लोकं काय विचार करतील याची मला चिंता नाही : रोहित शर्मा

    दिनांक :07-Oct-2019
विशाखापट्टणम, 
मुंबईकर रोहित शर्माने आपल्यावर टाकण्यात आलेली कामगिरी चोख बजावत स्वतःला सिद्ध केलं आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेल्या रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकं झळकावली. या कामगिरीसाठी रोहितला सामनावीराचा किताब घोषित करण्यात आला. पहिल्या सामन्यानंतर रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. 
 
“दोन शतकं झाली याचा आनंदच आहे पण मी कधीही विक्रमांसाठी खेळत नाही. मला माझ्या खेळाचा आनंद घेता यायला हवा. मी माझ्याभोवती एक कडं तयार करुन घेतलं आहे. त्यामुळे बाहेर लोकं काय विचार करतात, माझ्याबद्दल काय बोलतात याची मला चिंता नाही, त्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. कारण कितीही झालं तर मैदानात जाऊन खेळ मला करायचा आहे, त्यामुळे मी प्रत्येकवेळी चांगलीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो.” रोहित कसोटी संघात आपलं स्थान टिकवण्यासाठी असलेल्या स्पर्धेबद्दल बोलत होता.
 
रोहित शर्माने पहिल्या डावात २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पहिल्या डावात त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. हीच लय कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यातदेखील शतक ठोकले. रोहितने दुसऱ्या डावात १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या डावात रोहितने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्यानुसार त्याने दोनही डावात मिळून ३०३ धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.