मंजू राणी विश्व बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

    दिनांक :07-Oct-2019
- विश्व महिला बॉक्सिंग स्पर्धा
उडान उडे,
भारताच्या मंजू राणीने (48 किग्रॅ) सोमवारी महिलांच्या विश्व बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. रशियाच्या उडान उले येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सहावी सीड मंजूने व्हेनेझुएलाच्या रोजस टेयोनिस सिडेनोवर सरळ 5-0 ने वर्चस्व गाजविले. विश्व स्पर्धेतील पदकापासून मंजू आता केवळ एक विजय दूर आहे. मात्र पुढील फेरीत तिच्यासमोर कडवे आव्हान राहणार असून 10 ऑक्टोबर रोजी तिला गत विश्व स्पर्धेतील कांस्यपदक विजेती व अव्वल सीड दक्षिण कोरियाच्या किम हयांग मी हिच्याविरुद्ध झुंज द्यावी लागणार आहे. 
 
 
मंजू राणी आणि सिडेनो यांच्यादरम्यानच्या लढतीत थेट ठोसे काही फारच दूर होते, मात्र यापैकी काही ठोशांवर मंजूने गुणांची कमाई केली. दोन्ही बॉक्सर्सने बचावात्मक पवित्रा अवलंबिला, मात्र राणीने आणखी दोन अचूक ठोसे मारून विजय संपादन केला.
मंगळवारी सहावेळची विश्वविजेती मेरी कोम (51 किग्रॅ) थायलंडच्या जुतामस जितपॉंगविरुद्ध आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. तिसरी सीड मेरी कोमला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. 75 किग्रॅ वजनी गटात माजी रौप्यपदक विजेती सविती बोरा (75 किग्रॅ) हिची झुंज दुसरी सीड वेल्शच्या लॉरेन प्राईसविरुद्ध होणार आहे.
 
 
प्राईस ही युरोपियन गेम्स सुवर्णपदक विजेती असून गत विश्व महिला बॉक्सिंग स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले होते. ती राष्ट्रकूल स्पर्धेची विजेती असून तिने युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये तीनवेळा कांस्यपदक मिळविले आहे.