वाहतुकीचा खोळंबा आणि पार्किंग या दोन मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे अनेकांना कार लांब पार्क करून दुसर्‍या वाहनाने किंवा चालत फिरावं लागतं. अनेकदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसते. एका शहरातून दुसर्‍या शहरात कारने गेल्यावरही हा अनुभव येतो. त्यामुळे ‘लास्ट माईल मोबिलिटी’ ही काळाची गरज बनली आहे. अशी ई-स्कूटर बरोबर असल्यास त्या शहरात फिरण्याची समस्या संपुष्टात येऊ शकते. ह्युंदाईने या समस्येवर काढलेल्या उपायामुळे हा प्रश्न सुटण्यास बरीच मदत होऊ शकेल.
 
 
ह्युंदाईने या स्कूटरचं प्रोटोटाईप मॉडेल तयार केलं आहे. 2017 मध्ये ‘कंझ्युमर टेक्नॉलॉजी असोसिएशन’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सीइएस 2017’ या प्रदर्शनात या कंपनीने अशा स्कूटरचं मॉडेल सर्वप्रथम सादर केलं होतं. त्या मॉडेलमध्ये स्कूटरच्या पुढच्या चाकाला उर्जा देण्यात आली होती. पण आता या नव्या मॉडेलमध्ये पुढच्याऐवजी मागच्या चाकाला उर्जा पुरवण्यात आली आहे. यात उच्च क्षमतेची लिथियम बॅटरी असून दोन एलइडी हेडलाईट्‌स आणि दोन टेल लॅम्प्सही देण्यात आले आहेत.