सानिया मिर्झाची बहिण करणार अझरुद्दिनच्या मुलाशी लग्न

    दिनांक :07-Oct-2019
नवी दिल्ली, 
टेनिस स्टार सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असदला डेट करत असल्याच्या चर्चा होती. या वर्षाअखेर अनम आणि असद लग्न करणार असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र त्याबद्दल ठोस कोणीही सांगितले नव्हते. पण नुकतेच सानियाने या चर्चांना पूर्णविराम देत अनम आणि असद डिसेंबरमध्ये विवाहबद्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
“असद आणि अनम यांच्या लग्नाच्या चर्चा खऱ्या आहेत. मी नुकतीच पॅरिसला अनमच्या बॅचलरेट पार्टीला जाऊन आले. आता असद आणि अनम हे दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. अनम ही एका गोड मुलाच्या प्रेमात आहे. त्याच्याशी तिचं लग्न होणार आहे. त्या मुलाचं नाव असद आहे आणि तो माजी क्रिकेटपटू अझरुद्दिन यांचा मुलगा आहे”, असे सानियाने शनिवारी सांगितले.
 
 
अनम फॅशन डिझाइनर असून तिचे स्वत:चे फॅशन आऊटलेटदेखील आहे. तर वडिलांप्रमाणेच असदला क्रिकेटमध्ये करिअर करायचे असून त्याची गोव्याच्या रणजी टीममध्ये निवडदेखील झाली होती.
अनम असदपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे. या दोघांना अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. सानियाने मार्च महिन्यात असदचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये ‘फॅमिली’ (कुटुंब) असं लिहिलं होतं.
 
दरम्यान, अनमचा हा दुसरा निकाह असून गेल्याच वर्षी तिने पती अकबर रशीदशी घटस्फोट घेतला. २०१६ मध्ये अनम आणि अकबर यांचा निकाह पार पडला होता आणि दोन वर्ष पूर्ण होण्याआधीच ते विभक्त झाले. अनम आणि रशीद यांचा निकाह २०१६ मध्ये धूमधडाक्यात पार पडला होता. यात चित्रपट, राजकारण आणि फॅशन जगतातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. बॉलिवूड स्टार सलमान खान, परिणिती चोप्रा, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.