…आणि तिथेच सामना फिरला – विराट कोहली

    दिनांक :07-Oct-2019
नवी दिल्ली,
भारत आणि आफ्रिकेदरम्यान पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ५०२ धावांवर डाव घोषित केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून आफ्रिकेने पहिल्या डावात ४३१ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात पुन्हा धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे आफ्रिकेपुढे दीड दिवसांत डोंगराएवढे आव्हान होते. सुमारे ४०० धावांचे आव्हान पार करणे एवढ्या कालावधीत कठीण होते. त्यामुळे आफ्रिकेकडे सामना वाचवणे हाच एक पर्याय होता. पण सामन्यात एक अशी गोष्ट घडली की त्यामुळे सामना फिरला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याबाबत सामन्यानंतर मत व्यक्त केले.

 
“वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत, तर फिरकीपटूंवर भार येतो. या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे अश्विन आणि जाडेजावर अधिक दबाव आला नाही. पहिल्या डावात अश्विनने चांगली कामगिरी केली तर दुसऱ्या डावात जाडेजाने दमदार गोलंदाजी केली. पण या सगळ्यात दुसऱ्या डावातील मोहम्मद शमीची गोलंदाजी महत्वाची ठरली. त्याने योग्य वेळी आफ्रिकेचे गडी बाद केले आणि तिथेच सामना फिरला, असे विराटने सामना संपल्यानंतर बोलताना सांगितले. मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात ५ बळी घेतले.
“खेळपट्टीकडून फलंदाजांना पहिल्या तीन दिवसात खूप मदत मिळाली. एका सत्रात जरी आम्ही मागे पडलो, तरी सामन्यात पुनरागमन करणे कठीण जाईल हे आमच्या संघाला माहिती होते. आम्ही जेव्हा पहिल्या डावात ५०० चा आकडा गाठला, तेव्हा आम्हाला थोडेसे हायसे वाटले. कारण ५०० ही धावसंख्या कोणत्याही खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघासाठी कठीणच असते. मयांक आणि रोहित उत्तम खेळले. दुसऱ्या डावात पुजारानेही अप्रतिम खेळी केली. जसा-जसा खेळ पुढे जात होता, तसे खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण जात होते. पण ज्या प्रकारे फलंदाजांनी फलंदाजी केली, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारणे शक्य झाले, अशा शब्दात कोहलीने सर्व खेळाडूंचे आणि सांघिक कामगिरीचे कौतुक केले.
 
दरम्यान, मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत पाचव्या दिवशी विजय संपादन केला. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान भारतीय संघाने दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना तळाच्या डेन पिटने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. त्याला इतर कोणाचीही साथ मिळू शकली नाही. त्यामुळे आफ्रिकेला सामना वाचवता आला नाही. भारताने आफ्रिकेचा डाव १९१ धावांत गुंडाळला आणि भारताला २०३ धावांनी विजय मिळवून दिला.